यासाठीच नगरसेवक झालो का, असंच कधी कधी वाटतं! -शत्रुघ्न काटे
पिंपरी ( दि. ०८/०४/२०२१ )
लोकांच्या तक्रारींना आम्हाला तोंड द्यावं लागतंय. मच्छरांमुळे आमचे नागरिक आम्हाला टोचतात. साधी जलपर्णी काढता येत नाही का? याला आमच्याकडे काहीच उत्तर नाही, यासाठीच नगरसेवक झालो का? हा उद्विग्न सवाल आहे, दोनदा नगरसेवक झालेल्या शत्रुघ्न काटे यांचा. प्रश्न होता जलपर्णीचा. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची सभा काल बुधवारी झाली. पिंपळे सौदागर, गुरव पिंपळे, सांगवी, चिंचवड, पिंपरी अशा जवळपास अर्ध्या शहराला जलपर्णीचा त्रास भोगावा लागतो आहे. गेली अनेक वर्षे प्रयत्न करूनही पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीनही नद्या जलपर्णीमुक्त होऊ शकल्या नाहीत. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका आणि ते काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा या मागणीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत गरमागरमी झाली. जलपर्णीचा विळखा सुटत नाही अगर त्यावर तोडगा निघत नाही म्हणून महापालिका प्रशासनाचा निषेध करून स्थायीची सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बातचीत करताना शत्रुघ्न काटे यांनी वरील उद्विग्न उद्गार काढले.
जलपर्णी काढण्याची निविदा २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी काढण्यात आली होती. मात्र निविदा कायम व्हायला उशीर झाला. तरीही मार्च२०२०मध्ये साई फ्रेट प्रा. लि. या मुंबईच्या ठेकेदाराने कामाला सुरुवात केली, अशी माहिती देताना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी सांगितले की, २०१९च्या सुरुवातीला आरोग्य विभागाचे कामकाज त्यांच्याकडे आले. संबंधित ठेकेदाराने मार्च२०२० पासून जून २०२० पर्यंत काम केले. पाऊस सुरू झाल्यावर काम थांबविण्यात आले होते. नदीपात्रात जलपर्णी पुन्हा दिसू लागल्यावर डिसेंबर२०२० मध्ये पुन्हा काम सुरू करण्यात आले आहे. जलपर्णीचा वाढण्याचा वेग पंधरा दिवसात दुप्पट आहे. मात्र तितक्या वेगात जलपर्णी काढणे शक्य होत नाही. पात्रात अनेक ठिकाणी उतरताच येत नाही. शिवाय पात्रात वाहते पाणि नसल्यामुळे बोट वापरता येत नाही. नदीपात्रात वाहत्या पाण्या ऐवजी नाल्यांद्वारे सांडपाणी वाहून येते हे सांडपाणी नदीपात्रात दलदल तयार करीत आहे. त्यामुळे जलपर्णी काढण्याचे जिकिरीचे होत आहे. तरीही डिसेंबर२०२० पासून आतापर्यंत सुमारे नऊशे टन जलपर्णी काढण्यात आली आहे. महापालिकेच्या कचरा डेपोवर त्याच्या नोंदी आहेत. जलपर्णी वाढण्याची अनेक कारणे आहेत. नदीपात्रात येणारे सांडपाणी, औद्योगिक रासायनमिश्रित दूषित पाणी यामुळेच जलपर्णी वाढण्यास मदत मिळते. अशी माहिती त्यांनी दिली.
अधिक माहिती मिळवली असता अजून काही बाबी समोर आल्या आहेत. नदीकाठच्या दोनही बाजूंवर भराव टाकल्यामुळे नदीपात्र अरुंद आणि चिखलाचे झाले आहे. तशातच मिलिटरीने पिंपळे गुरवजवळ बांधलेला जुना बंधाराही काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे पात्रात पाणी राहात नाही. या बाबी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील नाहीत. या करतुतींचे करतेसवरते अजून वेगळेच आहेत. यावर धडक कारवाई अपेक्षित आहे.
—————————–