शहर भाजपचा भ्रष्टाचारी नंगानाच उघड, पण माणूस चुकीचा सापडला!
भाजप म्हणजेच भ्रष्टाचाराने जखडलेला पक्ष, असे समिकरणच आता पिंपरी चिंचवड शहर राजकारणात स्पष्ट झाले आहे. काल १८ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छाप्यात महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. २०१७च्या मार्च महिन्यात पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता धारण केल्यापासून भाजपने जो भ्रष्टाचाराचा नंगा नाच चालवला आहे, त्याचा काल कळस झाला. पण भाजपचे अनेक भ्रष्टाचाराची सीमा गाठून संतोष पावणारे विलासी चेहरे सुटले आणि चुकीचा माणूस सापडला, याबाबत शहरात हळहळ व्यक्त होत आहे. महापालिका स्थायी समितीत टक्केवारीचेच गणित असते, हे उघड गुपित असले तरी बोकांडी बसून खिसा मारण्याचा प्रकार घडल्याने हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा पडला आहे, हे त्यातील खरे सत्य आहे. नितीन लांडगे यांचा स्वभाव कोणाच्या खिशात हात घालण्याचा नाही. मग त्यांना एखाद्या ठेकेदारावर अशी बळजोरी का करावी लागली, याचे संशोधन झाले पाहिजे.
हे संशोधन करताना अनेक विदारक सत्ये बाहेर येतील. यातील सर्वात प्रमुख सत्य म्हणजे भाजपच्या सत्ताकाळात वाढलेली टक्केवारी. वरकमाईचा भ्रष्टाचार, भरलेल्या ताटातील लोणचे, पापडाएव्हढाच असावा असा दंडक आहे. मात्र, पिंपरी चिंचवड शहर भाजपाईंनी अख्खे ताटच भ्रष्टाचाराने लडबडवले आहे. आपल्या सत्ताकाळात कोणत्याही ठेकेदार, पुरावठादाराची मानगूट धरून त्यावर बलात्कार करण्याची पद्धत या भाजपाईंनी अवलंबली आहे. ठेकेदार, पुरावठादारांना सत्तेचा लाभ मिळवून देण्याच्या बदल्यात काही टक्क्यांवर हात मारणे, इतपतच राजकीय हस्तक्षेप असावा, हा आतापर्यंतचा दंडक मोडून शहर भाजपचे नगरसदस्य, पदाधिकारीच आता ठेकेदार झाले आहेत. ज्या बाबींची ठेकेदारी घेता येत नाही, त्या बाबींच्या ठेकेदारांवर टक्केवारीचा बलात्कारी बडगा या भाजपाईंनी उगारला आहे.
वाढलेल्या टक्केवारीचा हिस्सा कोणाला?
शहराचे दोन भाग करून पिंपरी चिंचवड महापालिकेला पुरते नागवणारे सत्ताधारी भाजपचे माजीआजी शहराध्यक्ष दोन्ही हातांनी महापालिका लुटीचा कार्यक्रम करीत आहेत. महापालिकेच्या जादाच्या भ्रष्टाचाराचे हेच हिस्सेदार आहेत काय, यावर आता सखोल संशोधन झाले पाहिजे. शहराचे वाटे घालून वाट लावणारे हे माजीआजी भाजप शहराध्यक्ष आणि त्यांनी पोसलेली भ्रष्टाचारी पिलावळ महापालिकेत धुडगूस घालताहेत. त्यांच्याच हिस्स्यासाठी, त्यांच्या अखत्यारीत राजकारण करणाऱ्यांना ठेकेदार, पुरावठादारांच्या बोकांडी बसावे लागते, हे उघड गुपित आहे. सत्तासुंदरीचा हळुवार उपभोग घेण्याऐवजी तिच्यावर बलात्कार करणारे हे भाजपाई कारभारी, स्वच्छ कारभाराची आणि सामाजिक राजकारण अर्थात सोशल पॉलिटिक्स ची भाषा दांभिकपणे करतात, हे आणखी विशेष.
नितिन लांडगेंनी “खाया पिया कुछ नहि, गिलास तोडा बारा आना”!
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छाप्यात सापडलेले, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे, शहर भाजपाईंमध्ये असलेल्या काही मोजक्या चांगल्या व्यक्तींपैकी एक आहेत, यावर दुमत नाही. मात्र, भोसरीच्या राजकारणात स्वतःला महा ईश म्हणजेच महेश्वर समजणाऱ्या भाजप शहराध्यक्ष आणि त्यांच्या छोट्या मोठ्या पिलावळीचे ते शिकार झाले आहेत. या मंडळींची तुंबडी भरण्यासाठी नितीन लांडगेंचा बळी गेला, हे या प्रकरणातील एक विदारक सत्य आहे. थोडक्यात, पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाईंची राजकीय हरामखोरी शहराला किती घातक आणि घाणेरडी आहे, याचे हे एक उदाहरण आहे.
सुमारे पन्नास वर्षांचा राजकीय वारसा असलेले नितीन लांडगे, भोसरीच्या भ्रष्टाचारी भाजपाई लांडग्यांच्या अतिरेकी हव्यासाचे बळी ठरले आहेत. या भ्रष्टाचारी लांडग्यांची सत्ता आणि संपत्तीची हाव या शहराला आणि येथल्या एकूणच राजकारणाला किती खालच्या पातळीवर नेणार आहेत, हे आता सारासार विचारशक्तीच्या पलीकडचे झाले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या लोकप्रतिनिधीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा मारल्याची ही घटना शहर भाजपाईंच्या अतिरेकी कारभाराचा नमुना म्हणून भविष्यात उल्लेखली जाणार आहे. या कायमच्या उल्लेखामुळे नितीन लांडगे यांची अवस्था “खाया पिया कुछ नहीं, गिलास तोडा, बारा आना भरना” अशी होऊन, त्यांच्यासारख्या सज्जन माणसाला मात्र, नमुन्यावरी बदनाम व्हावे लागेल, हे जास्त महत्वाचे.
भाजपच्या सत्ताकाळातील निर्णयांची चौकशी व्हावी.
मार्च २०१७ पासूनच्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या निर्णयांची या निमित्ताने चौकशी व्हावी, अशी अपेक्षा या शहरातील कारदाता नागरिक करीत आहे. या काळात दिला गेलेला प्रत्येक ठेका, प्रत्येक ठेकेदार आणि त्या ठेकेदारांमागे असलेले राजकीय हात आता शोधून काढले पाहिजेत. महापालिकेत पुन्हा सत्ता स्थापन करण्याची अतोनात इच्छा बाळगून असलेले आणि राज्यातील सत्तेत सहभागी असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्वर्यू, आता नक्की काय करताहेत, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छाप्याच्या निमित्ताने अशा प्रकारची चौकशी नक्कीच लावता येऊ शकेल. मात्र, त्यासाठी शहर पातळीवरील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या, कार्यकर्त्यांनी जोर धरला पाहिजे. कदाचित सत्ताधारी भाजपचे काही लाभधारक याकडे दुर्लक्ष करतीलही, मात्र, आपल्या लाभासाठी ही बाब नजरंदाज करून, सत्तेपर्यंत पोहोचण्याचा एक ढळढळीत मार्ग म्हणून तरी विरोधी पक्षाच्या लोकांनी या सुवर्णसंधीची माती करू नये.
तसे पाहिले तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर पडलेल्या, या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छाप्यात अनेक पोटकथानके, आणि अनेक आयाम अनुस्यूत आहेत. त्यावर कालपरत्वे संशोधन करणे होईलच. मात्र, या भाजपाई भ्रष्टाचाराला शहरातील प्रसिद्धी माध्यमेही तितकीच जबाबदार आहेत, हे विशेष. कोणत्याही सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याच्या जबाबदारी प्रसिद्धी माध्यमांची असते. म्हणूनच प्रसिद्धी माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असे संबोधले जाते. जनसामान्यांचे हक्क आणि अधिकार जोपासणे, त्यासाठी सत्ताधाऱ्यांना अगर कोणत्याही राजकीय प्रणालीला प्रश्न विचारणे आणि लोकशाही सुकर आणि समृद्ध ठेवणे, हे प्रसिद्धी माध्यमांचे कर्तव्य आहे. मात्र, बहुतांश प्रसिद्धी माध्यमांचे व्यापारीकरण झाले असल्याने, त्यांच्या अंकुशाचे टोक बोथट झाले असल्याचे चित्र, सध्या स्पष्टपणे निर्माण झाले आहे. आता समाज माध्यमांचे बऱ्यापैकी पेव फुटले आहे. पुन्हा एक मात्र निर्माण करून असे खेदाने म्हणावे लागेल की, ही बहुतांश समाज माध्यमे आणि त्यांचे चालक, मालकही राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणांचे लाभधारक झाले आहेत. मग, राजकीय आणि प्रशासकीय अनागोंदी आणि भ्रष्टाचाराचा पोलखोल नक्की कसा, कधी आणि कोण करेल, या चिंतेत सर्वसामान्य करदाता आणि मतदार बुडाला असल्यास वावगे ठरू नये.
——————————————————