प्रशासनाला नालायक ठरविणारे राजकारणी खरेच लायकीचे आहेत काय?

राजकरण्यांचा प्रशासनात हस्तक्षेप वाढला की की, प्रशासकीय कामकाजाचा कसा बोऱ्या वाजतो, याची प्रचिती सांप्रतच्या काळी पिंपरी चिंचवड महापालिकेत येत आहे. त्यातल्यात्यात हे राजकारणी जर लाभधारक असतील, तर वाटोळे निश्चितच! हे राजकारणी सध्या केवळ आपला फायदा कसा होईल, यावर लक्ष ठेवुन आहेत. शिवाय काही गडबड झाली तर प्रशासनाला दोष देऊन ही मंडळी मोकळीही होत आहेत. हा बोऱ्या वाजविण्याचा कार्यक्रम आपल्यासारख्याच कोणाच्यातरी हस्तक्षेपामुळेच झाला आहे, याचे कोणतेही वैक्षम्य न बाळगता प्रशासनाला धारेवर धरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची कामगिरीही हीच मंडळी पुढाकाराने करतात. प्रशासन नालायक आहे, हे दाखविण्याची या राजकारण्यांची अहमहिक केवळ राजकारणी लायकीचे नाहीत हे लपविण्यासाठी असते.

पिंपरी चिंचवड महापालिकाच नव्हे, तर जिथे जिथे लाभधारक राजकारण्यांचा हस्तक्षेप होतो, तिथे तिथे प्रशासकीय कामात अराजकताच निर्माण होणार, हे निश्चित. ही आराजकताच लाभधारकांना लाभ मिळवून देण्यास सुकर मार्ग निर्माण करते. पिंपरी चिंचवड महापालिकेत तर लाभधारक राजकारण्यांची मांदियाळी आहे. काय करतात हे लाभधारक राजकारणी? महापालिकेच्या कोणत्याही कामात आपला लाभ झाला पाहिजे या हेतूने प्रशासनाला काम करण्यास हे राजकारणी भाग पडतात. अगदी संडास धुण्याच्या कामापासून, थेट कोविड केअर सेंटर चालविण्यापर्यंत हे लाभधारक राजकारणी लाभ पदरात पाडून घेत असतात. आपले बगलबच्चे आणि हितसंबंधी यांना ठेकेदार, पुरवठादार म्हणून पुढे करून ठेके मिळविण्यासाठी हे राजकारणी प्रशासनाला वेठीस धरून कोणत्याही कामाच्या निविदेतील अटीशर्ती बदलून घेतात. कमी दरात निविदा भरून ठेका पदरात पाडून घ्यायचा आणि नंतर मुदतवाढ, दरवाढ मिळावी म्हणून अधिकाऱ्यांना छळायचे, हा नेहमीचा पायंडा पिंपरी चिंचवड महापालिकेत नियमित बनून गेला आहे. कोणतेही शंभर रुपयांचे काम फुगवून दहापट करण्यात हे लाभधारक राजकारणी वाकबगार आहेत. या लाभार्थी राजकारण्यांना कोणीतरी थांबवले पाहिजे.

वाल्हेकरवाडीतील एका खाजगी रुग्णालयातील एक डॉक्टरने कोविडग्रस्त शिक्षिकेला एक लाख रुपये घेऊन ऑटो क्लस्टरच्या महापालिकेच्या कोविड केअर  सेंटरला दाखल केले, तिथल्या डॉक्टरने त्यातले ऐंशी हजार घेतले. कुंदन गायकवाड आणि विकास डोळस या तरुण तडफदार नगरसेवकांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणून आपल्या शिक्षिकेला मरणोत्तर का होईना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी थांबवण्याचा आणि आमिषे दाखविण्याचा प्रयत्न करूनही या दोघांनी त्या सगळ्या प्रयत्नांना दूर सारून हे प्रकरण उघडकीस आणले. संबंधित डॉक्टरांवर पोलीसात गुन्हाही दाखल होऊन त्यांना अटकही झाली. हे दोनही नगरसेवक स्वपक्षीय आणि इतर पक्षीय नेत्या पुढाऱ्यांच्या दबावाला बळी पडले नाहीत. नुकत्याच झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आमसभेत या प्रकरणी पाच तास वादळी चर्चा झाली. ऑटो क्लस्टर आणि जम्बो कोविड सेंटरच्या एकंदर कारभाराचे वाभाडे काढून तिथला अनागोंदी कारभार उघडकीस आणण्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी स्पर्धा लावून वेळ खर्च केला. या कामगिरीबद्दल कुंदन गायकवाड आणि विकास डोळस यांच्या बरोबरीने चर्चेत भाग घेणारे सर्वच अभिनंदनास पात्र आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांचे हे अभिनंदनीय काम पाहून एक गहन प्रश्न सारखा सतावतो आहे, तो हा की, महापालिकेच्या लाभधारक राजकारण्यांना रोखण्यासाठी ही एकजूट का होत नसावी? शहरातील करदात्या नागरिकांचा पैसा पाण्यासारखा उधळून आपली आणि आपल्या बगलबच्च्यांची खळगी भरणाऱ्यांना आणि त्यासाठी प्रशासनाला वापरणाऱ्या राजकारण्यांना आपल्या एकजुटीने ही मंडळी थांबवू शकत नाहीत काय? की केवळ आपले आणि आपल्या बगलबच्च्यांचे ठेवायचे झाकून आणि इतरांचे पहायचे वाकून हा यांचा कार्यकारण भाव आहे काय? सामाजिक राजकारण किंवा सोशल पॉलिटिक्स ची संकल्पना मांडणारे राजकारणी जेंव्हा महापालिकेच्या प्रत्येक ठेक्यात आपली टक्केवारी ठेवतात, तेंव्हा ही अभिनंदनीय एकजूट का होत नसावी?

कायम प्रशासनाला नालायक ठरविण्यासाठी जर ही एकजूट होत असेल, तर या एकजुटीचा हेतू तपासून पाहायला हवा. एकीकडे आपली, आपल्या हितसंबधितांची, नेत्यांची खळगी भरली जात असताना ठरवून दुर्लक्ष करायचे आणि प्रशासनच कसे नालायक आहे, हे दाखवायचे, हा हडेलहप्पी व्यवहार करणारे राजकारणी किती आणि कसे लायकीचे आहेत, यावर खरे तर सखोल संशोधन व्हायला हवे. हे संशोधन होऊन लाभधारक राजकारण्यांना थांबविण्यात ज्यावेळी यश मिळेल तो दिवस, ती वेळ येण्याची या शहरातील प्रत्येक नागरिक वाट पाहतो आहे.

—————————————

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×