आपल्या शहारात लँड माफिया सारखे नेट माफिया तयार होतील! – राजू मिसाळ
- पिंपरी (प्रतिनिधी)
लँड माफिया, वाळू माफिया यांसारखे नेट माफिया आपल्या पिंपरी चिंचवड शहरात तयार होतील. ४८ कोअरच्या एकशे वीस किलोमीटर ऑप्टिक फायबर लाइन ताकल्याचा दावा स्मार्ट सिटी विभागाने केला आहे. या लाईन नक्की कोण वापरतात याचा शोध घेतला पाहिजे. पिंपरी चिंचवड महापालिकेची ही मालमत्ता कोणाच्या ताब्यात आहे? असा सवाल पिंरी चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत केला.
महापालिकेच्या डाटा चोरीबद्दल माहिती देण्यासाठी मिसाळ यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या डाटा चोरीची माहिती देताना मिसाळ यांनी स्मार्ट सिटी विभागाच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली.
या विभागाचा एकंदर करभारच आतबट्ट्याचा असून महापालिकेचा संगणक विभाग आणि स्मार्टसिटी विभाग काय घोळ घालताहेत नाही, असा आरोप करून मिसाळ म्हणाले की, पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार संबंधीत ठेकेदाराने पोलिसात केली आहे. डाटा नुकसान महापालिकेचे झाले असेल तर संबंधीत विभागाने तक्रार का केली नाही, शिवाय तक्रार दाखल करण्यासाठी दहा दिवस उशीर का, हे सर्व संशयास्पद वाटते. जनतेच्या पैशाची लूट करण्याचा हा वेगळा मार्ग तर नाहीना, असा सवालही महापालिकेचे विरोधी पक्षनेते यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.