संपूर्ण रुग्णसेवा बदनाम करून काय साधले जाणार? -कैलास तथा बाबा बारणे

पिंपरी  (दि. ०५/०५/२०२१)

ऑटो क्लस्टर येथील कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण दाखल करून घेण्यासाठी एका खाजगी कोविड सेंटरच्या डॉक्टरने एक लाख रुपये घेतल्याचा आरोप होतो आहे. त्याची पोलिस तक्रार होऊन काहींना अटकही झाली. मात्र संपूर्ण वैद्यकीय सेवाच बदनाम करण्याचे षडयंत्र का रचले जात आहे? अशा आपात्कालीन परिस्थितीत रुग्णांना सेवा मिळणे आवश्यक असताना डॉक्टरांचे मनोधैर्य खच्ची करून काय साधले जाणार आहे? एखाद्या व्यक्तीने आपल्या रुग्णसेवेच्या पेशाला काळिमा फासणारे कृत्य केले म्हणून या पेशात काम करणारा प्रत्येक व्यक्ती नालायक ठरविण्याने नेमके काय साधले जाणार आहे? कशासाठी चाललंय हे सगळं? असे प्रश्न पिंपरी चिंचवड महापालिकेतील अपक्ष नगरसेवकांचे गटनेते कैलास भालचंद्र तथा बाबा बारणे यांनी “नवनायक” शी बोलताना उपस्थित केले आहेत.

बाबा बारणे या सर्व प्रकारणाबद्दल बोलताना म्हणाले की, कोविडग्रस्त रुग्णांसाठी महापालिकेने उभारलेल्या ऑटो क्लस्टर येथील मोफत कोविड सेंटर मध्ये रुग्ण दाखल करून घेण्यासाठी खाजगी कोविड सेंटरच्या लोकांनी एक लाख रुपये घेतले, हे स्पष्ट झाल्यावर महापालिकेने लगेचच पोलीस तक्रार दाखल करणे अपेक्षेत होते. महापालिका प्रशासनाने आमसभेत याची चर्चा होण्याची वाट का पहिली? आमसभेत आपल्याच कोविड सेंटरचे वाभाडे का निघू दिले? कोविड सेंटर चालविणाऱ्या यंत्रणेने महापालिलेकडे आमसभेपुर्वी पोलीस तक्रार करण्याची मुभा मागितली असता का दिली नाही? असे अनेक प्रश्न या प्रकरणी उपस्थित होतात. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे रोज अडीच तीन हजाराच्या दरम्यान कोविडग्रस्त शहरात सापडत असताना आपल्याच वैद्यकीय सेवेबद्दल नागरिकांत अविश्वास उत्पन्न झाला तर संपूर्ण व्यवस्थाच ढासळले हे खरे म्हणजे लक्षात घ्यायला हवे. कोविड सेंटरमध्ये काम करणारे वैद्यकीय आणि इतर काम करणाऱ्या लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना यामुळे तयार होऊ शकते. आपल्या जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या या लोकांनी अशा असुरक्षिततेच्या भावनेतून काम करणे थांबवले तर महापालिकेने उभारलेल्या मोफत कोविड सेंटरमध्ये उपचार घेणारे गोरगरीब रुग्ण काय करतील याचा विचार केला गेला पाहिजे.

बाबा बारणे यांनी उत्पन्न केलेले हे प्रश्न अगदीच रास्त असून या प्रत्येक प्रश्नावर संशोधन होणे अत्यावश्यक वाटल्यावरून या प्रकरणाची माहिती घेण्यास सुरुवात केली. उपलब्ध माहितीत राजकीय डावपेच, मला नाही तर कोणालाच नाही अशी राजकीय खेळी, आपल्या ठेकेदारांचे उखळ पांढरे करण्यासाठी घातलेला खोडा, शहरातील कोविडग्रस्त होऊन हातघाईला आलेल्या नागरिकांची हेळसांड, मढ्याच्या टाळूवरचे लोणीही न सोडणारी गदळ, विदारक, पेशाला काळीमा फासणारी प्रवृत्ती, अशी अनेक लफडी कुलंगडी उघड झाली. या प्रकरणाला अनेक कांगोरे आहेत. त्यापैकी पहिल्यांदा ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटर चालविणाऱ्या स्पर्श हॉस्पिटलच्या डॉ. अमोल हळकुंदे यांच्या बाजूची माहिती.

एक लाख देऊन ऑक्सिजन बेड मिळविणाऱ्या त्या शिक्षिकेच्या अगोदर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या आणि रुग्णांना मोफत सेवा देणाऱ्या नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटर आणि ऑटो क्लस्टर कोविड सेंटर या दोन्ही ठिकाणी काही असामाजिक तत्वे कार्यरत असून रुग्णांकडून पैसे उकळले जात असल्याचा संशय डॉ. अमोल यांच्याकडून महापालिका प्रशासनाकडे व्यक्त करण्यात आला. त्यावर महापालिका प्रशासनाने काही अधिकारी या दोनही कोविड सेंटरच्या मदतीसाठी आणि अर्थातच देखरेखीसाठी नियुक्त केले. शिवाय या ठिकाणी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, कोणीही कसल्याही रकमेची मागणी केल्यास काही भ्रमणध्वनी क्रमांक देऊन, येथे तक्रार करावी, अशा आशयाचे फलक लावण्याचे निर्देशही महापालिकेकडून देण्यात आले. कोविड सेंटर चालविणाऱ्या यंत्रणेने तसे फलक लावले आहेत. यानंतर एक लाख रुपये घेवून ऑटो क्लस्टरच्या कोविड सेंटर मध्ये रुग्ण दाखल करण्यात आल्याचा आरोप करून नगरसेवक कुंदन गायकवाड आणि विकास डोळस यांनी रक्कम स्विकारणाऱ्या वाल्हेकरवाडीतल्या खाजगी कोविड सेंटरच्या दोन डॉक्टरांना घेऊन ऑटो क्लस्टरच्या कोविड सेंटरला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्न करण्याच्या पध्दतीने तिथली रुग्णसेवा विचलित होईल याचा कोणतही विचार या दोन नगरसेवकांनी केला नाही हा भाग अलाहिदा! या गंभीर आरोपानंतर डॉ. अमोल हळकुंदे यांनी झालेल्या प्रकाराबाबत पोलीस तक्रार करण्याची परवानगी महापालिका प्रशासनाकडे मागितली. मात्र हा प्रकार महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये झाला असून याबाबत महापालिका प्रशासन निर्णय घेईल असे सांगून प्रशासनाने डॉ. अमोल यांना तक्रार देण्यापासून रोखले. प्रशासकीय पातळीवरूनही याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आमसभेत या विषयावर साडेपाच तास वादळी चर्चा झाली. या चर्चेचा पूर्ण सूर ऑटो क्लस्टरचे कोविड सेंटर चालविणारी स्पर्श हॉस्पिटलची यंत्रणा नालायक आहे, म्हणून ते सेंटर दुसऱ्या ठेकेदाराला चालविण्यास द्यावे असा होता. त्याचबरोबर स्पर्शला ब्लॅक लिस्ट करा, पोलीस तक्रार करा अशी जोडही या चर्चेदरम्यान सभागृहात देण्यात आली. प्रशासनाने या दिर्घ चर्चेला उत्तर देताना पोलीस तक्रार देण्याचे मान्य केले, मात्र आपल्या खुलाश्यात स्पर्शच्या यंत्रणेने पोलीस तक्रार करण्यासाठी परवानगी मागितल्याची बाब सभागृहात का उघड केली नाही, हा देखिल एक वेगळ्या संशोधनाचा विषय आहे. स्पर्शच्या ज्या डॉक्टरांवर ऐंशी हजार रुपये स्विकारल्याचा आरोप होतो आहे, त्या डॉ. प्रवीण जाधव यांनी पोलिसात आपला वैयक्तिक तक्रार अर्ज दाखल केला असल्याची बाबही प्रशासन आणि पोलिसांनी का उघड केली नाही, याबाबतही मौन पाळले जात आहे.

आता या प्रकरणाच्या इतर पैलूंबद्दल. नुकतेच एका सोशल मिडिया वर भोसरीच्या आमदारांचा भाऊ, राष्ट्रवादी काँग्रेसचे एक माजी महापौर आणि विद्यमान नगरसदस्य, भाजपच्या दोन नगरसेविका यांनी स्पर्शच्या यंत्रणेला छळण्याची सुपारी घेतल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली. या बातमीत किती तथ्य आहे हे, वरिल मंडळींना आणि स्पर्शच्या यंत्रणेला अगर त्या सोशल मिडियाच्या लोकांना माहीत. सत्तारूढ पक्षनेते नामदेवराव ढाके यांनी नगरसेवक कुंदन गायकवाड आणि विकास डोळस यांना काही रक्कम देण्याच्या आश्वासनाचीही चर्चा आणि आरोप प्रत्यारोप झाले. महापालिकेच्या आमसभेत स्पर्शला बाजूला करून दुसऱ्या यंत्रणेकडे काम देण्याची शिफारसही करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात भोसरीच्या आमदारांच्या यंत्रणेचा सहभाग असल्याचीही चर्चा आहे.

मात्र, या गदारोळात कोविडग्रस्त रुग्णांच्या मनात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णसेवेबद्दल संशय निर्माण झाला आणि आताच्या दररोज अडीच हजारांवर नवीन रुग्ण सापडत असतानाच्या भयानक परिस्थितीत हे किती घातक आहे, या अपक्ष नगरसेवकांचे गटनेते कैलास भालचंद्र तथा बाबा बारणे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर कोणाकडेही काहीही उत्तर नाही, हे महत्वाचे. गेले चौदा महिने पिंपरी चिंचवड महापालिकेने यशस्वीपणे परिस्थिती हाताळून या आपात्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी जे आकाशपाताळ एक केले, महापालिकेच्या सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीवावर उदार होऊन आणि आपल्या मुलालेकरांना, कुटुंबाला धोक्यात घालून जी मेहनत केली, त्याचे काय हा खरा अनुत्तरित प्रश्न आहे.आपापल्या परीने आपापल्या पोळीवर तूप ओढण्यात मश्गुल असलेल्या लोकांनी या कर्तबगारीला धुळीस मिळविले आहे, हे निश्चित!

—————————————–

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×