कोरोनाचे रुग्ण व्हेंटिलेटरच्या शोधात, मात्र पीएम केअर चे व्हेंटिलेटर धूळ खात!
पिंपरी ( दि.०९/०४/२०२१ )
कोविड१९ ने बाधित आणि प्राणवायूची (oxygen) गरज असलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक व्हेंटिलेटर मिळावा म्हणून वणवण फिरताहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेने अजून पन्नास व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी एकीकडे सत्तारूढ पक्षनेते नामदेवराव ढाके करीत आहेत, तर दुसरीकडे पीएम केअर फंडातून आलेले व्हेंटिलेटर धूळ खात पडून असल्याचे निदर्शनात आले आहे. पीएम केअर फंडातून पिंपरी चिंचवड महापालिकेला बाहत्तर व्हेंटिलेटर प्राप्त झाले होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. ने बनविलेल्या या व्हेंटिलेटर पैकी सतरा नादुरुस्त होते. महापालिकेच्या वैद्यकीय साहित्य दुरुस्ती विभागाने यापैकी काही दुरुस्त केले. मात्र काही व्हेंटिलेटर अजूनही धूळ खात पडून असल्याचे पाहायला मिळते.
हे व्हेंटिलेटर प्राणवायू ओढताना वेगात ओढतात त्यामुळे एखाद्या रुग्णास हे व्हेंटिलेटर वापरताना त्याचे गरजेप्रमाणे नियमन (controlling) कठीण होते. त्यामुळे हे व्हेंटिलेटर वापरणे एखाद्या रुग्णास धोकादायक ठरू शकते. नादुरुस्त असलेले हे पीएम केअर फंडाचे व्हेंटिलेटर दुरुस्त करण्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स च्या अभियंत्याला अनेकवेळा निरोप देऊन आणि कंपनीला अनेक वेळा मेल, फोन द्वारे संपर्क साधूनही दुरुस्तीसाठी कंपनीकडून काहीही हालचाल झालेली नाही. महापालिकेच्या वैद्यकीय साहित्य दुरुस्ती विभागाने आपले कौशल्य लावून काही दुरुस्त केले असले तरी काही व्हेंटिलेटर दुरुस्त होऊ न शकल्याने निरुपयोगी ठरले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते नामदेवराव ढाके यांनी आयुक्त राजेश पाटील यांना अजून पन्नास व्हेंटिलेटर रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. आयुक्तांनीही सद्यपरिस्थितीची जाणिव ठेवून ढाकेंची विनंती मान्य केली आहे. खाजगी कंपन्यांच्या सामाजिक बांधिलकी निधीतून ( Corporate Social Responsibility fund) याची चाचपणी युद्धपातळीवर सुरू केली असून, ते अशक्य झाल्यास महापालिका स्वतः व्हेंटिलेटर उपलब्ध करून देइल असेही आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे. मात्र पीएम केअर फंडातून मिळालेल्या आणि नादुरुस्त असलेल्या व्हेंटिलेटरचे काय हा प्रश्न अजूनही तसाच आहे.
———————————