काम अधिकाऱ्यांचे, श्रेय्य लाटणार लोकप्रतिनिधी! ऑक्सिजन टँकरचे गौडबंगाल!
पिंपरी चिंचवड शहराचे आम्हीच तारणहार असा खोटा अविर्भाव निर्माण करून कोरोना रुग्णांसाठी कसा ऑक्सिजन टँकर मिळविला याचे रसभरीत वर्णन करणारे बातमीपत्र आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रसिद्धी टीमने प्रसारित केले. खरेच काय घडले त्या रात्री? याची कोणतेही शहानिशा न करता काही माध्यमांनी ते प्रसारीतही केले. मात्र या प्रकाराला काही वेगळा वास असल्याचे निदर्शनात आल्यावर आणि खरे गौडबंगाल वेगळेच आहे, याची कुणकुण लागल्यावर आम्ही यावर सत्यशोधन करण्याचा प्रयत्न केला. या शोधकार्यात ऑक्सिजन मिळविणारे खरे बहाद्दर वेगळेच असल्याचे स्पष्ट झाले. ज्याचे काम त्याला श्रेय्य हा न्याय वापरण्याचे ठरवून मंगळवार दि. २० एप्रिल रोजीचे ते ऑक्सिजन टँकर नाट्य वाचकांसाठी प्रस्तुत करण्यासाठी हा लेखनप्रपंच!
त्या दिवशी संध्याकाळपासूनच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कोविड रुग्णालयांना ऑक्सिजन अपुरा पडेल असे चित्र निर्माण झाले होते. कोविड रुग्ण अडचणीत येतील असे वाटल्याने महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आयुक्तांनी नेमलेल्या उपायुक्त स्मिता झगडे, कार्यकारी अभियंता सतीश इंगळे, प्रमोद ओंभासे व टीम यांची मसलत झाली. कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजन मिळवायचाच हे एकमेव उद्दिष्ट ठेऊन विकास ढाकणे आणि स्मिता झगडे यांनी शासनाचे अन्न व औषध प्रशासन आणि उत्पादक यांचा कानोसा घेण्यास सुरुवात केली. रात्री उशीरा ऑक्सिजनचा एक टँकर भोसरीतून दिघी मार्गे जात असल्याची खबर ढाकणे, झगडेंना मिळाली. महापालिकेत ठाण मांडून बसलेल्या आयुक्तांना याची माहिती देऊन हे दोन अधिकारी टँकरच्या मागावर सुटले. बावीस टन द्रवरूप ऑक्सिजनचा हा साहनी नावाच्या वितरकाचा टँकर यांना सापडला. काही तासात महापालिकेच्या कोविड केअर सेंटरचे रुग्ण ऑक्सिजन अभावी धोक्यात येऊ शकतात याची माहिती असलेल्या या दोन अधिकाऱ्यांनी प्रथम त्या वितरकाला आम्हाला ऑक्सिजन द्या, म्हणून विनंती केली. तो ऐकत नाही असे वाटल्यावरून मग यांनी महापालिकेत बसलेल्या आयुक्तांना संपर्क साधला. आयुक्तांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांना कॉन्फरन्स कॉलवर जोडले, त्यांनी अन्न व औषध अधिकारी यांना संपर्क करून त्या साहनी नावाच्या वितरकाच्या टँकरला ताब्यात घेण्याचे आदेश कॉन्फरन्स कॉल वरूनच दिले. विकास ढाकणे आणि स्मिता झगडे यांनी हिम्मत करून टँकर महापालिकेच्या जम्बो कोविड केअर सेंटरवर आणला. तो वितरक आता दमाच्या भाषेवरून विनंतीचा भाषेवर आला होता. बाकीच्या रुग्णालयातही बोंब होईल या त्याच्या विनावणीवरून झगडेंनी त्यातील पाच टन ऑक्सिजन तिथेच रिकामा करून घेतला आणि हा इतर रुग्णालयाला देऊन पुन्हा सतरा टन ऑक्सिजन त्याच्याकडून मिळवला. थोडक्यात महापालिकेच्या कोविड रुग्णांची गरज भागवून या अधिकारी द्वयीने इतर रुग्णालयातील रुग्णांचीही सोय केली.
या सर्व प्रकारात ” मीच केलं ” म्हणणारा कोणताही लोकप्रतिनिधी अगदी दुरुनही चित्रात दिसत नाही. रात्रीचा दिवस करून आणि नडून नाडूनही ऑक्सिजन मिळविणारे आणि त्यासाठी रस्त्यावर उतरणारे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे,उपायुक्त स्मिता झगडे यांनी खरोखरंच झगडून मिळविलेला ऑक्सिजन टँकर महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या ऑक्सिजन मिळाला नाही तर जीव जाऊ शकतो अशा स्थितीत असलेल्या कोविड ग्रस्त रुग्णांना एक नवी जगण्याची संधी देणारा ठरला. कदाचित कोणी म्हणेल की यात काय विशेष? त्यांचे कामंच आहे ते! पण आपला कोणताही संबंध नसताना श्रेय्य लुटू पाहणाऱ्या लोकप्रतिनिधींपेक्षा या अधिकाऱ्यांनी दाखविलेली धडाडी, हिम्मत नक्कीच कौतुकास्पद आहे. याचे कौतुक झालेच पाहिजे. एव्हढेच नव्हे तर जो झटला, झगडला त्यालाच श्रेय्य मिळायला हवे. “आम्हा घरी केवळ शब्दांचेच धन” असल्यामुळे आम्ही आमचे शब्द खर्च करून या मंडळींचे कौतुक करीत आहोत. शहरातील कोविड ग्रस्त रुग्ण आणि तमाम शहरवासीयांतर्फे महापालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त स्मिता झगडे, कार्यकारी अभियंता सतीश इंगळे, प्रमोद ओंभासे, विभागीय आयुक्त सौरभ राव आणि या कोविड ग्रस्त काळातही आपले आणि आपल्या कुटुंबियांचे जीवित धोक्यात घालून अहोरात्र कार्यरत असलेल्या प्रत्येकाचे त्रिवार जाहीर आभार!
–———————————–