महेश”दादा” हतबल झालेत, मग शहरातील सामान्य करदात्या नागरिकांनी कुठं जावं, काय करावं?

२०१७ पासून पिंपरी चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. शाहत्तर निवडून आलेले, तीन स्वीकृत आणि पाचपैकी तीन अपक्ष अशी ब्याऐंशी नगरसेवकांची राक्षसी संख्या असलेल्या भाजपच्या शहर अध्यक्ष आणि आमदारांनी गेल्या आठवड्यात ” मी हतबल झालोय! ” अशी कबुली सामाजिक प्रसार माध्यमाद्वारे दिली. ही पारपत्रिका म्हणजेच पोस्ट बराच काळ काढून टाकली गेली नाही अगर त्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. म्हणजेच कोणी खोडीलपणा केला असे म्हणण्यास जागा नाही. मग भोसरीचे आमदार आणि भाजपचे शहर अध्यक्ष महेशदादा लांडगे खरोखरंच हतबल झाले असावेत असेच म्हणावे लागेल. आता प्रश्न निर्माण होतो तो हा की, अशी हतबलता महेश “दादा” यांच्यात का निर्माण झाली असावी?

वस्तुतः कोणत्याही प्रसंगाला न डगमगता सामोरे जाऊन भिडण्याची प्रवृत्ती असल्याचे दृश्य महेशदादा आणि त्यांच्या चाणक्याने आतापर्यंत राखले आहे. महेशदादांचा चाणक्य आणि त्याची मॅनेजमेंट टीम कोणत्याही अशक्य बाबी शक्य करून दाखवते, असा आजपर्यंतचा लौकिक आहे. मग हा लौकिक कोविड१९ ने धुळीस मिळवला आहे काय? आपल्या भोसरी विधानसभा मतदारसंघात, किंबहुना शहराच्या इंद्रायणी आणि पवनेच्या मधल्या भागात महेशदादा आणि त्यांच्या चाणक्याच्या अनुमतीशिवाय “परींदाभी पर नही मार सकता” अशी या मंडळींची भारदस्त पकड आहे, असे निदान दृश्य स्वरूपात तरी दाखवण्यात आले आहे. मग ही हतबलता का? असा प्रश्न शहरातील सामान्य जनास निर्माण झाल्यास वावगे ठरू नये.

जर कोरोनाने महेशदादा आणि त्यांची टीम खरोखरंच हतबल झाली असेल आणि आपल्या जवळच्या लोकांसाठीही आपण काही करू शकत नाही ही किंकर्तव्यविमूढता त्यांना आली असेल, तर सामान्यजनांची काय अवस्था झाली असेल याची जाणीव या मंडळींना आली असावी. त्याचबरोबर आपण आणि आपली सत्ता असलेली महापालिका आणि तिथले पदाधिकारी नक्की काय करताहेत, याचीही जाणीव महेशदादांना नक्कीच झाली असावी. त्यांच्या या हळव्या उद्विग्नतेतून पिंपरी चिंचवड महापालिकेचा एकंदरच कारभार सुधारला तर त्यांच्या या उद्विग्नतेला काही अर्थ निर्माण होईल. कोरोनाने आपल्याला जसे उद्विग्न आणि हळवे केले आहे, तसेच आपल्या सत्ताकाळातील कारभारामुळे या शहरातील सामान्य करदाता नागरिक हळवा आणि उद्विग्न झाला आहे काय, हे खरं म्हणजे महेशदादांनी तपासून पाहायला हवे. गेल्या चार सव्वाचार वर्षातील घोटाळे, हडेलहप्पी कार्यक्रम, फक्त आणि फक्त आपल्याच पोळीवर तूप ओढण्याची आणि दुसऱ्याला सुक्की रोटीही खाऊ न देण्याची वाढत चाललेली प्रवृत्ती, अनागोंदी आणि ढालगज कारभार, कोरोना महामारीच्या कालावधीतही सत्तेतून पैसा ओरबाडणारे लोक ही सर्व परिस्थिती हळव्या आणि उद्विग्न महेशदादांना कळली नाही काय? आपल्या जवळच्या लोकांसाठीही आपण काहीच करू शकत नाही, ही त्यांची भावना या शहरासाठी का बरे निर्माण झाली नाही?

” मी हतबल झालोय…….” हे म्हणण्याआधी महेशदादांचा चाणक्य आणि त्याची टीम यांनी बराच खल केला असेल. आपण असे म्हटल्यावर त्याचे काय परिणाम होतील, याचाही विचार नक्कीच झाला असेल. अशी हतबलता जाहीर करून यांना काय साधायचे असावे? याचा सखोल विचार केल्यावर असे वाटते की, महेशदादा, त्यांचे चाणक्य, त्यांची टीम या सर्वांनी पिंपरी चिंचवड शहरातील सामान्यजनांसाठी आपले दरवाजे तर बंद केले नाहीत ना? आता मी तुमच्यासाठी काहीही करू शकत, किंवा इच्छित नाही, असा संदेश तर यामधून महेशदादांना द्यायचा नाहीये ना?

————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×