पत्रकबाजी करून, हळवेपणा दाखवून घाबरविणाऱ्यांपेक्षा वास्तवात काम करणारेच श्रेष्ठ!

कोविडग्रस्त रुग्णांना दिलासा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नगरसदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते पुढे आले आहेत. सामान्यातील असामान्यत्व जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या “नवनायक” या प्रसिद्धी माध्यमाने याच व्यासपीठावरून केलेल्या आवाहनाला मिळालेला हा प्रतिसाद आहे. गेल्या काही दिवसात महापालिकेच्या प्रयत्नांना जोड देण्यासाठी अनेक व्यक्ती आणि संस्था पुढाकार घेताहेत. काही उल्लेखनीय व्यक्तींचे हे योगदान असामान्यत्व दर्शविणारेच आहे. केवळ पत्रकबाजी करून आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्याच म्हणजेच या शहरातील करदात्या नागरिकांच्या पैशाच्याच जोरावर आम्ही अमुक करून घेतले, तमुक करून घेतले असा डांगोरा पिटणाऱ्या तथाकथित नेत्या, पुढाऱ्यांपेक्षा स्वतः झळ खाऊन जनतेला अशा आपात्कालीन परिस्थितीत उभारी देणाऱ्या या मंडळींचे करावे तेव्हढे कौतुक थोडेच आहे.

यात महापालिकेच्या जिजामाता रूग्णालयासाठी पन्नास बेड, चार व्हेंटिलेटर, दोन हाय फ्लो मशीन देणारे पिंपरीचे नगरसेवक संदीप वाघेरे, महापालिकेला दहा रुग्णवाहिका देणारे चिखलीचे नगरसेवक आणि माजी महापौर राहुल जाधव, ना नफा ना तोटा पद्धतीने पन्नास खाटांचे ज्यात दहा व्हेंटिलेटर, दहा ऑक्सिजन खाटा आहेत असे कोविड केअर सेंटर सुरू करणारे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आणि माजी नगरसेवक शंकर जगताप, कोविड रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजन व्यवस्था करणारे नगरसेवक तुषार हिंगे, आपली सुसज्ज इमारत विनामोबदला वापरायला देऊन त्यात साईलीला कोविड केअर सेंटर सुरू करण्यास मदत करणारे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, पदरमोड करून अनेक रुग्णांना औषधोपचार मिळवून देणारे नगरसेवक राहुल कलाटे अशी अनेक नावे आहेत.

आपल्या बागलबच्च्यांना आणि हितसंबंधीयांना महापालिकेच्या म्हणजेच शहरातील करदात्यांच्या पैशावर पोसणाऱ्या तथाकथित नेत्या, पुढाऱ्यांपेक्षा ही निस्पृहपणे काम करणारी मंडळी कायम उजवी आहेत. शहरातील नागरिकांना घाबरवून सोडणारे, मकराश्रु काढून आपणच कसे या शहरासाठी झटतो आहोत हे दाखवितानाच आपल्या पोळीवर तूप ओढून घेणारे, किंबहुना तुपाची बुधलीच पळवून नेणारे नेते, पुढारी या शहरात आहेतच, पण शहर या आपात्कालीन परिस्थितीतही तरले आहे ते खऱ्या अर्थाने समाजाचे उत्तरदायित्व मानून, स्वतः पदरमोड करून शहारवासीयांच्या भल्यासाठी तोषिश घेणाऱ्या या समाजहितैशी मान्यवरांमुळे! या मान्यवरांना पिंपरी चिंचवड शहरच नव्हे तर सकल समाजाच्या वतीने सामान्यांतील असामान्यत्व जपणाऱ्या “नवनायक” ची मानवंदना!

————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×