शहराच्या राजकारणातील एक अपरिहार्य व्यक्तिमत्व, गजानन बाबर अनंतात विलीन.

“तुम्ही काहीही लिहा, काहीही छापा, गजानन बाबर हे नाव लिहिल्या, छापल्याशिवाय तुमची बातमी आणि शहराचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही” ही अपरिहार्यता निर्माण करणारे एक बहुआयामी, बहुपेडी राजकीय व्यक्तिमत्व आज अनंतात विलीन झाले. गेली पन्नास वर्षे या शहराच्या राजकारण, समाजकारण यावर आपली अमीट छाप सोडून ते निघून गेले. गजानन धरमसी बाबर हे नाव आता कायमस्वरूपी या पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहास, भूगोलाचे एक अपिराहार्य पान बनले आहेत.

रेशन दुकानावरचा एक हमाल ते, लोकनियुक्त खासदार हा त्यांचा जीवनप्रवास कोणालाही आश्चर्यचकित करणारा आहे. या शहराच्या राजकारण, समाजकारणाचे एक चालतेबोलते विद्यापीठ म्हणून त्यांनी त्यांचे नाव या शहराच्या छातीवर कायमस्वरूपी गोंदवून ठेवले आहे. १९७२ च्या दरम्यान आकुर्डीच्या काळभोरनागर येथील चाळमालक आणि भाडेकरू यांच्या वादातून त्यांनी शहरात पहिली शिवसेनेची शाखा उभी केली आणि २००९ साली मावळ लोकसभा मतदारसंघाचे ते पहिले खासदार झाले. हा पहिलटकऱ्याचा मान गजानन बाबर यांनी आयुष्यभर सांभाळला. पिंपरी चिंचवड नवनगरपालिकेचे शिवसेनेचे पाहिले लोकनियुक्त नगरसदस्य, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पहिले लोकनियुक्त सदस्य, हवेली विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासातील पाहिले शिवसेनेचे आमदार, नव्याने निर्माण झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे पाहिले खासदार असा हा पाहिलेपणाचा मान गजानन बाबर यांनी पटकावला आहे.

“बाबर कोणाला काही देत नाही, कोणाचे काही घेत नाही!” या पालूपदाच्या जोरावर, गजानन बाबर यांनी शहरात राजकारण आणि समाजकारण केले. शहरातील कष्टकरी, कामगारांचे आणि त्यांच्याबरोबरीनेच व्यापारी, उद्योगपतींचेही नेतृत्व त्यांनी केले. एकाच वेळी पथारी, हातगाडीवाल्यांचे नेतृत्व करताना, त्यांना हटवा म्हणणाऱ्या व्यापाऱ्यांचे, दुकानदारांचे नेतृत्वही त्यांच्याकडेच होते. भाजीमंडईच्या आतले व्यापारी आणि त्यांच्या विरोधात जाऊन व्यवसाय करणारे मंडईबाहेरचे पथारीवाले यांचे एकाचवेळी नेतृत्व करण्याची किमया गजानन बाबर हेच साधू शकले आहेत. स्वस्त धान्य अर्थात रेशन दुकानदार आणि ग्राहक या दोनही संघटना बाबरांच्या नेतृत्वाखाली काम करीत होत्या.

पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात शिवसेनेचा ठसा उमटवत असतानाच समाजवादी, साम्यवादी चळवळ, काँग्रेस  आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष या कोणालाही आपले राजकारण गजानन बाबर यांना विचारात घेतल्याशिवाय करताच येणार नाही, ही अपरिहार्यता निर्माण करण्याचे जे गणित बाबरांनी साधले होते, त्या गणिताचे समीकरण आजपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तिमत्वाला अनाकलनीय राहिले आहे. स्वयंभू आणि स्वरचित राजकारण हे बाबरांच्या शैलीचे वैशिष्ठ्य राहिले आहे. आपले असणे कोणालाही नाकारता येऊ नये आणि आपले नसणे कोणालाही खटकावे, अशी परिस्थिती निर्माण करणे ही अशक्यप्राय गोष्ट बाबरांनी लीलया साधली.

गजानन धरमसी बाबर हे व्यक्तिमत्व राजकारण आणि समाजकारणाचे चालतेबोलते विद्यापीठ होते. असे हे व्यक्तिमत्व आज अनंतात विलीन झाले. त्यांची उणीव भरून काढणारे व्यक्तित्व निर्माण होणे, अशक्यप्राय आहे. त्यांना “नवनायक” परिवाराच्या आणि ढसाळ कुटुंबियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!

————————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×