कोण कोणाला फसवतंय, भाजप राष्ट्रवादीला, राष्ट्रवादी भाजपला, की दोघे मिळून जनतेला?

मैत्रिदिनाची संधी साधून रविवारी १ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड महापलिकेतील गटनेते आणि विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार महेशदादा लांडगेंची भेट घेतली. राजू मिसाळ यांच्याबरोबर त्यावेळी शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, उल्हास शेट्टी, शांताराम भालेकर, राजेश पिल्ले अशी भाजप आणि राष्ट्रवादीची मंडळीही होती. राजकारण बाजूला ठेऊन मैत्रिदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आमदारांना भेटलो, असे या भेटीनंतर राजू मिसाळ यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. त्यापुढे जाऊन राजू मिसाळ यांनी अशीही मल्लिनाथी केली की, पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे राष्ट्रवादीत प्रवेशतील काय, याची चाचपणी करण्याचा त्यांचा मानस होता. ही भेट राजकीय नव्हती, असे स्पष्टीकरणही मिसाळ यांनी माध्यमांना दिले.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, या भेटीचे छायाचित्र ठरवून प्रसिद्धी माध्यमांना पुरविण्यात आले. हा सगळा प्रकार पाहता भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे राष्ट्रवादीला फसवताहेत, की राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ भाजपला फसवताहेत याबाबत शहराच्या राजकीय वर्तुळात मोठा गहजब उडाला आहे. किंबहुना, राजू मिसाळ आणि महेशदादा लांडगे अर्थात राष्ट्रवादी आणि भाजप दोघे मिळून पिंपरी चिंचवड शहरातील सामान्य मतदार नागरिकांना फसवताहेत काय, असा सवाल आता विचारला जातो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरातील प्रमुख नेते, भाजपच्या शहराध्यक्षांना सरेआम भेटतात आणि भाजपचे शहराध्यक्ष या भेटीची “चाय पें चर्चा” म्हणून भलावण करतात, या प्रकारातून कोणाला कसला संदेश दिला जातो आहे, यावर खरे म्हणजे चर्चा व्हायला हवी.

तसे पाहिले तर पिंपरी चिंचवड शहर भाजपमध्ये सगळे काही आलबेल आहे, असे नाही. जुने भाजपाई आणि राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले सध्याचे शिरजोर नेते यांच्यात सुप्त वाद आहेतच. त्याचबरोबर भाजपची झुल पांघरून राष्ट्रवादीला वाकुल्या दाखवणाऱ्या मूळ राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही म्हणावे तसे सख्य नाही. भोसरी विधानसभा मतदारसंघात, ज्याचे भाजप शहराध्यक्ष महेशदादा लांडगे आमदार आहेत, शहराध्यक्ष आणि एकूणच भाजपविषयी असंतोषाचे वातावरण आहे. भाजप शहराध्यक्ष आमदार लांडगेंनाही येत्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शहरातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात विरोध होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे. भाजप आणि त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांमध्ये आमदार लांडगेंच्या एकूणच कार्यपद्धतीबाबत अनेक शंका आहेत. अशा शंकास्पद वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून आणि वर त्याची बातमी करून भाजपचे शहराध्यक्ष आमदार स्वपक्षाच्या उच्चपदस्थ नेत्या, पदाधिकाऱ्यांना काही वेगळा संदेश देऊ पाहात आहेत काय, यावर खरे म्हणजे संशोधन व्हायला हवे.

याशिवाय भाजपच्या ज्या मंडळींना राष्ट्रवादीत जायचे आहे, त्यांच्या मनात काही भीती निर्माण करण्याचा प्रयत्न या भेटीतून केला जात आहे काय, हेही तपासून पाहायला हवे. राष्ट्रवादीत प्रवेश करू इच्छिणाऱ्या भाजपाईंना इथे मी आहेच, तिथेही मीच आहे, अशी भीती निर्माण करण्याचे कारस्थान यामागे आमदार लांडगेंनी रचले आहे काय, ही देखील शक्यता निर्माण होते आणि या करस्थानाला राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहाय्यीभूत आहेत काय, याही शक्यतेची चर्चा शहरात आहे. भाजपचे माजीआजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि आमदार महेशदादा लांडगे, हे दोनही सध्या भाजपवासी असले तरी, मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत. यातही मेख अशी की हे दोघेही आमदार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संपर्क आणि संबंध ठेऊन आहेत, याची ठरवून स्वीकृती हे आणि यांचे समर्थक जाहीरपणे देत असतात. किंबहुना, अजितदादा आमचे कसे ऐकतात, याचे रसभरीत किस्सेही हे भाजपाई आमदार आणि त्यांचे डावेउजवे सांगत असतात. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही याबाबतीत कधी स्पष्ट खुलासा अगर खरी माहिती दिलेली नाही.

आता या भेटीची माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड महापलिकेतील गटनेते आणि विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणतात की, भाजप शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगेंची भाजपमध्ये घुसमट होते आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीत येताहेत काय याची चाचपणी करण्यासाठीची सुरुवात म्हणून ही भेट असल्याचे मिसाळ यांचे स्पष्टीकरण आहे. याही पुढे जाऊन मिसाळ म्हणतात की, २०१४ मध्ये महेशदादा लांडगेंना अजितदादांनी राष्ट्रवादीची उमेदवारी दिली असती, तर पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता गेली नसती. अर्थात भाजपचे आमदार लांडगेची ही घुसमट राष्ट्रवादीच्या राजू मिसाळांद्वारे भाजपाई उच्च पदस्थांपर्यंत पोहोचविण्याची, आमदार लांडगेंचीच ही खेळी आहे काय याची चर्चा देखील जाणकारांमध्ये आहे. या घुसमट पोहोचविण्याचा संबंध भाजपचे माजी शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पायात साप सोडण्याशी असल्याचेही जाणकार सांगतात. थोडक्यात, राजू मिसाळ आणि त्यांच्या साथीदार पाव्हण्यांच्या काठीने भाजपमधील विरोधक साप मारण्याचा प्रयत्न आमदार महेशदादा लांडगे करताहेत काय, असे कोणास वाटल्यास वावगे ठरू नये.

राजू मिसाळ, प्रशांत शितोळे यांच्यासारखे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख स्थानिक नेते, भाजपच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगेंना सरेआम भेटतात आणि त्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना पुरवितात, हे या दोनही पक्षात अराजकता माजविणारे असल्याचे जाणकार सांगतात. हे भेटनाट्य सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करणारे आहे आणि येत्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हानिकारक आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपसाठी हे भेटनाट्य, पक्ष सोडून जाणाऱ्यांच्या मनात दचकदिवा पेटवणारे ठरल्यास वावगे ठरू नये. याचबरोबर राष्ट्रवादीच्या सत्ताकांक्षी नगरसदस्य आणि कार्यकर्त्यांमध्ये यामुळे अराजकता आणि संभ्रम निर्माण होण्याचीच शक्यता आहे. त्यापेक्षाही वेगळे म्हणजे आम्ही सर्व एकच आहोत, आम्ही सगळे भाऊ भाऊ, मिळून महापालिका घरी नेऊ, असा संदेश यातून हे दोनही पक्षाचे लोक शहरवासीयांना देत आहेत काय, यावर विचार करावा लागेल.

थोडक्यात, राजू मिसाळ, महेशदादा लांडगे हे दोनही परस्पर विरोधी पक्षाचे शहरातील प्रमुख नेते, या भेटनाट्यातून नक्की कोणाला फसवताहेत, यावर चर्चा व्हायला हवी. पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप, सत्ता मिळवू पाहणाऱ्या राष्ट्रवादीला फसवताहेत की, राष्ट्रवादीचे सत्ताकांक्षी स्थानिक नेते, भाजपला फसवताहेत, की हे दोनही पक्ष आणि त्यांचे शहरातील प्रमुख सामान्य मतदारांना फसवताहेत, अगर हे दोनही पक्षाचे स्थानिक नेते मिळून आपापल्या पक्षाला फसवताहेत, याचे उत्तर नजीकच्या काळात या दोनही पक्षांचे उच्चपदस्थ देतील अशी अपेक्षा!                      ———————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×