अजितदादांची शहरातील स्थानिक नेत्यांना चपराक?

आपले पिंपरी चिंचवड शहरातील सगळे स्थानिक पुढारी, नेते कुचकामी असल्याचे प्रत्यंतर बहुदा, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना आले असावे. त्यामुळे शहरातील जनसामान्यांचे प्रश्न थेट जाणून घेण्यासाठी, त्यांनी आपला प्रशासकीय प्रतिनिधी शहरात पाठविण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड शहरासह पुण्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात कालच्या सोमवारपासून दर सोमवारी अजितदादांचा प्रतिनिधी दुपारपर्यंत नागरिकांची थेट गाऱ्हाणी ऐकणार आहे. शहरातील नागरिकांच्या खऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावर दस्तुरखुद्द निवारण करण्यासाठी, ही सोय करण्यात आली आहे. मात्र, शहरातील स्थानिक नेत्यांच्या दृष्टीने ही चपराक असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. तरीही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यापर्यंत पोहोचण्याचा सरळ मार्ग म्हणून या सोयीची प्रशंसा केली जात आहे.

पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेत काहीही करून पुन्हा सत्ता संपादित करायचीच, हा आपला उद्देश नामदार अजितदादांनी अधोरेखित पद्धतीने स्पष्ट केला आहे. या दोनही शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात आपले प्रशासकीय यंत्रणेतील स्वीय सहायक त्यांनी, नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे शहरातील नागरिकांचा राज्य शासनाशी आणि पालकमंत्र्यांशी थेट संपर्क साधण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. कालच्या सोमवारपासून सुरू झालेल्या या सोयीचा लाभ चौदा लोकांनी घेतला. हे चौदा लोक या सोयीमुळे राज्य शासनाशी आणि पालकमंत्र्यांशी सरळ पद्धतीने जोडले गेले आहेत. निदान आपले म्हणणे आपण शासन यंत्रणेपर्यंत पोहोचवू शकलो, हे देखील या नागरिकांसाठी महत्वाचे ठरले आहे. त्यांचे प्रश्न आणि गाऱ्हाणी यांच्यावर काही प्रमाणात तरी निवारण झाले तर “सोन्याहून पिवळे”, अशी या निवेदनकर्त्यांची धारणा आहे. मध्यस्थ अगर माध्यमांशिवाय थेट संपर्क हे यातील मुख्य गमक आहे.

२०१७च्या महापालिका निवडणुकीत पराभव झाला, त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे मावळ लोकसभेत पार्थ पवारांना मात खावी लागली, याचे सततचे शल्य नामदार अजितदादांच्या मनात आहे. त्यामुळे थेट नागरिकांपर्यंत जाण्याचा हा मार्ग, त्यांनी अवलंबला असावा. मात्र, स्थानिक नेते शहरातील नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यात आणि शासनसंबंधी प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचविण्यात कुचकामी असल्याचेही त्यांनी, ही सोय उपलब्ध करून स्पष्ट केले आहे. २०१७च्या महापालिका निवडणुकीपूर्वी ज्या त्वेषाने आणि वेगाने आताच्या सत्ताधारी भाजपाईंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर हल्ले केले, तो त्वेष आणि वेग २०२२च्या महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीने भाजपविरोधात दाखवणे आवश्यक होते. मात्र, पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, हे करण्यात नात्यागोत्यांच्या आणि साट्यालोट्याच्या राजकारणामुळे कमी पडले आहेत. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष आणि माजी महापौर योगेश बहल यांनी, आम्ही अजूनही विरोधकांच्या मानसिकतेत नाही, याची कबुलीही नुकतीच पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

भाजपाईंनी आपल्या सत्ताकाळात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अब्रूचे काढलेले धिंडवडे आणि चालवलेला भ्रष्टाचारी नंगानाच शहरवासीयांना असहनीय झाला आहे. आशा परिस्थितीत शहरवासीयांना दिलासा देऊन, आम्ही आहोत, हे दर्शविण्याचे काम शहर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून अपेक्षित होते. मात्र, शहर राष्ट्रवादी या अपेक्षांना खरे उतरले नाहीत, हे चक्षुर्वै सत्य आहे. पिंपरी चिंचवड शहरातील जनसामान्यांचे म्हणणे निदान ऐकून घेण्याची आणि त्यांना अपेक्षापूर्तीचा दिलासा देण्याची सोय, म्हणून थेट राज्य शासनाचा प्रशासकीय प्रतिनिधी, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी शहरवासीयांना उपलब्ध करून दिला आहे. स्थानिक पातळीवर आपली सूनवाई झाली नाही, तरचा पर्याय म्हणून ही प्रशासकीय सोय आहे. राजकीय व्यक्तीपेक्षा, प्रशासकीय व्यक्ती, नागरिकांना त्यामुळेच देण्यात आला आहे. मात्र, पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना, नामदार अजितदादांनी दिलेली ही शुद्ध चपराक असून, आता तरी सुधरा असा संदेश, यातून या नेत्यांना दिला आहे काय, यावर शहरात चर्चा आहे.

————————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×