छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबी विटंबना, अपराधी कोण?

छत्रपती संभाजी महाराज यांचा अति भव्य पुतळा मोशी गावच्या शिवारात उभा केला जातो आहे. या अति भव्य पुतळ्याच्या उभारणीची अतिभव्य जाहिरात करून अनेकांनी आपले पार्श्वभाग बडवून घेतले. काहींनी त्या बडवण्यात स्वतःला हिंदू धर्माचा सच्चा पाईक म्हणवून घेतले, तर कोणी आपणच या भूतलावरील एकमेव हिंदू असल्याचा बडेजावी डांगोराही पिटला. मात्र, या “धर्मरक्षक संभाजी महाराज” यांच्या पुतळ्याची जी औरंगजेबी विटंबना झाली, त्यावर कोणताही सच्चा पाईक अगर एकमेव असलेला कोणी भाष्य करण्यास तयार नाही. औरंजेबाने ज्याप्रमाणे शंभूराजांच्या शरीराचे तुकडे तुळापुरात इतस्ततः भिरकावले, तद्वतच या अतिभव्य पुतळ्याचे अवशेष मोशीच्या शिवारात भग्नावस्थेत पडलेले लोकांनी पाहिले. औरंगजेबाने राजांचे कसे हाल केले याची प्रचितीच जणू तीनशे पस्तीस वर्षांनी पुन्हा एकदा आणून देण्यात आली. इतक्या वर्षांनीही छत्रपती संभाजीराजे यांची औरंगजेबी विटंबना होण्यास कारणीभूत कोण हा खरा प्रश्न आता उभा राहतो आहे. यामागचंइ खरे अपराधी कोण याचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यातून काही गंभीर बाबी समोर आल्या. त्याचाच उहापोह करण्याचा हा प्रयत्न.

शंभूराजांच्या या पुतळ्याचा औरंगजेबी अट्टाहास अगदी सुरुवातीपासूनच झाला आहे. पुतळा उभारणी पूर्वी “नावनायक” ने तेरा गुंठ्यांत हा पुतळा आणि त्यानुषांगिक स्मारकासाठी ही जागा तुटपुंजी असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन आणि संबंधित मंडळींच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र, केवळ अट्टहासापायी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम जवळपास पूर्णत्वाकडे असताना काही महाभागांना ही जागा अपुरी पडते आहे याचा अचानक “साक्षात्कार” झाला आणि पुतळ्याची जागा बदलण्यात आली. यातही महत्त्वाची आणि गंभीर बाब म्हणजे बदललेली जागा पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या ताब्यात आहे आणि अजूनही केवळ ती जागा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ताब्यात नसतानाही उमेद मान्यतेवर काम सुरू करण्यात आले आहे. राज्य शासनाने अजूनही सदरची जागा महापालिकेकडे वर्ग करण्यास मान्यता दिलेली नाही. तरीही सुमारे साठ कोटींचा खर्च महापालिका करीत आहे. याशिवाय जुन्या जागेवर सेनापती हंबीरराव मोहिते यांचा पुतळा आणि स्मरणशिल्पांसह सजावट आणि नवीन जागेवरील सुशोभीकरण यांच्या निविदा अजून निघायच्या आहेत. सगळा विचार केला तर हा संपूर्ण प्रकल्प सुमारे अडीचशे कोटींच्या घरात जाईल असा अंदाज आहे. 

आता शंभूराजांच्या पुतळ्याची औरंगजेबी विटंबना कशी झाली त्याविषयी. शंभर फूट उंच पुतळा तयार करणे ही साधीसुधी बाब नाहीच. हा पुतळा भागांमध्ये बनणार हेही सत्यच. सगळे भाग तयार झाल्यावर त्याचे जोडकाम होईल आणि पुतळा तयार होईल. पण मग हे सुटे भाग कसे ठेवायचे, त्यांची निगा काशी राखली जाईल, एखादा भाग नेआण करताना भंगला अगर तुटला तर त्याची काळजी कोण आणि कसे घेणार याबाबत कोणीही विचार केलेला नाही. त्याहीपेक्षा त्या बाबींकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. हीच ती शंभुराजांची औरंगजेबी विटंबना होय. पंचधातूंच्या या सुट्या भागांपैकी मोजडीच्या भागाला तडे गेल्याचे निदर्शनास आल्यावरही ती चूक त्याचवेळी महापालिकेला लेखी कळवण्याची अगर दुरुस्त करण्याची अगर तडा गेलेला भाग परत ओतकामासाठी परत नेण्याची तसदी कोणीही घेतली नाही. धनेश्वर कन्स्ट्रक्शन या ठेकेदारकडे चौथरा आणि पुतळा उभारणीचे काम आहे. प्रसिद्ध शिल्पज्ञ मूर्तिकार राम सुतार यांच्याकडे हे मूर्ती बनवण्याचे काम पोट ठेकेदार म्हणून देण्यात आले आहे. या कामावर क्रिएशन कन्सल्टन्सी हे सल्लागारही नेमण्यात आले आहेत. मात्र, यापैकी कोणीही पुतळ्याचे सुटे भाग ठेवण्यासाठी आगर त्यांची साठवणूक करण्यासाठी संरक्षित जागा निर्माण केली नाही, अथवा यापैकी कोणालाही त्याची गरज भासली नाही. शंभूराजांच्या पुतळ्याचे हे सुटे भाग अक्षरशः इतस्ततः विखुरलेले आणि कोणत्याही सुरक्षेशिवाय गवत झुडुपाध्ये पडलेले ठेवण्यात आले. हे पाहून सल्लागार आणि ठेकेदार हे पुतळ्याची औरंगजेबी विटंबना करताहेत असे वाटणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. या संपूर्ण बाबींची जबाबदारी मूळ ठेकेदार धनेश्वर कन्स्ट्रक्शन यांच्यावर असायला हवी आणि म्हणूनच त्यांच्यावर गंभीर गुन्ह्याची आणि उभ्या महाराष्ट्राच्या अस्मितेला तडा पाडण्याची शिक्षा मिळावी अशी अपेक्षा लोकांनी व्यक्त केली तर, त्यात अयोग्य काय? 

यावर शिल्पज्ञ राम सुतार यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांना उत्तर देताना, या लोकांना शिल्पकला कळत नाही असे म्हटले आहे. होय, लोकांना शिल्पकला कळणार नाहीच पण आपल्या मानकांना, आपल्या अस्मितेला, आपल्या भावनेला तडा गेला तर काय करायचे याचे भान नक्कीच आहे. त्यांनतर पाळी येते ती हा जो कोणी धनेश्वर कन्स्ट्रक्शन नावाचा ठेकेदार आहे, त्याची. हा ठेकेदार एव्हढा मग्रूर अगर मांदाळलेला का आहे, यावरही चर्चा होणे आवश्यक आहे. या धनेश्वराचे मदांधतेने झोपलेले भागीदार (स्लीपिंग पार्टनर) अगर बोलविते धनी पुढे का येत नाहीत, हा खरा प्रश्न आहे. शंभुराजांचा पुतळा उभा करण्यासाठी प्रयत्न करून, आम्ही कसे शिवप्रेमी आहोत अगर हिंदुत्वाचे एकमेव पाईक आहोत याचा डांगोरा पिटणारे, शंभुराजांची अशी औरंगजेबी विटंबना होताना कोणत्या बिळात जाऊन बसलेत याचाही शोध घेतला गेला पाहिजे. किंबहुना, यांची संवेदनाहीन गेंड्याची कातडी असल्याने केवळ “खाण्यासाठी” आणि जांभई देण्यासाठीच यांचे तोंड उघडते काय, यावरही विचार होणे आवश्यक आहे. 

शंभूराजांच्या पुतळ्याचे आणि तदनुषंगिक कामे करण्याचे कंत्राट देणारी पिंपरी चिंचवड महापालिका नक्की काय करते आहे, यावरही चर्चा व्हायला हवी. सर्वप्रथम शंभूराजांच्या पुतळ्याच्या सुट्या भागाला म्हणजेच मोजडीला तडा गेल्याचे काही माध्यमांनी लक्षात आणून दिल्यावर महापालिका आयुक्तांनी जी आगपाखड केली ती नक्कीच अनाठायी होती. पुतळ्याच्या सुट्या भागांना तडा गेलाच नाही, माध्यमे खोटी माहिती सांगताहेत, अशी मखलाशी करून आयुक्तांनी प्रसिद्धी माध्यमांवर आगपाखड केली. आता यावर आयुक्तांना नक्की स्वतःची कातडी वाचवायची होती की, धनेश्वर ठेकेदार आणि त्यांचे झोपलेले भागीदार यांना वाचवायचे होते, यावर संशोधन व्हायला हवे. आता महापालिका आयुक्तांनी घडल्या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पण मग, चौकशी कशाची आणि कोण करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

मुळात चौकशी करायचीच असेल आणि ती निष्पक्ष व्हावी असे वाटत असेल, तर काही मुद्दे सुचवायचे आहेत. सर्वप्रथम शंभुराजांचा हा “अतिभव्य” शंभर फुटी पुतळा तेरा गुंठ्यांच्या जागेत, तेव्हढ्याच उंचीच्या इमारतींच्या खोपच्यात घालण्याचा औरंगजेबी अट्टाहास कुणाचा, याची चौकशी व्हायला हवी. बदललेल्या जागेची पूर्ण आणि निर्विवाद मालकी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे नसतानाही नव्या जागेत पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम सुरू करण्याचा आणि आपला पार्श्वभाग बडवून घेण्याचा नक्की दुराग्रह कोणाचा याचीही चौकशी करणे आवश्यक आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अगोदरच्या चौथऱ्याच्या कामापोटी महापालिकेने ठेकेदाराला दिलेले पाच कोटी, नवीन चौथऱ्याचे वाढलेले पाच कोटी, असा सुमारे दहा कोटी रुपयांचा जादाचा जो बोजा महापालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे, याची जबाबदारी कोणाची याची चौकशी होणार आहे काय? सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना या संपूर्ण बाबींची खरोखरच चौकशी करायची आहे काय, की, फक्त चौकशीचा फार्स करायचाय?

——————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×