संतपीठाचे खरे मालक कोण, महापालिका की भाजप?
सनातन वैदिक धर्माचे कर्मठ फॅसिस्ट पुरस्कर्ते मनोहर कुलकर्णी तथा भिडे गुरुजींचे खांदे समर्थक असलेले पिंपरी चिंचवड शहर भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष यांच्या हस्तक्षेपाने संतपीठाच्या मूळ उद्देशाचा बोजवारा ठरवून उडवण्यात आला आहे, अशी चर्चा आता सुप्तपणे होत आहे. सनातनी ब्राह्मणी वैदिक धर्माने भागवत परंपरेला कायम विरोधच केला असल्याचे अगदी ज्ञानराज माऊली आणि संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या काळापासून स्पष्ट झाले आहे. आता देखिल याच कर्मठ ब्राह्मणी वैदिक धर्माचे पुरस्कर्ते संतपीठाच्या मूळ संहितेलाच तिलांजली देत आहेत असा होराही व्यक्त होत आहे. आरएसएसची मूळ समाज विघटनवादी, ब्राह्मणी, सनातनी विचारधारा जोपासण्यासाठी पिंपरी चिंचवड महापलिकेतील सत्ताधारी भाजपाई या संतपीठावर स्वतःची मालकी सिद्ध करू इच्छितात, अशी चर्चा आता शहरात जोर धरू लागली आहे.
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या संतपीठाची नक्की मालकी कोणाकडे आहे, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका संचलित असलेल्या या संतपीठात सध्या बालवाडी, पूर्वप्राथमिक म्हणजेच नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी या तीन वर्गांची प्रवेश प्रक्रिया चालू आहे. मात्र, ही प्रवेश प्रक्रिया नक्की कोण राबवते आहे, यावर शंका निर्माण होत असून या संतपीठाच्या शाळेचे संचलन महापालिका करते आहे, की महापलिकेतील सत्ताधारी भाजपाई, याचे आकलन होत नसल्याचे बोलले जात आहे. टाळगाव चिखली येथील संतपीठ पिंपरी चिंचवड महापालिका संचलित आहे, असे कागदावर दिसत असले तरी, तेथिल कारभार सत्ताधारी भाजपच्या मर्जीप्रमाणे आणि इच्छेनुसार होत आहे काय असा संशय व्यक्त होत आहे.
संतपीठाच्या संचलनासाठी विशेष समितीचे गठन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत, तर शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे या समितीच्या सचिव सदस्य आहेत. त्याचबरोबर संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे, आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ प्रा. अभय टिळक, ह.भ.प. राजू महाराज ढोरे आणि शिक्षणतज्ञ प्राध्यापिका स्वाती मुळ्ये हे या विशेष संचलन समितीचे संचालक आहेत. सध्या या संतपीठात संत वाङ्मय आणि केंद्रीय माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण पद्धती (सीबीएसई) यांचा बादरायण संबंध जोडून बालवाडी आणि पूर्वप्राथमिक म्हणजेच नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या वर्गांची प्रवेश प्रक्रिया संतपीठाच्या संचालक प्रा. स्वाती मुळ्ये यांनी पूर्ण केली असून उपलब्ध झालेल्या एकशे पंचावन्न अर्जांपैकी सोडतीद्वारे एकशे वीस विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.
चिखलीच्या संतपिठाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर माई ढोरे यांच्या हस्ते दूरस्थ संगणकीय पद्धतीने करण्यात आले. या उद्घाटनाला मोजून सात लोक उपस्थित होते. एव्हढ्या मोठ्या प्रकल्पाचे उद्घाटन असे चोरून आणि कोणाच्याही नकळत का अक्षरशः उरकण्यात आले असावे याबाबत शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे. यासर्वावर वरकडी म्हणजे या उद्घाटनाच्या बातम्या शहर भाजपच्या अधिकृत प्रसिद्धी यंत्रणेद्वारे प्रसिद्धी माध्यमांकडे पोहोचविण्यात आल्या. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे प्रवेश प्रक्रिया पार पडल्याच्या बातम्याही भाजपच्या प्रसिद्धी यंत्रणेद्वारे वितरित करून भाजपचे गोडवे गायले गेले. वस्तुतः महापालिकेच्या यंत्रणेद्वारे ही प्रसिद्धी पत्रके वितरित केली जाणे अपेक्षित आहे. संतपीठाची एकूणच कार्यपद्धती भाजपने महापालिकेच्या हातातून अक्षरशः हिसकावून घेतल्याचेच यातून स्पष्ट होत आहे.
मूलतः सीबीएसई पद्धतीची शिक्षण पद्धती या संतपीठात लागू करून पिंपरी चिंचवड महापालिकेने आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजपने संतपीठाच्या मूळ हेतुलाच सुरुंग लावून हादरा दिला आहे. वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्माच्या समतावादी समाजकारणाला एकूणच भाजपच्या विचारप्रणालीने नेहमीच सुप्त विरोध दर्शविला आहे. त्यामुळे संतपीठाची ही इंग्रजी माध्यमाची शाळा भाजपच्या मूळ विचारसरणीला अनुसरून भागवत धर्माची परंपरा मोडीत काढणारी ठरणार आहे काय, असा सवाल जाणकारांकडून उपस्थित केला जातो आहे. ———————————————————–