एकनाथ शिंदेंचे भाजप प्रणित बंड, पाव्हण्याच्या काठीने साप मारण्याचे भाजपाई षडयंत्र?
बंडखोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी भारतीय जनता पक्षाने संधी दिली. सरकार पाडण्याचे पाप आमचे नाही, हे दाखविण्याचा हा प्रयत्न असला तरी, एकनाथ शिंदेंचे हे बंड मोठ्या यंत्रणेचे आणि सखोल तयारीचे फलित आहे आणि अशी यंत्रणा आणि तयारी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारच्या मर्जी आणि सहभागाशिवाय शक्य नाही, हेही स्वयंस्पष्ट सत्य आहे. मात्र, शिवसेना फोडण्याच्या पापाचे धनी शिवसैनिकच आहेत, हे ठसविण्याचा हा प्रयत्न आहे. त्यातही पुन्हा सत्तेवर आपला अंकुश ठेवण्यासाठी केंद्रातील भाजपाई वरिष्ठ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, त्यांच्या मर्जीविरुद्ध, पक्षाची गरज म्हणून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास भाग पाडले आहे, असे दृश्य आतातरी दिसते आहे. मात्र, एकनाथ शिंदेंचे हे बंड गेल्या दहा बारा दिवसातले असल्याचे वाटत असले तरी, हा डाव भाजपाई आणि संघी पद्धतीप्रमाणे बराच पूर्वी, अगदी २०१५ पासून रचला गेला असल्याचे आतल्या गोटातील चर्चेवरून स्पष्ट झाले आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेने भाजपला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर २०१५ च्या सुरुवातीला शिवसेना सरकारमध्ये सामील झाल्यानंतर भाजपने आपली मुळ खेळी सुरू केली, असा राजकीय तज्ज्ञांचा होरा आहे. शिवसेना आपल्याला कधीही अडचणीत आणू शकते, हे भाजपने तेव्हाच लक्षात घेतले होते. तशातच त्यांना एकनाथ शिंदे हा स्वतः उद्धव ठाकरेंनी पक्ष संघटन आणि विधिमंडळ पक्ष सांभाळण्यासाठी विश्वासू म्हणून नेमलेला माणूस गळाला लागला. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची जबाबदारी असलेल्या एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांशी जवळीक बांधली. या जवळीकीतून अनेक आमदारांचे व्यक्तिगत कल्याण करून शिवसेनेत भाजप समर्थकांचा एक वेगळा कौटुंबिक गट तयार केला. शिवसेनेच्या काही ठराविक, म्हणजेच ऐनवेळी आपले ऐकू शकणाऱ्या आमदारांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक गरजा मागविण्यात हात सढळ ठेवणारे एकनाथ शिंदे, आपल्या प्रेमापोटी असे करताहेत, ही भावना आमदारांमध्ये ठरवून निर्माण करण्यात आली. शिवसेनेतच एक वेगळी “एकनाथ सेना” फळू फुलू लागली होती.
तशातच २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारीवर “एकनाथ सेने”च्या लोकांची वर्णी लावण्यात एकनाथ शिंदे आणि त्यांचे बोलविते भाजपाई शिर्षस्थ यशस्वी झाले. भाजपबरोबरचे राज्य सरकार पाच वर्षं टिकले तर, शिवसेनेचा विधिमंडळ पक्ष आणि बऱ्याच अंशी संघटन देखील हातातून निसटणची शक्यता असल्याची कुणकुण काही लोकांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली. यामागे एकनाथ शिंदे आहेत, यावर शिवसेना प्रमुखांसह कोणाचाही विश्वास बसणे शक्य नव्हते. म्हणून त्याबाजूने सर्वच अंधारात राहिले. मात्र, भाजपबरोबर पुन्हा सरकार स्थापने म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणे, हे लक्षात आल्यामुळे आपले कौटुंबिक हितचिंतक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात आपल्यावर पुत्रवत प्रेम करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्वर्यू शरद पवार यांच्या मध्यस्थिने “महाविकास आघाडीचा” जन्म झाला. शिवसेनेतच कुऱ्हाडीचा दांडा असून तो शिवसेनेसाठी काळ ठरू शकतो, हे कदाचित धोरणी आणि दूरदृष्टीचे नेते म्हणून ख्यातिप्राप्त शरद पवार यांना माहीत असावे, म्हणून दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री म्हणून पवारसाहेबांनी पुढे आणले. अन्यथा एकनाथ शिंदे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकले असते, असे माहितगार सांगतात.
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाई आटापिटा!
२०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांनी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस कंपूने अनेक कोलांटउड्या मारल्या आणि महाविकास आघाडी सरकारला गोत्यात आणण्याचा एकही हातखंडा सोडला नाही. कोरोना महामारीतील निधी साठी टाळाटाळ, जीएसटी ची थकविलेली देणी, मराठा, धनगर आरक्षणाची बोंब, ओबीसी आरक्षणासाठी त्रिस्तरीय माहिती देण्यात टाळाटाळ अशा प्रशासकीय बाबींबरोबरच अंमलबजावणी संचालनालय अर्थात इडी, केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआय, प्राप्तिकर विभाग अर्थात इन्कम टॅक्स अशा केंद्रीय भाजपाई सरकारच्या अखत्यारीतील शासकीय तपास यंत्रणांचा ससेमिरा महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या लोकांमागे लावून देण्यात आला. तरीही महाविकास आघाडीत बिघाडी होत नाही, हे पाहून आणि एकनाथ खडसे यांच्या विधानपरिषदेवरचा विजय जिव्हारी लागल्यामुळे भाजपने आपल्या एकणध शिंदे या छुप्या हत्याराला वापरण्याचा निर्णय घेतला.
एकनाथ शिंदेंचा वापर म्हणजे पाव्हण्याच्या काठीने साप मारण्याचा प्रकार!
शिवसेनेत असलेला एकनाथ शिंदे हा भाजपचा स्लीपिंग सेल वापरात आणण्याची शेवटची खेळी भाजपाई खेळले. पाव्हण्याच्या काठीने साप मारण्याचा हा प्रकार होता, घाव वर्मी बसला नाही तर काठी पाव्हण्याची मोडेल आणि साप मेला तर आनंदच आहे, अशी ही दुहेरी फायद्याची खेळी होती. महाविकास आघाडीच्या दुर्दैवाने भाजपला अडचणींचा ठरू शकणार साप मारण्यात एकनाथ शिंदे या पाव्हण्याची काठी कमी आली आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि मुख्यमंत्री पदाचे मुख्य भाजपाई दावेदार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
थोडक्यात काय, तर आघाडी सरकार पडण्याचे पाप एकनाथ शिंदे यांचेच, यावर शिक्कामोर्तब करण्याचा हा प्रयत्न आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांना ऐनवेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास भाग पाडून एकनाथ शिंदेंच्या विश्वासार्हतेवर संशय निर्माण करण्याची सोयही भाजपाईंनी करून ठेवली. आता हे सरकार किती काळ चालवायचे, याच्या दोऱ्या भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांच्या मर्जीवर अवलंबून आहे. शिवसेना संपविण्याची गरज भाजपाईंना का पडली असावी, ते यात कितपत यशस्वी झाले, शिवसेना खरेच संपली आहे काय, एकनाथ शिंदेंचे भवितव्य यावर चर्चा पुढच्या भागात.
———————————————————-