१००कोटींचा खर्च औंध रावेत रस्त्यासाठी, की भाजपाईंच्या निवडणूक निधीसाठी!
सलग आणि जास्त वाहनप्रवाह असतानाही संपूर्ण रस्ता सुस्थितीत असताना, रस्त्यावर कोणताही अडथळा नसताना, केवळ सत्ताधारी भाजपाईंच्या आग्रहाखातर औंध रावेत रस्त्यावर सुमारे एकशे दोन कोटी रुपये खर्च करण्याचा घाट घातला जात आहे. हा खर्च भाजपाई सत्ताधाऱ्यांना येत्या महापालिका निवडणुकीचा खर्च मिळवून देण्याचा उद्देशानेच केला जात असल्याचा आरोप पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे आणि शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाई आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या सांगण्यावरून या रस्त्याचे काम करण्यात येत असल्याचे महापलिकेच्या स्थायी समिती ठरावात नमूद असल्याची माहिती या उभयतांनी दिली आहे. त्यामुळेच महापालिका प्रशासन, सत्ताधारी भाजपाईंच्या घरचे बटीक असल्याच्या या उभयतांच्या दाव्यात तथ्यांश असावा, असे समजण्यास नक्कीच वाव आहे.
सुमारे चौदा किलोमीटरच्या या रस्त्यावर नागरी रस्तासुधार पद्धतीनुसार अर्थात अर्बन स्ट्रीट डिझाईनप्रमाणे काम करण्यास दोन टप्प्यात १४ कोटी, ७४ लाख, ६३ हजार ६०४ रुपये आणि १६ कोटी, २७ लाख, २७ हजार ४७४ रुपये, संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण आणि पावसाळी व मलजल पाणी वाहनाचे चेंबर समपातळीवर करण्याच्या कामासाठी ३० कोटी, ९६ लाख, ४६ हजार ११२ रुपये असा सुमारे ६२ कोटींचा खर्च महापालिकेमार्फत निविदांद्वारे करण्यात येत आहे. तर रस्त्याचा दोनहि बाजूंना प्रत्येकी सात मीटरचा पादचारी मार्ग आणि त्या पादचारी मार्गाचे स्मार्ट सिटी रस्ता पद्धतीने सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे चाळीस कोटींचे काम थेट पद्धतीने, निविदेशिवाय देण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. या रस्त्यावर सुमारे शंभर कोटी रुपये खर्च करण्याची खरोखरच गरज आहे काय, याचे चक्षुर्वै सत्य कळावे म्हणून, पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे आणि शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी संपूर्ण रस्त्याचा पत्रकारांसमवेत पाहणी दौरा केला.
या संपूर्ण पाहणीत रस्ता सुस्थितीत असल्याचे तर स्पष्ट झालेच, शिवाय मोठा वाहतूक ताण असलेला हा रस्ता दोनहि बाजूंनी प्रत्येकी सात मीटर म्हणजे जवळपास पंचवीस फूट सुशोभित पादचारी मार्ग करून कमी करणे, वाहतुकीस अडचणीचे आणि अपघातास निमंत्रण देणारे ठरणार असल्याचेही निदर्शनास आले. मग हा सुमारे शंभर कोटी खर्चाचा घाट का घातला जात आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय पादचारी मार्ग तयार करून त्याचे स्मार्ट सिटीप्रमाणे सुशोभिकरणाच्या सुमारे चाळीस कोटींच्या कामाची थेट बक्षिसी एखाद्या ठेकेदाराला का देण्यात येत आहे, हेही अनाकलनीय आहे. या रस्त्यावर नमुना पादचारी मार्ग तयार करण्यात येत असताना राहुल कलाटे आणि प्रशांत शितोळे यांनी याबाबत महापलिकेच्या संबंधित बीआरटी आणि स्मार्ट सिटी विभागाकडे चौकशी केली असता, काम नक्की कोणता विभाग करतो आहे, यावर सरळसरळ टोलवाटोलवी करण्यात आली.
अधिकारी, भाजपचा निवडणूक निधी गोळा करताहेत काय?
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बीआरटी आणि स्मार्ट सिटी विभागाच्या टोलवाटोलवी नंतर कलाटे, शितोळे यांनी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. आश्चर्यकारक बाब म्हणजे आयुक्तही या थेट देण्यात येणाऱ्या कामाबद्दल अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले आहे. थोडक्यात पादचारी मार्गाचे हे काम थेट पद्धतीने एखाद्या ठेकेदाराला देण्यामागे, भाजपाई माजी शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा आग्रह कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा थेट पद्धतीने देण्यात येणारे काम, मग भाजपाईंचा निवडणूक निधी गोळा करण्याचा कार्यक्रम असल्याचा कलाटे, शितोळे यांचा आरोप खरा असल्यास नवल वाटू नये. त्याहीपेक्षा विदारक बाब म्हणजे या निधी उभारणीस महापलिकेच्या अधिकाऱ्यांनी हातभार लावावा, हे मात्र अतिच झाले आहे. तूर्तास आयुक्तांच्या लक्षात, लक्ष्मणभाऊ आणि अधिकाऱ्यांचा खरा कार्यक्रम आल्यामुळे या थेट देण्यात येणाऱ्या कामाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. आता महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी तयार केलेला हा भाजपाई निधी संकलनाचा कार्यक्रम पुढे रेटला जातो, अगर बासनात गुंडाळून ठेवला जातो, त्याहीपेक्षा शितोळे, कलाटे ही द्वयी किती गांभीर्याने या प्रकरणाला तडीस नेतात अगर पुढे जाऊन शांत होतात, हे सध्यातरी कालसापेक्ष आहे!
————————————————————-