आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून महापौर माई ढोरे यांचा सत्कार!
पिंपरी (दि.१७डिसेंबर, २०२१)
गेल्या बऱ्याच काळापासून त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मागणी पिंपरी चिंचवड शहरातील आंबेडकरी जनतेकडून होत होती. त्यासाठी अनेकदा निवेदने देणे आणि आंदोलने करण्याचा प्रयत्न झाला आहे. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन पिंपरीच्या आंबेडकर चौकातच माता रमाईंचा पुतळा आणि त्या जोडीने भित्तिचित्रे उभारण्याचे मान्य झाल्यामुळे आंबेडकरी जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करून आंबेडकरी जनतेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात शहराच्या प्रथम नागरिक महापौर उषा मनोहर तथा माई ढोरे यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसदस्या सुलक्षणा शिलवंत धर, भाजपचे सत्तारूढ पक्षनेते नामदेवराव ढाके, नगरसदस्या माधवी राजेंद्र राजापुरे, नगरसदस्य सागर अंघोळकर, अंबरनाथ कांबळे, माता रमाई स्मृतिस्थानाबाबत आग्रही असलेले कार्यकर्ते संतोष जोगदंड, धम्मराज साळवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
माता रमाई स्मृतिस्थान कृती समितीच्या वतीने झालेल्या या सत्कार प्रसंगी महापौर माई ढोरे यांनी माता रमाई बद्दल गौरवोद्गार काढताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अत्युच्च अशा कारकिर्दीचा माता रमाई या पाया आहेत. त्यांनी केलेला असीम त्याग आणि धैर्य यांच्या जोरावरच बाबासाहेब देशासाठी आणि समाजासाठी, एक आगळेवेगळे कार्य उभे करू शकले. कौटुंबिक अभावांची झळ बाबासाहेबांपर्यंत पोहोचू न देण्याची आणि कोणत्याही अपेक्षा न ठेवता आपले कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी माता रमाईंनी पार पाडली. या त्यागमूर्ती रमाईंचे आमच्यावर उपकारच आहेत. त्यांची प्रेरणा समाजाला मिळावी म्हणून माता रमाईंच्या स्मृतिस्थानाचा हा विषय प्रशासनानेही मार्गी लावला आहे. महापौर माई ढोरे यांचा प्रातिनिधिक सत्कार करताना राष्ट्रवादीच्या नगरसदस्या सुलक्षणा धर यांनी माईंचे आणि महापालिका प्रशासनाने आभार मानले. कोणताही पक्षीय अभिनिवेष न ठेवता माईंनी या माता रमाई स्मृतिस्थानाचा विषय मार्गी लावला. माई म्हणजे आई आणि एक आईने समस्त जनतेच्या आई असलेल्या माता रमाईंना दिलेली ही आदरांजली आहे, अशा शब्दांत धर यांनी महापौर माईंचे आभार व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या उपस्थितीत नुकतीच माता रमाई यांच्या स्मृतिस्थानाबाबत महापालिकेत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत महापौर माई ढोरे यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा देखील सहभागी होती. त्या बैठकीत भीमराव आंबेडकर आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांसमोर या स्मृतिस्थानाबाबत शक्य तेव्हढ्या लवकर निर्णय घेण्याचे मान्य करण्यात आले होते. सुमारे दीड कोटी खर्चाच्या प्रकल्पाची माहिती देखील देण्यात आली होती. त्यानंतर आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे सगळी यंत्रणा कामाला लागली आणि माता रमाई स्मृतिस्थान प्रकल्पाला युद्धपातळीवर मान्यता देण्यात आली. त्यानुसार नियोजित जागा पुणे महानगर परिवहन मंडळाच्या ताब्यातून महापालिकेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. माता रमाईंच्या स्मृतिस्थानाचा हा प्रकल्प येत्या दोन महिन्यात सुरू होईल, असे आश्वासन पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
———————————————————