कामगार दिनी कष्टकरी कामगारांना दिलासा! मात्र, ही बोलाचीच कढी ठरू नये!

कामगार, कष्टकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आमसभेने कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन यांच्या पूर्वसंध्येला घेतला आहे. कोरोना महामारीने आणि त्यामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे त्रस्त झालेल्या, रोजच्या हातापोटाची लढाई लढणाऱ्या या “नाहि रे” गटाच्या गोरगरीब कष्टकरी कामगाराला महापालिलेने दिलेला हा दिलासा, केवळ “बोलाची कढी आणि बोलाचाच भात” ठरू नये! पिंपरी चिंचवड शहरातील घर कामगार, सफाई कामगार, गटई कामगार, नाभिककर्मी, पथारीवाले, टपऱ्याधारक, रिक्षाचालक, बांधकाम मजूर, स्कुलबसचे चालक- वाहक, आदी कामगार, कष्टकऱ्यांना त्यांच्या हातापोटाची लढाई सुकर व्हावी म्हणून तीन हजार रुपये अनुदान अगर वैयक्तिक मदत देण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आमसभेने मान्य केले आहे.

आता शहरातील कामगार कष्टकऱ्यांची खरी लढाई सुरू होईल, ती हे अनुदान अगर वैयक्तिक मदत आपल्या पदरात कशी पाडून घेता येईल याची. सरकारी काम आणि कितीही थांब असा वेळकाढूपणा कोणत्याही प्रशासकीय योजनेत असतो, अशी जनमानसात भावना आहे. शिवाय या योजनांसाठी जी कागदपत्रे मागविली जातात, ती गोळा करणे अनेकदा खर्चिक आणि अशक्यप्राय असते. म्हणजे कागदपत्रे जमा करण्यासाठी जमावबंदीच्या काळात पळापळ करून हजारभर रुपये खर्च करून हाती काही लागणार नाही, असे व्हायला नको. म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेने कमीत कमी कागदपत्रात आणि कमीतकमी वेळेत हे अनुदान अगर मदत लाभार्थ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर महापालिकेत भाजपची सत्ता आहे आणि भाजप खोटी आश्वासने देण्यातच प्रसिद्ध आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल. या कष्टकरी कामगारांचीच मते विनिंग शॉट ठरतात, हे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने विसरू नये. त्याचबरोबर निवडणुकीत वाटायचे पैसे अधिकृतपणे आताच देत आहोत, असा डांगोराही पिटु नये. कारण महापालिकेच्या तिजोरीतून खर्च होणारा हा पैसा, या शहरातील करदात्या नागरिकांच्या खिशातून आला आहे. पक्षीय बडेजाव करून अगर आम्हीच केले म्हणून भाजप ढोल वाजवणार असेल, तर अशी लोकानुनयी योजना नाही आली तरी चालेल. थोडक्यात ही भाजपची प्रचारकी योजना ठरू नये आणि त्यासाठी महापालिकेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज किंवा महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालये, दवाखाने, करसंकलन कार्यालये, इ सेवा केंद्रे येथून या अर्जांची देवाणघेवाण व्हावी. राजकीय हेतू नसलेल्या अनेक सेवाभावी संस्था हे काम करण्यास पुढाकार घेतील.

योजना चांगलीच आहे, मात्र पक्षीय अभिनिवेशातून अगर उपकारकर्त्याच्या भावनेतून ही योजना नसावी, याची दक्षता पिंपरी चिंचवड महापालिकेने घेणे अत्यावश्यक आहे. या आपात्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या वतीने सर्वसामान्य “नाही रे” वर्गाला ही योजना दिलासादायकच आहे. यातून अनेक कुटुंबांना उभारी मिळणार आहे, अनेक कच्चीबच्ची दोन घास सुखाने खाऊ शकणार आहेत.आमची आई म्हणायची, “बाळ, हेही दिवस जातील! येणारा हरेक दिवस नवा करकरीत असतो, आपण आपल्या करतुतीने आणि हरकतीने त्याला चांगला अगर वाईट करीत असतो.” आईचे ते बोल आठवले की, आजही मनाला नवी उभारी येते. नव्याने लढण्यासाठी आणि हारजितीचा विचार न करता कार्यरत राहावे, यासाठी बळ मिळते. हे बळ पिंपरी चिंचवड महापालिकेने सर्वसामान्यांना देणे, अभिनंदनियच आहे. फक्त यात उपकारकर्त्याच्या भावना अगर पक्षीय राजकारण येऊ नये यासाठी महापालिकेने सजग रहाणे महत्त्वाचे!

————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×