अजितदादा गटाची गोची, तिसऱ्या आघाडीत जाण्याचे संकेत?
सध्या महायुतीत राष्ट्रवादी अजितदादा गटाचा काहीच उपयोग नाही, अशी सुप्त चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवरील भाजपाई, शिवसेना शिंदे गट आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहतात दिसताहेत. शिवाय गेल्या महिन्याभरात झालेल्या अंदाजित निकालाच्या वेगवेगळ्या पाहणी अहवालानुसार अजितदादा गटाचे महायुतीला ओझेच झाले असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे भाजप आपले स्वतःचे नुकसान करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच भाजपच्या जाहिरातींमध्ये आणि फलकांमध्ये अजितदादा पवारांचे छायाचित्र वगळण्यात येते आहे. त्यामुळे अजितदादा गटाची पूर्ण गोची झाली असून या निवडणुकीत आपला निभाव लागेल काय ही शंका अजितदादा आणि त्याच्या आमदारांमध्ये आहे. म्हणूनच आता अजितदादांनी तिसऱ्या आघाडीत जावे आणि महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पाडावी, यावर सध्या गांभीर्याने विचार होत असल्याचे चर्चेत आहे. तसेही तिसरी आघाडी केवळ भाजप विरोधी मतांच्या विभाजनासाठीच वापरात आणली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजपला फायदाच होईल. तसेही कोणताही पाहणी अहवाल अजितदादा गट या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त पंधरा सतरा जागांच्या वर जाताना दिसत नाही. या निवडून येणाऱ्या जागादेखील त्या उमेदवारांच्या स्वतःच्या ताकदीवर निवडून येणार आहेत.
प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी, बच्चू कडूंची प्रहार संघटना, संभाजीराजांची स्वराज संघटना, जानकारांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि यासोबत अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष अशी तिसरी आघाडी निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये. हे स्वतःला तिसरी आघाडी म्हणवणारे लोक वस्तुतः भाजपचीच पिलावळ असल्याचे, त्यांच्या आजपर्यंतच्या राजकरणावरून स्पष्ट झालेलेच आहे. या मंडळींनी आतापर्यंत भाजप आणि त्यांच्या शिर्षस्थ नेत्यांचे लांगुलचालन करण्याशिवाय दुसरे काहीच केले नाही. मात्र, या भाजपला खांद्यावर घेण्याच्या प्रयत्नात सगळ्यात जास्त नुकसान झाले आहे, ते अजितदादा पवार आणि त्यांच्या गटाचे. शरद पवार यांची साथ सोडल्याने यातील काही महाभाग भाजपने आखलेल्या चौकशीच्या फेऱ्यातून वाचले आहेत, पण स्वतःचे राजकीय महत्त्वही गमावून बसले आहेत. भाजपच्या रणनिती नुसार अजितदादा गटाने शरद पवार गटासमोर निवडणूक लढणे अपेक्षित आहे. हीच खरी अजितदादा गटासाठी गोची झाली आहे. शरद पवार यांच्या उमेदवारांसमोर आपले उमेदवार कितपत टिकतील यावर सर्वच काळजीत आहेत. अजितदादा गटाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत यावर सर्वांची चर्चाही झाली आहे.
शरद पवार यांची साथ सोडल्याने त्याहीपेक्षा भाजपला साथ दिल्याने अजितदादा गटाचा लोकाश्रय अगदी नगण्य झाला आहे. भाजपच्या कच्छपी लागण्यापूर्वीचे या गटाचे संपूर्ण राजकारण भाजपविरोधी राहिले आहे. त्यामुळे आता भाजपचे राजकारण जेवढ्या मोठया प्रमाणात हा गट पुढे रेटेल, तेचढ्याच मोठ्या प्रमाणात अजितदादा गटाचा लोकाश्रय घटणार आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजपचे आतापर्यंतचे राजकारण स्पष्टपणे आणि निर्विवादपणे प्रादेशिक पक्षांविरोधात राहिले आहे. त्याचाच भाग म्हणून तर महाराष्ट्रात मजबूत असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोनही पक्ष बुअजपणे अगदी ठरवून फोडले. मात्र, अनेक उपद्व्याप करूनही गेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा उभारी धरून वर आलीच. भाजपच्या दृष्टीने हाच मोठा धक्कादायक प्रकार आहे. शिवाय ज्यांना बरोबर घेतले त्यांचीही कामगिरी फारशी आशादायक ठरली नाही. शिंदेंच्या शिवसेनेने निदान आपली अभरू राखली तरी, पण अजितदादांच्या राष्ट्रवादीची अब्रू पुरती लक्तरे होऊन वेशीवर टांगली गेली आहे.
अजितदादा पवार यांचा काहीच उपयोग भाजपला झालेला नाही, उलट आता हे ओझे सांभाळावे लागत आहे. एकवेळ शिवसेना फूट भाजपला फायद्याची ठरलीही असती. पण राष्ट्रवादी फोडल्यामुळे भाजपचाह जनाधार महाराष्ट्रात तरी घातला आहेच, हे भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांच्याही लक्षात आले आहे. राज्यातील सत्ता हातातून गेलीच आहे, निदान अगदी पीछेहाट होऊन बाजूला फेकले जाण्याची नामुष्की तरी टाळता येईल काय याचा विचार सध्या भाजपाई करीत आहेत. म्हणूनच अजितदादा गटाला बरोबर घेऊन विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यापेक्षा अजितदादांना बाजूला ठेऊन कसा फायदा उचलता येऊ शकतो यावर सध्या भाजपाई गोटात चर्चा सुरू आहे. त्यातूनच मग अजितदादांनी तिसऱ्या आघाडीच्या जाऊन महाविकास आघाडीच्याया मतांना सेंध लावावी असा विचार भाजप करीत असल्यास त्यात वावगे काही वाटू नये. आता यावर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीची वाट लागेल की वाट मिळेल याची आता वाट पहावी लागणार आहे. अर्थात या सर्व प्रकारात ज्याच्या जीवावर हा सगळा खेळ रचला जात आहे, त्या मतदार राजाच्या डोक्यात काय आहे, हा भाग अजून अलाहिदा आहेच!
——————————————