शहराचा राजकीय पोत पुन्हा बदलतोय ?

सातत्याने घडत जाणारे बदल, वाढणाऱ्या परिसीमा आणि वाढणारी लोकसंख्या या सर्वांना सामावून घेणारी अशी या पिंपरी चिंचवड  शहराची वाटचाल राहिली आहे. अत्यंत नेकीने आणि निकराने होणारे प्रत्येक बदल सहजतेने पचवून हे शहर घडत गेले आहे. १९७० साली स्थापन झालेल्या या शहरात सामाजिक, आर्थिक बदलांबरोबरच राजकीय बदलही होत गेले. अत्यंत मोठ्या प्रमाणात झालेले हे बदल इतके मजेशीर आणि चमत्कारीक आहेत, की या शहराने प्रत्येक वेळी एक वेगळे टोक गाठलेले आहे. शहरातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावत असताना सामान्य मजूर देखील रोजच्या गरजा सोडून चैनींच्या वस्तूंकडे वळू लागला आहे. सामाजिक स्तरातही या शहरात मोठे आणि लक्षात येण्याजोगे बदल घडले आहेत. त्याचबरोबर या शहराचा राजकीय पोत ( Political Texture ) देखील मोठ्या प्रमाणात बदलत गेला आहे. अनेक राजकीय प्रवाह आणि राजकीय विचारसरण्या या शहराने पचविल्या आणि अंगीकारल्या आहेत. अनेक स्थित्यंतरानंतर आता शहराचा राजकीय पोत पुन्हा बदलतो आहे काय असे वाटू लागले आहे. 

उपरोक्त मुद्द्यावर चर्चा करीत असताना या शहराचा मूळ राजकीय पोत आणि त्यात होत गेलेले बदल याची पहिल्यांदा माहिती घ्यावी लागेल. पुणे शहर वगळता उर्वरित हवेली तालुक्याचे आमदार अण्णासाहेब मगर यांच्या नेतृत्वाखाली या शहराची पायाभरणी झाली. आमदार अण्णासाहेब मगर या शहराचे पहिले पदसिद्ध नगराध्यक्ष झाले. भोसरी पिंपरी चिंचवड आणि आकुर्डी निगडी यातील ग्रामपंचायत सदस्य व सरपंच या नगरपालिकेचे पदसिद्ध नगरसदस्य झाले. स्वातंत्र्यपूर्व काळातील चाफेकरांचा वाडा पिंपरीतील राष्ट्रीय पाठशाळा आणि काँग्रेस समाजवादी पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि जनसंघाचा राजकीय वारसा, त्याचबरोबर ७२ च्या दुष्काळात या शहरात स्थिरावलेले दलित पददलित कष्टकरी कामगार ही या शहराचे राजकीय जडणघडण. तसेच कामगार बहुल भाग असल्यामुळे या शहरात कामगार चळवळ ही बऱ्यापैकी मूळ धरून होती. सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धापासून  ९० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत या शहराला कामगार चळवळीचा मोठा वारसा होता. राजकीय पक्ष या पातळीवर अगदी सुरुवातीला शेतकरी कामगार पक्ष आणि समाजवादी पक्ष, त्यानंतर मोठा कार्यकाळ काँग्रेसचा आणि आता भाजपचा वरचष्मा या शहरावर राहिला आहे. मात्र पुन्हा मोठ्या प्रमाणात या शहरात राजकीय बदल होऊ घातले आहेत. आता शहराच्या पोत पुन्हा बदलू लागला आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात झालेले मोठे बदल या शहराचा राजकीय पोत बदलण्यास कारणीभूत ठरले आहेत. पहिल्यांदा शिवसेना फोडून वेगळे झालेले एकनाथ शिंदे आणि नंतर राष्ट्रवादी फोडून आपणच राष्ट्रवादी असा डग्गा वाजवणारे अजितदादा पवार भाजपच्या कच्छपी लागले आणि भाजपशी मोहोतर करून सरकार स्थापन  करते झाले. या स्थित्यंतरानंतर पिंपरी चिंचवड शहरातही मोठे बदल घडत आहेत. १९८६ साली पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक झाली. सुरुवातीच्या दोन निवडणुकांमध्ये शहरावर काँगेस पक्षाची सत्ता होती. त्यानंतरची पंधरा वर्षे म्हणजेच तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसची निरंकुश सत्ता शहरात होती. या पंधरा वर्षात शहराच्या राजकारणात एकमेव पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थान होते. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या जीवावर मोठे झालेले काही शहरातील स्थानिक नेते राष्ट्रवादीवर श्वानसमान लघुशंका करते झाले. २०१७च्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत तर या नतद्रष्टान्नी राष्ट्रवादीतील बहुतांश मंडळींना आपल्या नादी लावून भाजपची सत्ता महापालिकेत आणली. हा कारनामा करून राष्ट्रवादीवर या मंडळींनी चक्क दिर्घशंकाच उरकली. 

वस्तुतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे या शहराच्या राजकीय पटलावर एकमेकांचे शत्रू म्हणून उभे ठाकले होते. शहरातील शिवसेनेने देखील हे शत्रुत्व निभावले. मात्र, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी स्वस्वार्थाचाच विचार करून भाजपाई कंपूत आपली राहुटी ठोकली. अपयश आले तरी अपयशाचे खापर कोणावर फोडावे म्हणून एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना फुकटची सरदारकी भाजपकडून बहाल करण्यात आली. अर्थात भाजप आणि अजितदादा पवार यांच्यातील हा घरोबा स्थानिक पातळीवर कधी उतरलाच नाही. कारण स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कायम एकमेकांच्या विरोधात लढले आहेत. उत्साहाच्या भरात पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी अजितदादांच्या मागे मेंढरे झाली असली तरी नंतरच्या उण्यापुऱ्या वर्षभराच्या काळात या मंडळींमध्ये ही आपली राजकीय हाराकीरी ठरल्याची भावना निर्माण झाली. याचा परिणाम म्हणूनच पुन्हा भाजपाई कंपूतून बाहेर पडून,  स्वतःच्या राजकीय अस्तित्वाच्या लढाईसाठी पुन्हा उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडे आपापल्या सोयीप्रमाणे धाव घेतली.

आता पुन्हा आपला मूळ विषय म्हणजेच “या शहराचा राजकीय पोत किंवा Political Texture”!

अगदी सुरुवातीला समाजवादी आणि शेतकरी कामगार पक्षाचा पोत असलेल्या या शहराला कष्टकरी, कामगार, दलित, मजूर यांचे शहर म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर स्थानिक पातळीवरील जमीनमालक असलेले नेते यांनी कांग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी पोत या शहराला दिला. पुन्हा याच स्थानिकांनी स्वतःची पोळी शेकण्यासाठी या शहराला भाजपचा पोत दिला. मात्र, तोही आता बदलतो आहे. भाजपच्या कच्छपी लागलेल्या राष्ट्रवादी मधून आणि भाजपमधूनही बाहेर पडणाऱ्यांंची संख्या वाढते आहे. हा बाहेर पडणारा प्रवाह सध्यातरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे वळताना दिसतो आहे. आता पुन्हा एकदा हे शहर सर्वसामान्यांचे म्हणजेच कष्टकरी, कामगार, दलित, मजूर यांचे शहर म्हणून ओळखले जाईल काय हे पाहणे महत्त्वाचे आणि अगत्याचे ठरणार आहे.

——————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×