होय, देश धोक्याच्या पातळीवर उभा आहे! -अबू आसिम आझमी
पिंपरी (२२ मे, २०२२)
आपला देश आज अराजकता, भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी यांच्यामुळे धोक्याच्या पातळीवर उभा आहे. देशात कधीही मोठा नरसंहार होऊ शकतो. श्रीलंका, पाकिस्थान यांच्यापेक्षा आपली अवस्था जास्त बिकट होत चालली आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर आम्हीही सहमत आहोत. देशातील मूळच्या प्रश्नांवरून होणारा जनक्षोभ दुसरीकडे वळविण्यासाठी भाजप मंदिर मस्जिद, हिंदू मुस्लिम वाद ठरवून पेटवीत आहे. नवनवीन वाद उकरून काढून देशातील धार्मिक आणि जातीय सलोखा बिघडविण्याचे कुटील कारस्थान केंद्रातील सत्ताधारी करीत आहेत. असे मत समाजवादी पक्षाचे मुंबई जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी पिंपरी येथे व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड शहर समाजवादी पक्षाचे उपाध्यक्ष बी. डी. यादव यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी अबू आझमी यांनी शहराची धावती भेट घेतली. उद्घाटनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले की, देशाच्या मूलभूत विकासाकडे दुर्लक्ष करून पन्नास हजार कोटींचे नवीन संसद भवन, राष्ट्रपती भवन उभे करण्याचा घाट घातला जात आहे. याबरोबरच भारताचे संविधानही बदलण्याचा डाव आखला जात जात आहे. वस्तुतः या रकमेतून चांगल्या शाळा, रुग्णालये, नवीन उद्योगांना मदत असे विकासाचे अनेक प्रकल्प उभे राहू शकतात. मात्र, विकासाची भाषा कोणीच बोलायला तयार नाही.
धर्मनिरपेक्ष पद्धतीवर महाराष्ट्राचे महाविकास आघाडीचे सरकार चालेल, या भरवशावर समाजवादी पक्षाने आघाडी सरकारमध्ये सहभाग घेतला. मात्र येथे कोण किती जादा हिंदुत्ववादी आहे याच्यावरच सगळे राजकारण चालले आहे. खरे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सरकारसाठी धर्मनिरपेक्ष चेहरा स्वीकारावा आणि राज्यातील सामान्यजनांना आश्वस्थ करावे. मस्जिदिवरचा भोंगा, हनुमान चालीसा अशा निरर्थक बाबींवर आघाडी सरकारला गुंतवून ठेवण्याचे हे षडयंत्र आहे, असेही अबू आझमी यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले.
अबू आझमी यांच्या या पत्रकार परिषदेत समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष रफिक कुरेशी, शहर प्रभारी अनिस अहमद, शहर उपाध्यक्ष बी. डी. यादव, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रवी यादव, पिंपरी विधानसभा अध्यक्ष कमलेश यादव, शहर प्रवक्ता नरेंद्र पवार, महासचिव प्रदीप यादव, शहर संघटक रवींद्र यादव आदी उपस्थित होते.
यावेळी अबू आझमी पुढे म्हणाले की, देशातील एकंदरीत परिस्थिती भयानक आहे. भाजपाचे नेते हिंदू मुस्लीम विषयावर बोलतात, परंतु विकासावर बोलत नाहीत. त्यांनी मंदिर मशीद वादामुळे संविधान धोक्यात आणले आहे. बाबरी मशिदीचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देशातील मुसलमानांनी स्वीकारला त्याचा आदर केला. पण आता ज्ञानवापी मशिदीचा नवीन वाद पुढे आणला जात आहे. यातून दलितांचे आरक्षण आणि मुस्लिमांचा अल्पसंख्याकांचा दर्जा संपवण्याचा यांचा कुटील डाव आहे. आरक्षणाचा उपयोग वंचितांना होत आहे. परंतु देशात रेल्वे सारखे मोठे सार्वजनिक उद्योग विकले जात आहेत. नोकऱ्या कमी होत आहेत. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, आरोग्य, पाणी या समस्यांवरील नागरिकांचा रोष व्यक्त होऊ नये, म्हणून, विनाकारण पुन्हा पुन्हा हिंदू मुस्लिम आणि मंदिर मशीद तसेच हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला जात आहे.
महाविकास आघाडी सरकारने मौलाना अब्दुल कलाम आझाद महामंडळाचा बंद केलेला निधी पुन्हा सुरू करावा. इंधनावरील कर महाविकास आघाडी सरकारनेने कमी करावा. मुस्लिमांना ५ टक्के आणि मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देऊ असे सांगून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. संसदेच्या मान्यतेशिवाय आणि आरक्षणाचा कोटा वाढवून दिल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही हे माहीत असतानाही केवळ मतांच्या टक्केवारीसाठी घोळ घातला जात आहे. श्रीलंके सारखी भारताची परिस्थिती होऊ नये, यासाठी सर्व नागरिकांनी तसेच सर्व पक्षांनी संविधानाचा आदर आणि पालन केले पाहिजे असेही आवाहन अबू आझमी यांनी केले. राज ठाकरे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे स्वतःच्याच राजकारणावर त्रस्त आहेत. राज ठाकरे यांनी जे पेरले तेच उगवणार आहे. “नफरत का जवाब नफरत से मिलेगा”. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे. याबाबत त्यांनी उत्तर भारतीय नागरिकांची माफी मागावी अशी ही मागणी या पत्रकार परिषदेत अबू आझमी यांनी केली.
–——————————————————-