ठेकेदारांच्या मुदतवाढीचा त्रास सफाई कामगारांना?

पिंपरी (दि.२६/०५२०२१)
शहर साफसफाईच्या निविदेला झालेल्या उशीरामुळे ठेकेदारांकडे असलेले सफाई कामगार सतत अडचणीत येत आहेत. जानेवारी २०२० पासून सततच्या मुदतवाढीला ठेकेदार कंटाळले असून सफाई कामगारांना त्याचा त्रास भोगावा लागत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचा आरोग्य विभाग, आयुक्त कार्यालय आणि टक्क्यांच्या भाषेशिवाय दुसरे काहीच ऐकण्यास तयार नसलेले राजकारणी यांच्या तिरपागड्यात शहराची साफसफाई आणि ती करणारे ठेकेदार, त्यांचे कामगार सापडले आहेत. सध्या शहर साफसफाईचे काम सात ठेकेदार आणि त्यांच्याकडे काम करणारे पंधराशे पेक्षा जास्त कामगार महापालिकेच्या कामगारांच्या बरोबरीने करीत आहेत. या सर्व ठेकेदारांची मुदत डिसेंबर २०१९ मधेच संपली आहे. तरीही गेले सतरा महिने शहर सफाईचे हे काम मुदतवाढीचा चालढकलीवर चालू असून, त्याचा त्रास ठेकेदार आणि त्यांच्या कामगारांना आता असह्य झाला आहे.
महापालिकेच्या प्रत्येक ठेक्यात राजकारण्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे शहरातील एकूणच ठेकेदार जमात मेटाकुटीस आली आहे. मार्च २०१७ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून तर या राजकीय हस्तक्षेपाने चरमसीमा गाठली आहे. कोणताही ठेका देताना जास्त कालावधी आणि अनेक कामे एकत्र करून निविदा काढण्याचे पेव फुटले आहे. घनकचरा व्यवस्थापन हे तर राजकीय हस्तक्षेपाचे कुरणच आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कचरा वाहतुकीचे सुमारे साडेआठशे कोटींचे काम असेच सात वर्षांसाठी ए. जी. एन्व्हायरो आणि बिव्हीजी या कंपन्यांना राजकीय वरदहस्ताने देण्यात आले. आता त्या कंपन्या शिरजोर झाल्या तरी त्यांच्यावर कारवाई करता येत नाही अशी परिस्थिती आहे. शहर साफसफाईचे कामही असेच एक किंवा दोन ठेकेदारांना वाटून देण्याचा घाट महापालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी घातला होता. मात्र, आर्थिक जुळवाजुळव चुकल्यामुळे तो बेत फसला. त्यानंतर शहरातील रस्ते सफाईचे काम यांत्रिक पद्धतीने करण्याची टूम या मंडळींनी काढली. त्यातही अनेक तांत्रिक मुद्दे अनुत्तरित राहिल्यामुळे त्यावरची प्रक्रिया थांबविण्यात आली. दरम्यानच्या काळात शहर साफसफाईची नवीन निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे राहून गेले. त्यामुळे जुन्याच सात ठेकेदारांना जानेवारी २०२०पासून सतत मुदतवाढ देण्यात येते आहे. सिद्धिविनायक एंटरप्रायजेस, डी. एम. एंटरप्रायजेस, हेमांगी एंटरप्रायजेस, शुभम उद्योग, तिरुपती इंडस्ट्रीयल सर्विसेस, परफेक्ट फॅसिलिटी सर्विसेस आणि गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. हे जुने सात ठेकेदार सध्या शहर साफसफाईचे काम करीत आहेत.
या मुदातवाढीचा प्रकारही ठेकेदारांच्या बोकांडी बसणाराच आहे. प्रत्येक मुदतवाढीचा प्रस्ताव तयार करून प्रशासनामार्फत स्थायी समितीपुढे मांडण्यात येतो. तो मंजूर व्हावा म्हणून प्रशासनाची आणि स्थायी समितीची टक्केवारी पूर्ण करावी लागते. त्यानंतर करारनामा करणे आणि त्यावर स्थायी समिती सदस्यांच्या सह्या घेणे हे अगाध काम ठेकेदाराला पार पडावे लागते. हे सगळे उद्योग मागितलेल्या टक्केवारीसह पूर्ण केल्यावर मुदतवाढीचा आदेश मिळतो. त्यानंतर झालेल्या कामाची तपासणी आणि बिल हा प्रकार अधिकाऱ्यांच्या दाढीला हात लावून ठेकेदाराला करून घ्यावा लागतो,तेव्हा कुठे बिलाच्या रकमेचा धनादेश हातात पडतो. अधिकारी पदाधिकऱ्यांचा मिन्नतवाऱ्या करून बिल मिळेपर्यंत किती कालावधी जाईल याची कोणतीही शाश्वती नसते. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ठेकेदारांना होणारा हा त्रास, इतका भयावह आहे, की ठेकेदार त्यामुळे मेटाकुटीस येतात.
त्यातूनच मग ठेकेदाराकडून सफाई कामगारांचे पगार आणि इतर देणी वेळेत होत नाहीत. त्यामुळे हातावर पोट असलेले कामगार त्रासतात आणि महापालिकेला शिव्याशाप देतात. मुदतवाढीचा हा आतबट्ट्याचा आणि टक्केवारी वाढवणारा प्रकार थांबविणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणतेही सातत्य असलेले काम, त्या कामाच्या ठेक्याची मुदत संपण्याच्या आत नवीन निविदा काढून पुढे चालू ठेवणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी हे मुदतवाढीचे लफडे थांबवावे आणि वेळेत पुढच्या निविदा प्रक्रियेची सुरुवात करावी अशी अपेक्षा सध्या ठेकेदाराकडून व्यक्त होत आहे. आता शहर सफसफाईच्या कामाचा नवा प्रस्ताव तयार करण्यासाठी आयुक्तांच्या मान्यतेचा मसुदा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने तयार केला आहे. या नव्या मसुद्याप्रमाणे आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी आठ ठेकेदार नेमून सुमारे अडीच हजार सफाई कामगार वाढविण्यात येत आहेत. सातत्याने मुदतवाढ करताना ठेकेदारांची होणारी पिळवणूक थांबावी आणि नवीन निविदांची प्रक्रिया सुरू व्हावी, अशी ठेकेदारांचीही मागणी आहे. त्याच बरोबरीने ही निविदा प्रक्रिया करताना राजकीय हस्तक्षेप टाळून कशी पूर्ण करता येतील यावर बारकाईने लक्ष ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
———————————————————