हा तर आपला भ्रष्टाचार झाकण्याचा भाजपाईंचा केविलवाणा, ओंगळ प्रयत्न!

महापालिका प्रशासनाने आणि काही पत्रकारांनी घेतलेल्या माहितीनुसार किरीट सोमय्या यांनी अजित गव्हाणे आणि प्रशांत शितोळे यांच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची कोणतीही माहिती मागविलेली नाही. आपल्याच नेत्याच्या खोट्या सहीने अशी पत्रे पाठविण्याचे हे भाजपाई कारस्थान आहे. सत्ता जाणार, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपले भ्रष्टाचारी कारनामे उघडे पडतील, या भीतीने केलेला हा शहर भाजपाईंचा केविलवाणा आणि ओंगळ प्रयत्न असल्याचे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी “नवनायक”शी संपर्क साधून सांगितले आहे. तर शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शोतोळे यांनी, “आम्ही अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला नाही, दाऊद इब्राहिम तर नक्कीच नाही, त्यामुळे आमची काय पाहिजे ती चौकशी करा, मात्र त्याचबरोबर भाजपच्या सत्ताकाळातील सर्व स्थायी समिती अध्यक्षांचीही चौकशी करा” अशी स्पष्ट प्रतिक्रिया नोंदवली आहे.

भाजपाई प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाने पिंपरी चिंचवड महापालिकेला पोष्टाने दोन पत्रे उपलब्ध झाली आहेत. या पत्रांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे या दोघांच्याही स्थायीसमिती अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील माहिती मागविण्यात आली आहे. मात्र हि पत्रे किरीट सोमय्या यांच्या कार्यालयातून अगर त्यांच्यामार्फत कोणीही पाठविलेली नाहीत, असे चौकशीअंती स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे एखाद्या नेत्याच्या खोट्या सहीने पत्रे पाठविणे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. महापालिका प्रशासनाने या खोट्या पत्रांची गंभीर दखल घेऊन, त्यासंबंधीची तक्रार पोलीस यंत्रणेकडे दाखल करावी. कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या नावाचा वापर करून कोणी खोडसाळपणा करीत असेल, तर त्याला वेळीच धडा शिकवला गेला पाहिजे. हा खोडसाळपणा भाजपच्याच कोणी केला असेल तर त्यालाही याचे परिणाम भोगावे लागले पाहिजेत. पिंपरी चिंचवड महापालिकेने ही तक्रार दाखल केली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तशी तक्रार दाखल करण्याची तयारी शहर राष्ट्रवादीने केली आहे.

आता मूळ प्रश्न निर्माण होतो तो हा की, यातील खरा आरोपी कोण. किरीट सोमय्या यांच्या नावाचा वापर करून नेमक्या राष्ट्रवादीच्याच शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांची चौकशी करण्यामागे शहर राष्ट्रवादीच्या पायात साप सोडण्याच्या प्रयत्नाव्यतिरिक्त दुसरे काहि नाही,असा एक कयास आहे. तर त्याचबरोबरीने तिसऱ्याच कोणत्या यंत्रणेने राष्ट्रवादीला भाजपच्या अंगावर सोडण्याचा केलेला हा उपद्व्याप असल्याचीही चर्चा आहे. यापैकी काहीही असले तरी या प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. किरीट सोमय्या यांच्या नावाचा केलेला खोटा वापर, भाजपाई यंत्रणेतून झाला असेल तर, हा प्रकार म्हणजे केवळ भीतीपोटी केलेला असावा असा कयास आहे. आपण केलेल्या भ्रष्ट, अनाचारी, अनागोंदी कारभाराला झाकण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचेच यातून स्पष्ट होते आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या मंडळींनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपाई सत्ताकाळात झालेल्या एका तरी प्रकरणात सक्षम यंत्रणेकडून चौकाशी लावणे आत्यंतिक गरजेचे झाले आहे, हे मात्र खरे!

————————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×