“स्पर्श” मुळे आता सर्वांनाच “कावीळ”!

कावीळ हा काही संसर्गजन्य रोग नाही. तो दूषित पाणी आणि अन्न पदार्थातून फैलावतो. मात्र, पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात झालेली कावीळ ही पूर्णतः “स्पर्श”जन्य आहे. या स्पर्शजन्य काविळीतून राजकारणी, अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते, पत्रकार एव्हढेच नव्हे तर पोलिसही वाचले नाहीत. यातील अनेकांना स्पर्शच्या स्पर्शाने कावीळ झाली, तर अनेकांना स्पर्शचा स्पर्श झाला नाही म्हणून कावीळ झाली आहे. कावीळ झालेल्या रुग्णाला जसे सर्व काही पिवळे दिसते, तद्वतच या स्पर्शजन्य काविळीची लागण झालेल्या प्रत्येकाला जिथे तिथे स्पर्श दिसत आहे. काही झाले तरी स्पर्श, नाही झाले तरी स्पर्श, अशी सांप्रतची अवस्था आहे. फॉरचून स्पर्श हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड अर्थात स्पर्शने पिंपरी चिंचवड महापालिकेचे ऑटो क्लस्टर कोविड सेंटर चालवायला घेतल्यापासून काहींना स्पर्शच्या काविळीने ग्रासले आहे. त्या वेळची लागण, स्पर्शने कमी दरात सेवा देण्याचे मान्य केल्यामुळे काही मान्यवरांचे हात मारण्याचे मनसुभे उध्वस्त झाले म्हणून होती. या मान्यवरांनी अनेक प्रयत्न करूनही स्पर्शला बाधा येत नाही, म्हणून सत्तापिपासू आणि मलिदाखोर अशा अनेकांना, अनेक पद्धतीने स्पर्शच्या मागे लावले आणि अनेकांना या स्पर्शची कावीळ झाली. ही स्पर्शजन्य कावीळ इतकी फैलावली, की पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयही यातून वाचले नाही.

ऑटो क्लस्टर कोविड सेंटर सुरू झाल्यापासून या स्पर्शजन्य काविळीची सुरुवात झाली आली तरी, तिने जोर पकडला तो, भोसरीच्या कोविड सेंटरचे पैसे स्पर्शने उचलल्यापासून. खरे म्हणजे त्यावेळी जर कोणी खरेच दोषी असेल तर, ते तत्कालीन आयुक्त श्रवण हर्डीकर आणि तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अजित पवार. स्पर्शने काही या दोघांच्या खिशात हात घालून पैसे काढले नव्हते, तर त्यांनी अंतिम विचारांती स्पर्शला काही कोटी रुपये दिले होते. ही रक्कम स्पर्शच्या पदरात पडल्यामुळे पित्त खवळून काहींच्या काविळीने जोर पकडला आणि त्यांनी भरीस घातलेल्या अनेकांनी अनेक प्रकारे स्पर्शला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. कितीही नाडून आणि नडुनही स्पर्शला काही फरक पडत नाही म्हणून उद्विग्न झालेल्या मान्यवरांना अजून एक संधी मिळाली ती, एक कोविडग्रस्त शिक्षिकेला, महापालिकेतर्फे मोफत चालविल्या जाणाऱ्या ऑटो क्लस्टर कोविड सेंटरमध्ये  दाखल करून घेण्यासाठी तिथल्या काही डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी एक लाख रुपये घेतल्यावर.

ही रक्कम स्वीकारणारे डॉक्टर आणि कर्मचारी यांना अटक होऊन त्यांवर गुन्हाही दाखल झाला आहे. आता ती सगळी बाब न्यायप्रविष्ट आहे. स्पर्शच्या दुर्दैवाने पुन्हा रेमडिसीविर इंजेक्शन विकताना काही कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. त्यापैकी एक कर्मचारी गेल्या काही दिवसांपूर्वीच स्पर्शच्या स्ववेत रुजू झाला होता. त्या कर्मचाऱ्याने रेमडिसीविर कोठून मिळवले, ते ऑटो क्लस्टर कोविड सेंटरच्या ताब्यातील होता किंवा कसे, याबाबत सत्यशोधन करण्याचा प्रयत्न केला असता असे निदर्शनास आले की, त्या कर्मचाऱ्यांकडे सापडलेले रेमडिसीविर इंजेक्शन ऑटो क्लस्टर कोविड सेंटर मधील असण्याची शक्यता नाही. महापालिकेने नेमलेले समन्वय अधिकारी हे खाजगीत मान्य करतात. मात्र, याची शहानिशा होणे बाकी असतानाच काही मान्यवरांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना पत्र देऊन स्पर्शवर कारवाई करण्याची गळ घातली. निस्पृह कार्यरत असण्यासाठी प्रसिद्ध असलेले पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर दबाव आणून त्यांनाही स्पर्शच्या काविळीने ग्रस्त करण्यात आले. वेष पालटून आपल्याच खात्यातील लोकांची खरी मानसिकता तापसणाऱ्या पोलीस आयुक्तांना पांढरपेशा राजकारण्यांची काळी मानसिकता कशी समजली नाही, हे अनाकलनीय आहे. या पांढरपेशा राजकारण्यांच्या नादी लागून पोलीस तपास करणे समाजस्वास्थ्य बिघडवणारे असू शकते, हे निपक्षपातीपणासाठी प्रसिद्ध असलेल्या पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या लक्षात कसे आले नसावे? की त्यांना ते लक्षात येऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करीत आहेत काय, हे खरे म्हणजे तपासायला हवे. पोलीस आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन स्पर्शवर कारवाई केली नाही, तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली. कोणत्याही गुन्ह्याचा तपास करताना अशी भीती असतेच पण म्हणून तपस केला जात नाही काय? त्याहीपेक्षा एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना काही असामाजिक तत्त्वांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केलाच, तर मग पोलीस कशाला आहेत? अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्यांचे दमन करण्यासाठीच तर पोलिसी व्यवस्था कार्यरत असते, असे सामान्य नागरिक म्हणून आमचे मत असल्यास ते अयोग्य ठरू नये.

पोलीस आयुक्तांच्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काल रविवार दि. ०९ मे रोजी सुट्टीचा दिवस असतानाही ऑटो क्लस्टर कोविड सेंटरचा कारभार फॉरचून स्पर्श हेल्थकेअर कडून काढून घेतला. त्यातही विनोदाचा भाग म्हणजे स्पर्शच्या ज्या कामगार, कर्मचाऱ्यांबाबत ढालगज कारभाराचा आरोप लावला जातो आहे, त्यापैकीच काहींना ताब्यात घेऊन ऑटो क्लस्टर कोविड सेंटरचे कामकाज सुरू ठेवण्याचेही महापालिका आयुक्तांनी निश्चित केले आहे. थोडक्यात, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना हे माहीत असावे कि, आता कार्यरत आहे त्या मंडळींकडूनच ऑटो क्लस्टर कोविड सेंटरचे कामकाज सुरळीत चालू शकते. याचा साधा मतितार्थ एव्हढाच की, अडचण केवळ ते काम स्पर्शकडे असण्याची आहे. कामकाजाची सध्याची पद्धत योग्य असल्याबद्दल आयुक्तांनाही शंका नाही. रुग्णसेवेचे परिवहन योग्यच आहे, फक्त स्पर्शजन्य कावीळ झालेल्या लोकांना आता स्पर्शाचा स्पर्श नको आहे. चोर, दरोडेखोर, माढ्याच्या टाळूवरले लोणी खाणारे, पेशाला काळिमा फासणारे वगैरे शब्द वापरून बदनाम केलेला स्पर्शचा कर्मचारी चालतो, स्पर्श चालत नाही, अशी गमतीदार आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर कदाचित असेही म्हणता येईल, की स्पर्शची कावीळ झालेल्या लोकांच्या समाधानासाठी हा सगळा खटाटोप केला जात आहे काय?

–———––——————————–——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×