स्मार्ट सिटी विभागाचे टेक महिंद्राला अभय?
पिंपरी ( प्रतिनिधी )
टेक महिंद्रा कंपनीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी विभागासाठी उभारलेल्या सायबर सेल मधून डाटा चोरी झाला असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. वस्तुतः ही तक्रार महापालिकेने टेक महिंद्रा कंपनीवर दाखल करणे अपेक्षित होते, करण डाटा महापालिकेचा चोरला गेला आहे.
मात्र संगणक विभागाने स्वतः जबाबदारी न स्विकारता कंपनीला तक्रार का दाखल करू दिली, या बाबत तज्ज्ञानमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. महापालिकेची यंत्रणा कंपनीला अभय तर देत नाहीना? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
सुमारे अडीचशे कोटींचे हे काम करीत असताना टेक महिंद्राने कोणतीही पर्याप्त सावधगिरी बाळगली नाही, असा याचा उघड अर्थ असल्याचेही काही तज्ज्ञांचे मत आहे. कमी आणि कुशल नसलेले मनुष्यबळ वापरल्यामुळेच कंपनीकडून ही क्षमा न करता येण्याजोगी चूक झाली आहे. यात महापालिकेचा संबंधित विभाग भ्रष्टाचाराने लडबडला असल्याचे बोलले जात आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संबंधित विभागाच्या तांत्रिक क्षमतेबद्दलही तज्ज्ञांकडून सवाल उभे केले जात आहेत. जर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याचे ज्ञान अपुरे असेल तर कोणीही दुय्यम दर्जाची सेवा देऊन महापालिकेला फसवू शकतो, अशी चर्चाही होत आहे.