भाऊ, आता राहूद्या! ज्यांच्यासाठी आपण बोलता आहात, त्या पहाटेच गेल्या!हे ऐकून मी हादरलो. – विशाल वाकडकर
पिंपरी (दि. १०/०४/२०२१)
त्या दिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास एका कार्यकर्त्यांचा फोन आला, वाय सी एम मध्ये असलेल्या एका कोरोना बाधित पन्नाशीच्या महिलेला तात्काळ रेमडीसीविर आणि व्हेंटिलेटर बेडची गरज आहे, काहीतरी करा. त्यांच्या या विनंतीवरून काही ठिकाणी फोन केले. आमचे नेते फझलभाई शेख यांच्याशी बोलून त्यांचा नंबर त्यांना दिला. बराच वेळ त्या महिलेला सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न केला. सकाळी नक्की काय झाले या उत्सुकतेपोटी त्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून रात्री तुमची सोय झाली का? नसेल तर, आता दिवसा कोणाशीही बोलत येईल, अशी विचारणा केली. त्या कार्यकर्त्याने ” भाऊ, आता राहुद्या. ज्यांच्यासाठी आपण बोलता आहात, त्या पहाटेच गेल्या. ” असे उत्तर दिले. ऐकून अक्षरशः हदरलोच!
ही प्रतिक्रिया आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विशाल वाकडकर यांची. गुरुवारी आठ तारखेला त्यांनी कोरोनाच्या रुग्णांना रेमडीसीविर मिळाव्यात म्हणून आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संजोग वाघेरे, पिंपरी चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकरांसह काही नगरसेवक आणि युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सामील झाले होते. या आंदोलनानंतर दिवसभर महापालिकेत बऱ्याच घडामोडी झाल्या. आंदोलनाचे मूळ कारण विचारले असता विशाल वाकडकरांनी वरील माहिती सांगितली.बोलताना डोळे भरून आलेल्या वाकडकरांच्या शब्दात त्यांनी व्यक्त केलेली ही व्यथा…………..
…….त्या महिलेचे निधन झाल्याचे कळल्यावर मला काहीच सुचेनासे झाले. आपण काहीच करू शकलो नाही, हे मनाला खात होते. त्या कार्यकर्त्याने सांगितले की, त्यांचे नातेवाईक पहाटेपर्यंत रेमडीसीविर आणि व्हेंटिलेटरसाठी प्रयत्न करीत होते. त्यांच्या निधनाची वार्ता काळल्यावरच हा शोध थांबला. हे ऐकून मी भांबावून गेलो. ती महिला कोणाची आई असेल, कोणाची पत्नी असेल, कोणाची आजी असेल, कोणाची काकी, मामी, मावशी, आत्या असेल. केवळ काही तासांसाठी, तेही एक कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून आलेल्या संबंधातून आपण एव्हढे हादरलो, ज्यांनी त्यांच्याबरोबर वेळ घालवला आणि या अखेरच्या काळात निरुपयोगी धावपळ केली, त्यांची मानसिकता काय झाली असेल या विचारांनी बधिरता आली होती. असे किती प्रसंग या कोरोनाच्या काळात लोकांवर आले असतील याचा विचार करून अजून भांबावलो. नेत्यांशी चर्चा करून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाला जाब विचारायचे निश्चित करून आंदोलन केले. पण प्रशासनाचा खोटारडेपणा पाहून अजून वेदनांच झाल्या. या संवेदनाहीन लोकांना धडा शिकवला पाहिजे. चक्क खोटे तेही रेटून बोलणाऱ्या अधिकाऱ्यांना काय शिक्षा करावी, याचा विचार करतो आहे. ही काही कोणीतरी, कोणासाठीतरी केलेली राजकीय स्टंटबाजी नाही. त्या महिलेसारख्या अनेक व्यक्तींच्या आर्त हाका या आंदोलनात आहेत. गेंड्याच्या कातडीच्या महापालिका प्रशासनाला, जीवानिशी गेलेल्या व्यक्तींचे आणि दुख्खाचे डोंगर उरावर घेऊन जगणाऱ्या नातेवाईकांचे शिव्याशाप नीट जगू देणार नाहीत.
विशाल वाकडकरांची ही विदारक मानसिकता आम्हालाही उद्विग्न करून गेली. अजून कोणाच्या मानसिकतेत असा बदल झाला असेल तर त्या प्रत्येकाने प्रशासनाला आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या राजकारण्यांना धडा शिकवायचा विचार करायला हवा!
——————————-