एखादा रुग्ण हातघाईला आला तरी चालतो त्यांना, कसाईच आहेत ते! रेमडीसीविरचे गौडबंगाल! (भाग २)
पिंपरी (दि.१३/०४/२०२१)
कोविड रुग्णांकडे बघण्याची खाजगी रुग्णालयांची नजर बोकडांची मान, पाठ दाबून बघणाऱ्या कासायांची झाली आहे काय? असा प्रश्न सध्या रेमडीसीविर शोधणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना पडतो आहे. रुग्णाला रेमडीसीविर नाही दिले तर, रुग्णाचे काय होईल सांगता येत नाही, अशी धमकीवजा सूचना देऊन ही खाजगी रुग्णालयाची मंडळी शांतपणे रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ आणि तडफडाट पाहत राहतात. नातेवाईक हतबल आणि हवालदिल झाले पाहिजेत याची सोय करण्यासाठी वारंवार नातेवाईकांकडे, आणलं का इंजेक्शन, किती वेळ? उशीर झाला तर आम्हाला दोषी धरू नका, असे ‘प्रेमळपणे’ बोलतातही. बाहेर कुठेही रेमडीसीविर इंजेक्शन मिळणार नाही याची जाणीव रुग्णाच्या नातेवाईकांना झाली, की मग हळूच कोणीतरी डॉक्टरांनाच गळ घाला, असा ‘सल्ला’ देतात आणि इथून पुढे खऱ्या वगाला सुरुवात होते.
या वगनाट्याचे प्रमुख पात्र असते, डॉक्टरांनाच गळ घाला म्हणणारी व्यक्ती. मग हे प्रमुख पात्र आपले पूर्ण अभिनयकौशल्य पणाला लावून तुमच्यासाठी रेमडीसीविर पैदा करण्याचे नाटक करते. तुमच्यात रेमडीसीविर मिळण्याची आशा उत्पन्न होते. मग प्रश्न निर्माण होतो तो, किती रुपये? उत्तर मिळते, ‘ब्लॅकने’! सरकारी नियमानुसार बाराशे ते पंधराशे रुपायला मिळू शकणारे हे रेमडीसीविर मग तीन हजार ते सात हजार अशा रुग्णाच्या नातेवाईकांच्या खिशाचा अंदाज घेऊन आणि त्यांच्यावर उपकार केल्याचे दृश्य तयार करून शक्य तेवढ्या रकमेला देण्याचा शब्द दिला जातो. तोपर्यंत कुत्तरओढ झालेले, हतबल झालेले नातेवाईक रकमेची जुळवाजुळव करायला सुरुवात करतात. दोनचार तास वाट पाहिल्यावर परमेश्वरासारखा एक जण प्रकट होतो आणि नातेवाईकांचा खिसा हलका करून एक हलके खोके हातात टेकवून अंतर्धान पावतो.
हे रेमडीसीविर कुठून पैदा झाले, याचे संशोधन कोणीही करण्याच्या भानगडीत पडत नाही. आमच्या एक हृदयस्थ व्यक्तीने आम्हाला हे नाट्य सांगितल्यावर आम्ही हे शोधण्याचा प्रयत्न केला. या शोधात रेमडीसीविरचे नाट्यमय गौडबंगाल उजागर झाले. रेमडीसीविर मिळाल्याच्या शासकीय यादीत त्या खाजगी रुग्णालयाच्या इमारतीतील औषधाच्या दुकानाचेही नाव होते, ही धक्कादायक माहिती समोर आली त्याचबरोबर हे ते दुकान नाही, ते दुसऱ्या रुग्णालयाच्या इमारतीत आहे, अशी मल्लिनाथीही कळली. एकच नाव धारण करणाऱ्या या दोनही दुकानांच्या इमारती एकाच व्यक्तीच्या मालकीच्या आहेत, हेही कळले. या सर्व प्रकाराला कसाबकरणी म्हणू नये काय? हा प्रश्न आम्हाला निर्माण झाला आहे.
रेमडीसीविरच्या या आतबट्ट्याच्या व्यवहारात लक्ष कोणी घालायचे आणि या कसायांच्या हातातून रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मान कोणी सोडवायची किंवा तशी इच्छाशक्ती कोणात आहे काय हे कसे शोधायचे हा खरा प्रश्न आहे. रेमडीसीविर वितरित करणाऱ्या शासकीय यंत्रणेलाच हे शक्य आहे. ज्या शासकीय अगर खाजगी रुग्णालयांना हे इंजेक्शन वितरित केले जाते, त्यांनी ते कोणाला दिले, याची माहिती मिळवायला हवी. या माहितीची पडताळणी करण्यासाठी पाच दहा टक्के रुग्णांना त्यानी इंजेक्शन कसे मिळविले हे विचारायला हवे आणि त्यांचा उत्पादन गट क्रमांक (बॅच नंबर) पडताळून पाहायला हवा. पण शासकीय यंत्रणा आणि ती चालविणारे अधिकारी, पदाधिकारी या कसायांना सामील असतील तर? प्रश्न गंभीर आहे. त्याहीपेक्षा रेमडीसीविर शोधताना कोणा रुग्णाचा प्राण गेला तर त्याची जबाबदारी कोणावर हा प्रश्न ज्यादा गंभीर आहे.
———————————–