प्रतिहल्ला करण्याचा नादात, भाजपाई चाणक्यच भाजपची नाव रसातळाला नेतील!

नेटाने आणि निक्षून प्रतिहल्ला करण्याचा डाव कधीही अंगलट येऊ शकतो, याची जाणीव ठेवली नाही, तर आपलीच नाव रसातळ गाठण्याचा धोका अधिक, हे नक्की. पिंपरी चिंचवड शहर भाजपाई आणि त्यांच्या चाणक्यांना हे कोणीतरी समजावून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येकाच्या जातकुळींची जंत्री ठेवणाऱ्या कुळकर्ण्यांच्या प्रसादसेवनाने तृप्त होऊन, कोणीही कितीही अधिकचे दिवे लावले, तरी शहर भाजपची नाव येत्या महापालिका निवडणुकीत डुंबणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.आपली डुंबणारी नाव वाचवण्याचा प्रयत्नात कितीही आणि कोणीही अधिकचे दिवे लावल्याने सत्य लोपत नाही, तर त्यावर अजून प्रकाश पडून त्या सत्याला नवी झळाळी येते.

प्रसिद्धी माध्यमांना वापरून आणि धाकदपटशा दाखवून पिंपरी चिंचवड भाजप कदाचित आपली नाव वाचवू शकेल असे या चाणक्यांना वाटत आहे. त्यांनीच आतापर्यंत केलेल्या ढालगज कारभारामुळे जनसामान्य भाजपवर नाराज झाले आहेत. दोहो करांनी महापालिकेची लूट करून झाल्यावर आता मतदारांना उत्तरे द्यावी लागतील, या भीतीने शहर भाजपाईंना पुरते ग्रासले आहे. केवळ प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून आणि आपल्याला हवे तेच आणि तसेच घडेल यावर मिथ्याभिमान पाळून आता भाजपची नाव वाचणार नाही. आपल्या आतापर्यंतच्या सत्ताकाळात, पिंपरी चिंचवड महापालिकेची गाय अक्षरशः दुहून घेणाऱ्या भाजपने, केवळ काही मोजक्यांना या गायीच्या कासेत हात घालण्याची संधी दिली. त्यामुळे ज्यांना ही गाय दुहण्याची मुभा नाकारण्यात आली, ते भाजपपासून दुरावणारच, हे शाश्वत सत्य आहे.

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अराजकता माजवून, त्या पक्षात आपले काही होणे शक्य नसल्याची भावना निर्माण करण्यात आपली शक्ती शहर भाजपाई चाणक्यांनी जाया केली आहे. राष्ट्रवादीच्या काही लोकांना कच्छपी लावून पूर्ण राष्ट्रवादी नामोहरम करता येईल, यावर भाजपाई जोर देत असतानाच स्वपक्षातील नाराजांची मनोधारणी करण्याचे राहून गेले आहे. दिवसेंदिवस नाराज शहर भाजपाईंची संख्या वाढत आहे. वाद आणि सुसंवाद यातील फरक पिंपरी चिंचवड शहर भाजप अध्यक्षांच्या चाणक्यांना न करता आल्यामुळे हा सगळा सावळागोंधळ निर्माण झाला आहे. प्रत्येक बाब अध्याहृत धरून राजकारण चालवत येत नाही, याची जाणीव खरे म्हणजे या भाजपाई चाणक्यांना करून दिली पाहिजे. व्यक्तिपरत्वे आणि स्थळकाळपरत्वे राजकारणाची समीकरणे बदलत असतात. ही बदलणारी समीकरणे समजावून घेण्याची ताकद अगर कुवत, या भाजपाई चाणक्यांमध्ये आहे काय, हेही भाजप शहाराध्यक्षांनी समजून घेतले पाहिजे. अर्थात तशी कुवत त्यांच्यामध्येच मुळात आहे काय, हा खरा प्रश्न आहे.

आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत, सध्या भाजपचे शहराध्यक्षपद असलेल्या आमदारांनी केवळ धमकीचे राजकारण केले असल्याची चर्चा शहरात आहे. मात्र, काही मंडळी धमकीच्या पलीकडची हिम्मत ठेऊन असतात आणि त्यांना घाबरवणे सोपे नसते, हेही पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष आणि त्यांच्या चाणक्यांनी उमगून घेतले पाहिजे. त्याचबरोबर केवळ प्रसिद्धी माध्यमे वापरून अगर गोबेल्सनीतीचा वापर करून पक्ष चालवता येत नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. आज प्रसिद्धी माध्यमे विकत घेऊन काहीही प्रसूत करता येईल कदाचित. मात्र, शहरवासी सामान्य मतदार मूर्ख नसतो, समाजसमूह वेडगळ ठरविण्याचा प्रयत्न कधीही सफल होत नाही. समाजसमूहाची मानसिकता आणि समजून घेण्याची ताकद अजमावण्याचा प्रयत्न कोणत्याही राजकारण्यांनी करू नये. सत्य आणि वस्तुस्थितीशी सामना करीतच हा सामान्य समाजसमूह आपले जीवन व्यतीत करीत असतो.

सूर्य झाकण्याचा प्रयत्न करणारे अनेक वेड्यात जमा झाले. पिंपरी चिंचवड शहरात, शहर भाजपने काय दिवे लावले, हे सुर्यप्रकाशाइतके स्वयंस्पष्ट आणि ढळढळीत आहे. अराजकता, भ्रष्टाचार, आपमतलबी आणि सुडाचे राजकारण, हितसंबंधी आणि बगलबच्चे पोसण्यासाठी निर्माण केलेली यंत्रणा यामुळे पिंपरी चिंचवड शहरवासी त्रस्त आणि उद्विग्न झाले आहेत. शहर भाजपने महापालिका आणि शहरवासीयांना किती घाणेरड्या पद्धतीने वापरले, हे आता समाजसमूहाच्या दृष्टीसमोर निखालस सत्य म्हणून पुढे आले आहे. आता सूर्यप्रकाशात कितीही अधिकचे दिवे लावले तरी आणि प्रसिद्धी माध्यमे वापरून कितीही प्रयत्न केला तरी, पिंपरी चिंचवड शहर भाजपची नाव डुंबण्यापासून वाचणे दुरापास्तच!
——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×