भोसरीत विलास लांडेंच्या गाठीभेटींमुळे भाजपच्या चाणक्यांची पळापळ आणि दमछाक!

भोसरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे यांनी गाठीभेटी वाढवल्यामुळे भाजप शहराध्यक्षांच्या चाणक्यांमध्ये पळापळ सुरू झाली आहे. भोसरीतील काही जुन्या आणि प्रभावी व्यक्तींच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा विलास लांडे यांनी गेल्या काही दिवसांपासून लावला आहे. ज्या ठिकाणी माजी आमदार भेट देऊन येतात, त्या ठिकाणी भोसरीचे आमदार आणि भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष महेशदादा लांडगे यांचे चाणक्य पोहोचत आहेत. विलास लांडे यांच्या पाठलागावर राहण्यात आता या चाणक्यांची पुरती दमछाक होत असली तरी, या भेटीमुळे आपले हितचिंतक दुरावतील अगर हितशत्रू वाढतील, या भीतीपोटी ही दमछाक करणारी पळापळ आता भोसरी आमदारांच्या चाणक्यांना करावी लागत आहे.

राजकीय गुंड्या खेळण्यात वाकबगार असलेले आणि राजकीय फंडे वापरण्यात कायम अग्रेसर असलेले भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे, येत्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काहीसे सक्रिय झाले आहेत. आपले काही जुने, प्रभावी आणि दुरावलेले हितसंबंधी पुन्हा संपर्कात आणण्यासाठी विलास लांडेंनी गाठीभेटींचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे या गाठीभेटींसाठी अगदी ठरवून राजकारणात नसलेल्या, मात्र त्या परिसरात आपला प्रभाव राखून असलेल्या व्यक्ती आणि कुटुंबांना विलास लांडे यांच्याकडून प्राधान्य देण्यात येत आहे. आपल्या समर्थकांची आणि हितसंबंधितांची संख्या रोडावेल या भीतीने, आता भोसरीचे आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष महेशदादा लांडगे यांच्या चाणक्यांना ग्रासले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा यशस्वी कार्यक्रम भाजपचे शहराध्यक्ष असलेल्या भोसरीच्या आमदारांच्या चाणक्यांनी गेला महिनाभर राबवला. हा कार्यक्रम राबवित असतानाच शहरात भाजपची सक्षम यंत्रणा निर्माण करण्याचे प्रयत्नही सुरू ठेवले. येत्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शंभर पेक्षा जास्त नगरसदस्य निवडुन आणण्याची खेळी करण्याच्या या भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या प्रयत्नांना आपल्या घरच्या मैदानातूनच म्हणजे भोसरीतूनच खो बसण्याची शक्यता निर्माण झाल्याची भीती या चाणक्यांमध्ये निर्माण करण्यात विलास लांडे आता यशस्वी ठरत असल्याने भाजपच्या गोटात पळापळ झाली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पुढाऱ्या, कार्यकर्त्यांना गोंधळात पाडण्यासाठी भाजपच्या शहराध्यक्ष आणि त्यांच्या चाणक्यांनी वेगवेगळे फंडे वापरले आहेत. “चाय पे चर्चा” पासून अगदी राष्ट्रवादीचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या वाढदिवसाचा फलक लावण्यापर्यंत सर्व हातकंडे भाजपने वापरले आहेत. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी दोस्ताना दाखवून राष्ट्रवादीच्याच पाठीत गफलतीचा खंजीर खुपसण्याचा हा कार्यक्रम भाजप करीत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे स्थानिक नेतेही भाजपच्या शहाराध्यक्षांनी पाठीत खुपसलेला हा खंजीर, पक्ष खड्डयात जाईल हे माहीत असूनही फुशारकीने मिरवण्यात मश्गुल आहेत, किंवा त्यांना तसे ठेवण्यात आले आहे. शहरातील राष्ट्रवादीच्या इतर सर्व नेत्या, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात यशस्वी झालेले शहर भाजपाई, भोसरीतच अयशस्वी ठरतात काय अशी परिस्थिती विलास लांडे यांच्या सक्रीयतेमुळे निर्माण झाली आहे.

राजकारणात “पुराने चावल” असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार विलास लांडे, भोसरीत सक्रिय झाले म्हणून बावचळलेले भाजप शहराध्यक्षांचे चाणक्य, ते जर शहरात गाठीभेटी घेऊ लागले तर काय, असे मत आता जाणकार व्यक्त करीत आहेत. हे “पुराने चावल” नक्की काय खिचडी पकवतात, या खिचडीत काय काय मिश्रण वापरतात आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ती खिचडी कोणाच्या घशात घालतात, हे पाहणे आगत्याचे ठरणार आहे. राजकीय गावगुंड्या करण्यात भोसरीचे माजी आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष विद्यमान आमदार महेशदादा लांडगे यांचे मामेसासरे, विलास लांडे भोसरीचे राजकीय गणित बदलण्याचा प्रयत्न करताहेत हे नक्की. मात्र त्याचे बळ आणि फळ नक्की कोणाला, कितपत आणि कसे मिळते याकडे पिंपरी चिंचवड शहरवासीयांचे आणि राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे.

———————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×