अखेर अजितदादा पवारांची राष्ट्रवादी फुटलीच!

अजितदादा पवारांना अगदी पहिल्या झटक्यातच साथ देणाऱ्या पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीने राज्यात पहिल्यांदाच अजितदादांची राष्ट्रवादी फोडण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या कर्तृत्वाची आणि नेतृत्वाची शान म्हणून गणल्या गेलेल्या अगर तसा आव आणण्याचा प्रयत्न केलेल्या पिंपरी चिंचवड शहराने अजितदादांच्या नेतृत्वाला तडा दिला आहे. पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याबरोबरच भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे देखील या राजीनामा सत्रात सामील झाले आहेत. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावर या दोघांबरोबर अजून कोणकोण आहेत याच्या अटकली लावण्याचा प्रयत्न शहरातील राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक करीत आहेत. मात्र, अध्यक्षच बाहेर निघाले म्हणजे त्यांच्या मागे मोठा लोंढा बांध फोडील अशीही चर्चा पिंपरी चिंचवड शहरात होत आहे.

स्वतःच्या हिताचे आणि मतलबी राजकारण करून अजितदादा पवार यांनी भाजपशी मोहोतर लावला खरा, पण अनेकांना स्वतः मागे मेंढरांसारखे ओढत नेले. दिल्ली पासून गल्लीपर्यन्तच्या नेत्या, कार्यकर्त्यांनी भाजपाई खड्ड्यात  स्वतःला झोकून दिले. मात्र, लोकसभा निवडणुकांनी या खालमुंडी मेंढरांना चापटळून पुन्हा माणसात आणले. आता अजितदादांच्या मागे जाऊन भाजपाई खड्डयात पडल्यानंतर सावपे झालेल्या ही समस्त मेंढरे हळूहळू स्वतःचा विचार करू लागली आहेत. त्याचेच साजिवंत उदाहरण म्हणून पुम्परी चिंचवड शहरात घडणाऱ्या घडामोडींकडे पाहावे लागेल. अजितदादा गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि त्यांचे राजकीय काका माजी आमदार विलास लांडे यांसह काही मंडळींनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे. आपले पुढचे राजकारण ओळखून ही मंडळी आता सावपी झाली आहेतच, त्यांच्याबरोबर शहराच्या राजकारणात स्वहिताचा भाग साधण्यासाठी म्हणून अजून काही मंडळी मेंढरांच्या झुली उतरतील अशी अपेक्षाही नक्कीच आहे.

देव्हाऱ्यात शरद पवारांना स्थान देणाऱ्या आणि विठ्ठलाइतकेच मानणाऱ्या वारकरी सांप्रदायिक असलेल्या विलास लांडे यांनी विठ्ठलाच्या परम पर्वाच्या पूर्वसंध्येवर पुन्हा आपल्या राजकीय पांडुरंगापुढे लोटांगण घातले आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी विधान परिषदेची निवडणूक होऊ दिली. कदाचित त्यांना अजितदादा पवार आपल्याला अजूनही न्याय म्हणजेच विधान परिषदेची उमेदवारी देतील अशी अपेक्षा असावी. स्थानिक राजकारणाचा भाग असलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरात राजकीय उलथापालथ होईल आणि राजकीय समीकरणे बदलतील. सर्वप्रथम अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला शहराध्यक्ष शोधावा लागेल.

आता लगेचच शहराध्यक्ष म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे माजी महापौर योगेश बहल आणि माजी नगरसेवक विठ्ठल तथा नाना काटे ही दोन नावे आहेत. त्याहीपेक्षा आता अजितदादांच्या राष्ट्रवादीत कोणकोण राहते हे पाहावे लागेल. अजित गव्हाणे यांच्या सोबतीने किती लोकांना स्वतःच्या राजकारणाचा विचार करण्याची इच्छा निर्माण होईल, हे अजूनही अध्याहृत आहे. अर्थात बाशिंग बांधून नटायला कोणीही तयार होईल. मात्र, नवरदेव शोभलाही पाहिजे हे महत्त्वाचे. 

————————————————

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×