या पार्थास एक श्रीकृष्ण हवा!

महाभारताच्या युद्धात श्रीकृष्ण कोणाच्या बाजूने उभा राहणार हे ठरवण्यासाठी अर्जुन, ज्याला ” पार्थ ” असे संबोधतात, तो पार्थ आणि दुर्योधन श्रीकृष्णाकडे गेले आणि दोघांनीही श्रीकृष्णाला आपल्या बाजूने युद्धात सहभागी होण्याची विनंती केली. मला कौरव, पांडव दोघेही सारखेच असे सांगून श्रीकृष्णाने स्वतः आणि त्याचं सात औक्षहिणी सैन्य अशी विभागणी करून दोघांनाही यापैकी प्रत्येकाने एक निवडा अशी अट घातली. दुर्योधनाने यादवांचं सैन्य निवडलं आणि पार्थाने श्रीकृष्ण आपल्या बाजूने उभा केला. या युद्धाचा परिणाम काय झाला याचं कथानक सर्वांनाच माहिती आहे. कृष्णनीतीवर अनेक लिखाणं सापडतील, पण कृष्णाची निवड करणाऱ्या पार्थाच्या बुद्धिमत्तेबाबत फार कमी लोक विचार करतात. मार्गदर्शक तुम्ही स्वतः अंगिकारायचा असतो, तो असावाच लागतो, करण कित्येकदा आपली कृती वेळ, वेग, व्यवस्थापन आणि परिणाम या बाबतीत  बरोबर आहे किंवा कसे हे तपासणे अवघड होऊन जाते. मार्गदर्शक आपल्याला चूका सुधारण्याची संधी देतो. पार्थाला महाभारतात विजय मिळाला हे त्याचे कर्तृत्व आहेच, पण कृष्ण त्याचं सारथ्य करीत नसता तर हा विजय पार्थाच्या आवाक्यात आला असता का? याचाही विचार होणे आवश्यक आहे.

आता ही महाभारतातली कथा इथे उद्धृत करण्याच्या प्रयोजनाबद्दल अनेकांना अनेक प्रश्न पडतील. तर प्रयोजन असे की आता आपल्या पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात ” पार्थ अजित पवार ” लक्ष घालणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत सुमारे पावणेतीन लाख मतांनी पराभव झाल्याचं शल्य बहुतेक या पार्थाला बोचत असावे. मग, अगदी आवर्जून उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या तातश्री नामदार अजितदादा पवार यांच्याकडे हट्ट करून अगदी अट्टहासाने पार्थ या शहराचा निर्णयाधिकार मिळविता झाला, अशी खात्रीशीर माहिती आहे. आता पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा पार्थ पवारांकडे आहे. पार्थच्या या कृतीला पराभवाच्या शल्याची किनार असण्याची शक्यता आहे. मात्र या परिस्थितीत म्हणजे कोणत्याही पद्धतीने पिंपरी चिंचवडची सत्ता मिळवायचीच या ईरशिरीच्या परिस्थितीत, निर्णय चुकू देण्याची चूक पार्थ कडून होता काम नये, हे सगळ्यात महत्वाचे!

या सगळ्या विवेचनानंतर प्रश्न उभा राहतो तो हा की, या पार्थाला एक श्रीकृष्णाची नितांत आवश्यकता आहे आणि हे त्यांनी जाणले आहे काय? जर जाणले असेल तर आनंदच, अन्यथा अडचण! कारण होयबा पुढारी आणि उगाचच हरभऱ्याच्या झाडावर चढवणारे कार्यकर्ते यांच्या गराड्यात राहण्याची सवय आजच्या तरुण राजकारण्यांना आहेच. त्यातून सत्य या नेत्यापर्यंत येणेही कठीण. मग निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आणि आता निर्णय चुकून चालणार नाही. म्हणूनच मग या पार्थाने सर्वप्रथम आपल्यासाठी एक रणनीतीनिपुण श्रीकृष्ण शोधायला हवा. निस्पृहपणे आणि रोखठोक मार्गदर्शन करणारा श्रीकृष्ण मिळाला तर २०२२च्या महापालिका निवडणुकीच्या युद्धात हा पार्थही विजयी होईल, हे नक्की!

घोळ हा आहे की पार्थ अजित पवार यांना, आपल्याला श्रीकृष्णासारखे विजयश्रीजवळ नेऊन ठेवणाऱ्या मार्गदर्शकाची गरज कळली आहे काय? कळली असेल तर पुन्हा आनंदच, पण कळली नसेल तर? शहर पुन्हा ताब्यातून जाईल, पाच वर्षे पुन्हा वाट पाहावी लागेल.

पार्थ अजित पवार यांना ही गरज कळों, त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे त्यांना एक श्रीकृष्ण मिळो याच त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×