प्रसिद्धी माध्यमांनी लोकप्रतिनिधी आणि लोकसेवकांची अतिरिक्त प्रसिद्धीलोलुपता जोपासू नये!
आवश्यक तेव्हढी प्रसिद्धी कोणालाही आणि कधीही मिळावी, याबाबत कोणाचे दुमत नक्कीच नसते. मात्र, लोकप्रतिनिधी आणि लोकसेवकांना प्रसिद्धीचा अतिरिक्त लाभ मिळवून देणे प्रसिद्धी माध्यमांनी टाळले पाहिजे. ब्रेकींग न्यूज आणि जागा भरण्याच्या गरजेपोटी आणि इतरही अनेक कारणांसाठी जे पत्रकार, बातमीदार हा प्रकार करतात, त्यांनी आपण प्रसिद्धीलोलुपतेचे भस्मासुर जोपासतो आहोत, हे ध्यानात घेतले पाहिजे. अधिकारी आणि राजकारणी यांच्या कच्छपी लागून त्यांना हवी तशी प्रसिद्धी मिळवून देण्याचा प्रकार पत्रकारिता आणि जनसामान्य या दोनही घटकांसाठी घातक ठरतो आहे. ही घातकता आपणच निर्माण करतो आहोत काय, हे प्रसिद्धी माध्यमांनी आता तपासून पाहायला हवे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिद्धी माध्यमे याबाबत किती जागरूक आहेत, याची चर्चा होणे सध्या अत्यंत आवश्यक ठरते आहे.
लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक आपल्या प्रसिद्धीसाठी स्वतःची प्रसिद्धी यंत्रणा उभारतात. ही प्रसिद्धी यंत्रणा प्रसिद्धी माध्यमांना “रेडी टू इट फास्टफूड” पुरवते. मात्र, हे फास्टफूड, जंकफूड आहे की पचनास सुकर आहे, हे तपासणे गरजेचे असते. कारण कोणतेही जंकफूड आरोग्यास घातक ठरू शकते, हे निश्चित. प्रसिद्धी माध्यमे समाजआरोग्यास बांधिल असतात आणि हे जंकफूड नक्कीच समाजाचे आणि प्रसिद्धी माध्यमांचे देखील आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकते. लोकप्रतिनिधी आणि त्यांची प्रसिद्धी यंत्रणा आपल्या अतिरिक्त प्रसिद्धी हव्यासापायी अगदी शुल्लक बाबींची देखील मिठमसाला वापरून आणि खोटेनाटे सांगून प्रसिद्धी मिळविण्यात वाकबगार असतात, किंबहुना त्यासाठीच अशी प्रसिद्धी यंत्रणा तयार केली जाते, हे गेली काही वर्षे स्पष्टपणे दिसून आले आहे.
प्रसिद्धी माध्यमांमध्ये सांप्रतला समाज माध्यमांचा सवंग प्रकार सध्या फार मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. न्यूज पोर्टल आणि युट्युब चॅनल यांच्याबरोबरीनेच दृक्श्राव्य आणि मुद्रित माध्यमांचेदेखील मधमाशांच्या पोळ्यासारखे पेव फुटले आहे. या फुटलेल्या पोळ्यातील बातमीदार म्हणवणाऱ्या माशा कोणाचाही चावा म्हणजे “बाईट” घेतात. आपण ज्यांना चावतो आहोत, त्यांचा वकुब, समाजाप्रती असलेला स्थायीभाव अगर लायकी याचा विचार न करता या समाज माध्यमांतील चावऱ्या माशा काम करीत असतात. सवंग लोकप्रियतेसाठी लोकप्रतिनिधी अगर एकूणच राजकारणी आणि लोकसेवक अर्थात अधिकारी, अशा चावऱ्या माशा पाळतात, फुटकळ दाणापाणी देऊन या माशांना जोपासतात. या फुटकळ दाणापाण्यासाठी ही पेव फुटून आलेली समाज माध्यमे, राजकारणी आणि अधिकाऱ्यांची छानछान प्रसिद्धी करतात. शिवाय दाणापाणी घालणारा पोशिंदा म्हणून या मंडळींनी समाजविघातक अगर समाजाला उपयुक्त नसलेले काही उद्योग केले तरी गप्प बसावे लागते, हे विशेष.
पिंपरी चिंचवड शहरात हा ढालगज प्रकार सर्रास पाहायला मिळतो. लोकप्रतिनिधी आणि राजकारणी यांच्या जोडीने काही लोकसेवकही आता प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी पाळूपोसू लागले आहेत. हे राजकारणी, लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक आपण पाळलेल्या प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींना दाणापाणी घालून आपल्या मूठभर लाकडाची हातभर ढपली काढून देतात आणि मूठभर लाकडाला हातभर ढपली निघू शकतो काय, याचा साधा विचार न करता ही मंडळी त्याची प्रसिद्धी करतात. लोकसेवक, राजकारणी अगर लोकप्रतिनिधी लोकांसाठी हितकर आणि समाजासाठी सुकर काम करण्यासाठीच असतात. त्यासाठीच त्यांना मेहनताना अगर मते दिली जातात. त्यांनी समाजासाठी केलेले काम हे त्यांनी अंगिकारले असते. त्यांच्या या कामाव्यतिरिक्त अगर हे काम करतानाही काही वेगळे केले तर त्याची प्रसिद्धी त्यांना जरूर मिळावी.
मात्र, तशी प्रसिद्धी देताना आपण त्यांना काही अतिरिक्त लाभ तर देत नाहीना, हे प्रसिद्धी माध्यमांनी तपासून पाहणे गरजेचे आहे. नाहीतर हे राजकारणी, लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक समाज ग्रासणारे भस्मासुर ठरतील आणि असे भस्मासुर तयार केल्याचे पाप सर्वच प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमांच्या माथी येईल. या पापापासून वाचण्याचा एकमेव उपाय म्हणजे कान डोळे उघडे ठेवून या राजकारणी, लोकप्रतिनिधी आणि लोकसेवकांच्या कामाचा दर्जा, कार्यकारणभाव आणि उद्देश दृक्श्राव्य, मुद्रित, समाज माध्यमे या सर्वच प्रकारात काम करणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांनी ठरवून तपासला पाहिजे हे महत्त्वाचे! ————————————————-