अजितदादा म्हणतात “मी त्यांचं कामच करून टाकेन!”

“खालची टीम जरा गडबड करतेय, मला जर कळलं तर मी त्यांचं “काम”च करून टाकेन!” भाजपच्या कच्छपी लागलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचे हे वक्तव्य. अजितदादांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीतून शिंदे शिवसेनेचे उमेदवार असलेले श्रीरंगअप्पा बारणे याच्यासाठी झालेल्या प्रचार सभेत आपल्या कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला. म्हणजे त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे काही लोक अजितदादांशी गद्दारी करताहेत आणि त्यांनी अशी गद्दारी किंवा दिवसा वेगळे आणि रात्री वेगळे झेंडे हाती घेऊन काही वेगळे निर्णय घेतले तर त्यांची खैर नाही असा बहुदा अजितदादांच्या बोलण्याचा रोख असावा. थोडक्यात कोणीही कोलांटउड्या मारू नयेत, असे त्यांचे म्हणणे असावे. मात्र, अजितदादांनी कोणत्याही आणि कसल्याही कोलांटउड्या मारल्या तरी चालतील, बाकीच्यांनी त्यांच्यामागे मेंढरांसारखे खाली मुंडी घालून निघाले पाहिजे, ही त्यांची बहुदा अपेक्षा असावी. आपल्या कार्यकर्त्यांना दम देण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे, कारण आपणच त्यांच्या भल्याबुऱ्या कर्माचे वाली आहोत, असे अजितदादा वारंवार सांगत असतात, नव्हे त्यांचा तो सनातन असा विचार आहे.

अजितदादांनी राष्ट्रवादी फोडून आपला गट तयार केला, आपणच मूळ राष्ट्रवादी आहोत असा डांगोरा देखील पिटला.  भाजपच्या नदी लागून आपल्यावरील कारवाया थांबवण्याचा आणि भ्रष्टाचाराचे आरोप धुण्याचा प्रयत्नही केला.भाजपनेही त्यांना धुवून काढले. मग अशा शुचिर्भूत अजित पवारांनी शरद पवार आणि त्यांच्याकडे राहिलेल्या लोकांना अनेकदा डिवचले आणि बोचकारले सुद्धा. मात्र, हे निरुपयोगी ठरते आहे, हे भाजपच्या लक्षात आल्यावर, भाजपने अजित पवारांना राहिलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर कोरडे आणि ताशेरे ओढण्यास भाग पाडले. अजित पवारांनी तोही प्रयत्न करून पाहिला. मात्र तरीही शरद पवार तुटत नाहीत हे पाहिल्यावर, महायुतीच्या उमेदवार म्हणून आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात आणले. “बारामतीत फक्त पावरांनाच मते द्या.” असे कंठारवाने सांगून पाहिले. त्याचबरोबर “मी शरद पवारांचा मुलगा नाही, ही माझी चूक आहे काय? असा कंठशोषही करून पाहिला.

हे सगळे करून झाल्यावरही आपल्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही, हे जाणवल्यावर आता अजितदादांचा मूळ हेकेखोर आणि हुकूमशाही स्वभाव उफाळून आला आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या झाल्या, अजित पवारांनी शिरूरचे खासदार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पाडण्याची गदरोळी गर्जना केली. त्यासाठी अनेक उलटसुलट प्रयत्न करून शिंदे शिवसेनेच्या शिवाजीराव आढळरावांना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्यास ओढून घेतले. ही सगळी लफडी कुलंगडी करूनही म्हणावा तसा फायदा होत नाही, हे लक्षात आल्यावर अजितदादांनी आता लोकांना दम देण्याचा सपाटा लावला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंगअप्पा बारणे यांच्या प्रचारसभेत सर्वसामान्य कार्यकर्ते खाली वेगळे काही करत असल्याचा आरोप अजितदादांनी नुकताच केला. शिरूरचे आमदार अशोक पवारांना त्यांनी ताजा ताजा दम दिला आहे. कोणालाही “तू कसा निवडून येतो, तेच बघतो” किंवा “मला कळलं तर, मी त्याचं ‘काम’च करून टाकेन” ही अजित पवारांची दर्पोक्ती.

वस्तुतः आतापर्यंत अजितदादांनी ज्यांना ज्यांना  पडण्याचा दम दिला, त्यांना पाडलेच आहे. हे जरी खरे असले तरी, त्यावेळी त्यांच्या मागे शरद पवारांची ताकद होती. शरद पवारांच्या छत्राखालून बाहेर निघाल्या निघाल्या त्यांच्यावर मोठीच नामुष्की ओढवली आहे. ज्यांना पाडण्याचा चंग बांधून तो पूर्ण केला, त्याच हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे यांच्या पाय पडायची वेळ अजितदादांवर आली. याचे कारण एकच, आता अजित पवार हे शरद पवारांच्या छत्राखालून निघून भाजपाई नातद्रष्टांच्या कच्छपी लागले आहेत. आपल्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडून आणायचे असेल तर, शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या नाकदुऱ्या काढण्याचे आदेश भाजपने अजितदादांना दिले आणि त्यांना ते निमूटपणे पाळावे लागले. त्यामुळे आता अजितदादांनी कोणाला “पाडण्याची” अगर कोणाचे “काम”च करून टाकण्याची धमकी देऊन स्वतःचे हसे करून घेऊ नये. करण आता अजित पवार ज्यांच्या कच्छपी लागले आहेत, ते भाजपाई आता अजितदादांना कुठे आणि कुणापुढे सपशेल लोटांगण घालायला लावतील याचा नेम नाही.

——————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×