शहर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना, आता धाक दाखवणारा बाप हवा!

कुटुंबात बापाचे महत्त्व असाधारण असते. ज्याला बाप नाही त्याला याची जाणीव नक्कीच येईल. प्रसंगी पाठीवर थाप मारणारा आणि वेळ आली तर पाठीत धपाटा घालणारा बाप असला की धाक आणि प्रेम दोनीही असते. बाप नसेल, तर चुलता, मालता, थोरला भाऊ असे कोणीतरी हवेच. ज्याला कुटुंबातील अडचणी सांगता येतील आणि त्या अडचणी सोडवून जो कुटुंब रांकेला लावू शकेल, असे विसंबून राहता येण्याजोगे व्यक्तिमत्व, ही प्रत्येक कुटुंबाची गरज आहे. आज पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बाप नसल्याची अवस्था आहे. बापगिरी करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार दुर्लक्ष करताहेत, असे वाटावे इतपत या शहरातील राष्ट्रवादी मोकाट झाली आहे. एकतर अजितदादांनी पुन्हा आपली बापगिरी या मंडळींना दाखवावी, किंवा ज्याला बाप म्हणता येईल अशा कोणाकडे या शहराची धुरा सोपवावी. अन्यथा राष्ट्रवादीची ही मोकाट सुटलेली पिलावळ, शहर राष्ट्रवादी बुडवतील अशी अवस्था सांप्रतला शहरात निर्माण झाली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस वाली अगर बाप नसल्यामुळे सैरभैर झाली आहे. कोणीही यावे, टिकली मारून जावे, आशा अवस्थेत ज्याला जे घावेल ते घेऊन पोबारा करण्याची वृत्ती आता शहर राष्ट्रवादीत बळावू लागली आहे. नगरसदस्य आणि सवते सुभे राखणारे सुभेदार, म्हणजेच राजकीय पक्ष अशी धारणा घेऊन शहर राष्ट्रवादी काम करीत आहे. मात्र दुसऱ्या फळीतील नेते, गल्लीबोळात कार्यकर्ते, ज्यांच्या जीवावर समस्त राजकारणी अवलंबून असतात, ते सामान्य मतदार यांचे ऐकणारा अगर त्यांना आश्वस्थ करणारा नेता, ही पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीची खरी गरज आहे. महापालिका निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची मंडळी शंभराहून अधिक नगरसदस्य निवडून आणण्याची भाषा करताहेत आणि आपली गेलेली सत्ता परत मिळवण्याची स्वप्ने पाहणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते, भाजपच्या चक्रव्यूहात अडकवून पडले आहेत.

सत्ताधारी भाजप शहराच्या गल्ली मोहल्ल्यात मतदार केंद्रनिहाय प्रतिनिधी नियुक्त करून त्यांच्या बैठका घेत असताना, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नेते त्यांच्याशी “चाय पे चर्चा” करताहेत. शहर राष्ट्रवादी पुरती गाफील ठेवण्याचा हा कार्यक्रम भाजपच्या राजकीय खेळीचा एक भाग असल्याची चर्चा शहरात होत असताना, भाजपच्या नेत्यांच्या कच्छपी लागलेल्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या हे लक्षात येत नसेल काय, हा खरा प्रश्न आहे. सध्या पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोणतेही आग्रही धोरण नाही. सत्ताकांक्षी असलेल्या राष्ट्रवादीकडे, भाजपकडून सत्ता काबीज करण्यासाठी कसलाही ठोस पुढाकार नाही. शहरभर पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपने केलेल्या कारभाराबद्दल नाराजीचा सूर आहे. महापालिकेत भाजपने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असल्याची बोंब सर्वसामान्य मतदारांपर्यंत होते आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या गोटात स्मशानशांतता आहे. काही फुटकळ आंदोलने आणि पत्रकबाज विरोध यापेक्षा वेगळे काही करताना कोणी दिसत नाही.

स्थानिक नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या गोटात स्मशानशांतता असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. मागच्या निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते आपल्या साधनसमग्रीसह सज्ज आहेत. नव्याने सत्तासोपान चढण्याची इच्छा असलेले अनेक कार्यकर्ते गुढग्याला बाशिंग बांधून तयार आहेत. राष्ट्रवादीचे हे दुसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्ते आता पहिल्या फळीतील नेत्या, कार्यकर्त्यांच्या सुरुवातीची वाट पाहात आहेत. मात्र, निश्चिंतपणे सत्ताधारी भाजपाईंनी पासरवलेल्या जाळ्यावर दाणे वेचण्यात मश्गुल असलेले हे सत्ताकांक्षी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, आपण जाळ्यावर आहोत आणि पुरते फसले आहोत, हे लक्षात घ्यायला तयार नाहीत. जे या जाळ्याच्या बाहेर आहेत आणि उडण्याची क्षमता राखून आहेत, तेही आम्ही का उडावे, काहीतरी कारण हवे म्हणून वाट पाहात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, सत्ताधारी भाजपाईंनी पसरवलेल्या जाळ्यावर बसलेल्या आणि जाळ्याबाहेर असलेल्या प्रत्येकात उडण्याची क्षमता नक्कीच आहे, गरज आहे ती सांघिकपणे उडण्याची. अर्थात असे सांघिकपणे उडण्यासाठी पाठबळ देणारा आणि, अथवा आपल्या उडण्याच्या क्षमतेची जाणिव करून देणारा बाप हवा आहे. पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीवर बापगिरी करू शकणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, आपल्या कार्यबाहुल्ल्यामुळे व्यस्त आहेत. मग त्यांनी या शहराच्या राष्ट्रवादींना दुसरा बापमाणूस द्यावा, अशी मागणी आता होत आहे. बाप नसला तर, आजा, चुलता, मालता, मोठा भाऊ, पालक, मालक, अगदीच गेलाबाजार एखादा कारभारी सुद्धा चालेल. गरज एव्हढीच की, त्याने प्रसंगी पाठीवर थाप आणि आवश्यकता भासल्यास पाठीत धपाटा मारण्याची क्षमता धारण केलेली असावी. आपल्या सांघिकपणे उडण्याच्या क्षमतेची जाणीव करून देणाऱ्याच्या आशेवर सध्या पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी आहे. त्यांची ही आशा लवकर पूर्ण होवो, ही अपेक्षा!
———————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×