पंतप्रधानांचा राजशिष्टाचार, भाजपाई हस्तक्षेप, महाराष्ट्राची अस्मिता आणि अजितदादांचा सुसंस्कृतपणा!

संतशिरोमणी तुकोबारायांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. देहू संस्थानने त्यासाठी पंतप्रधानांना खास निमंत्रण दिले होते. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पाठांतर केलेल्या मराठीच्या एकूण सहा वाक्यांसह आपले नेहमीप्रमाणेचे भाषणही केले. सगळ्या सुरळीत प्रकारात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना आपले विचार मांडण्याची आणि राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी नाकारून कार्यक्रम संपला. कार्यक्रमाच्या सुत्रसंचालकाने विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव भाषणासाठी पुकारण्याचे टाळून सरळ पंतप्रधान मोदींना आपले विचार मांडण्याची विनंती केली. अजितदादा भाषण करणार नाहीत याचे आश्चर्य पंतप्रधानांनाही वाटले, अगर त्यांनी तसे दाखवले. आपले नाव न पुकारता सरळ पंतप्रधानांचे नाव पुकारल्यामुळे अजितदादाही काहीसे बुचकाळ्यात पडले असल्यास नवल नको. मात्र, एकदा पंतप्रधानांचे नाव पुकारल्यावर पुन्हा त्यांना थांबविणे योग्य नाही म्हणून अजितदादांनी “आप बोलीये” असे म्हणून समजूतदारपणा दाखवला.

मात्र, या कार्यक्रमाचे भाजपाई कवित्व दिवसभर संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले. अजितदादा पवार यांना या कार्यक्रमात बोलण्याची संधी नाकारून उभ्या महाराष्ट्राचा अपमान केला, ही भावना राज्यात निर्माण झाली. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात राज्याच्या विधानसभेचे भाजपाई विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीसांना भाषण करता आले, मग उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना ही संधी का नाकारण्यात आली, हा प्रश्न अगदीच योग्य आणि राज्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. राज्यातील सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री तेथे उपस्थित होते. मग त्यांना आपले म्हणणे जाहीरपणे मांडण्याची संधी का नाकारण्यात आली याबाबत राज्यभर सध्या चर्चा सुरू आहे. याबाबत देहू संस्थानने, जे या कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक होते, पंतप्रधान कार्यालयाकडून आलेल्या राजशिष्टाचाराच्या आड लपण्याचा प्रयत्न केला आहे. मोदींजींनी तर स्वतःच, खोटे का होईना, आश्चर्य व्यक्त करून या वादातून काढता पाय घेतला आहे.

या संपूर्ण प्रकरणात पंतप्रधानांचा राजशिष्टाचार आणि त्यात झालेला भाजपाई हस्तक्षेप यावर राज्यभर नाराजी व्यक्त करण्यात आली. यात प्रामुख्याने अगदी ठरवून राज्याची अस्मिता दुखावली गेली असे वाटणे रास्तच आहे. मात्र, त्याहीपेक्षा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचा सुसंस्कृतपणा आणि समजूतदारपणा प्राकर्षाने अधोरेखित झाला. कोणत्या पक्षाचे आहेत, यापेक्षा मोदीजी देशाचे पंतप्रधान आणि त्यांचे नाव एकदा पुकारले गेल्यावर त्यांना थांबविणे अयोग्य आहे, याचे भान अजितदादांनी ठेवले हे महत्त्वाचे. मात्र हा उपमुख्यमंत्र्याचा अपमान आणि अर्थातच राज्याच्या अस्मितेला धक्का देण्याचा प्रकार किती गदळ पद्धतीने केला गेला, यावर चर्चा होणे आगत्याचे आहे.

त्यासाठी सर्वप्रथम भाजपाई शिष्टपणा अंगिकारणाऱ्या पंतप्रधान कार्यालयाच्या राजशिष्टाचारावर बोलले पाहिजे. याबाबतची रुढ पद्धत अशी की, एखादा कार्यक्रम एखाद्या महनीय पदसिद्ध व्यक्तीने स्वीकारला, की त्या कार्यक्रमाची रूपरेषा, व्यासपीठावरील उपस्थितांची माहिती आणि आसनव्यवस्था, कार्यक्रमात बोलणाऱ्यांची यादी याची माहिती संबंधित महनीय व्यक्तीच्या कार्यालयात पाठवावी लागते. सहसा या महितीप्रमाणेच कार्यक्रम ठरविला आणि पार पाडला जातो. संबंधित कार्यालयाकडून केवळ बोलणाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आता अजितदादांचे नाव त्या यादीत होते किंवा कसे, याचा शोध घ्यावा लागेल. परिसराचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे आणि आमदार सुनील शेळके यांना तर कार्यक्रमाचे निमंत्रणही नव्हते. मग देहू संस्थानने हा कार्यक्रम आखताना स्वतःचे डोके वापरले नाही काय, असा प्रश्न निर्माण होतो आहे.

जर खासदार आमदारांना निमंत्रण देणे टाळून उपमुख्यमंत्र्यांना भाषण नाकारणे, हा उद्योग संस्थानने केला असेल तर, या संस्थानात काम करणाऱ्यांना तुकोबारायांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही, असे म्हणावे लागेल. असे ज्ञातव्य आहे की हा कार्यक्रम मावळचे भाजपाई माजी आमदार बाळा भेगडे यांच्या आणि अर्थातच त्यांचे भाजपाई नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या पूर्ण हस्तक्षेपाने आखण्यात आला होता. हे खरे असेल तर, देहू संस्थानचे कारभारी त्या संस्थानावर काम करण्यास लायक नाहीत, असेच म्हणावे लागेल. कारण तुकोबारायांची वैश्विकता सांभाळण्याचा वकूब आणि अक्कल या कारभाऱ्यांमध्ये नाही असाच याचा अर्थ होतो.

आता प्रश्न निर्माण होतो तो, पंतप्रधानांच्या राजशिष्टाचाराचा. पंतप्रधान कार्यालयाने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे नावच संबोधनकर्त्यांच्या यादीत टाकले नाही, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, तरीही पंतप्रधानांनी अजितदादा बोलणार नाहीत, यावर आश्चर्य व्यक्त केले. मोदींजींचे हे आश्चर्य व्यक्त करणे खरे असेल, तर आपल्या कार्यालयात नक्की काय चालते, हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना कळत नाही, असे म्हणावे लागेल. त्यांच्या कार्यालयाने त्यांना कार्यक्रमाचा आराखडा सांगितला नसावा काय, असाही प्रश्न आपोआपच निर्माण होतो. त्यापेक्षाही जर हे मोदींजींनी माहीत होते, तर नामदार अजितदादांच्या भाषणाला खुद्द पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, त्यांचे राज्यातील शिष्य देवेंद्रजी फडणवीस आणि जिल्ह्यातील भाजपाई, नामदार अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणाला किती दचकतात याचीही प्रचिती येते.

या सर्व प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सुसंस्कृतपणा आणि समजूतदारपणा मात्र, स्पष्टपणे अधोरेखित झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी पुणे विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागत केले. पंतप्रधानांना कार्यक्रमस्थळापर्यंत सन्मानाने आणले. कार्यक्रम संपल्यावर मुंबईपर्यंत त्यांना सोडण्यासही सोबत गेले. मुंबईपर्यंतच्या प्रवासात अजितदादांनी देहूच्या कार्यक्रमाबाबत कोणताही आक्षेप मोदींजींकडे नोंदवला नाही, अशी चर्चा आहे. हा सुसंस्कृतपणा आणि समजूतदारपणा दाखविल्यामुळे नामदार अजितदादा नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. पंतप्रधानांचा आब राखण्याचे अजितदादांचे हे वर्तन स्पृहणीय, अभिनंदनीय आहेच, त्यासाठी त्यांचे राज्याच्या जनतेला कौतुकच आहे!

———————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×