निरक्षीर विवेकाची भाषा करणाऱ्या भाजपाईंनी, विवेकाला जागा ठेवली आहे?

स्वतःच निर्माण केलेल्या परिस्थितीने पालथे पाडल्यावर, आभाळाला लाथा मारण्याचा आव आणण्याचा चमत्कारिक प्रकार काल पिंपरी चिंचवड शहर भाजपाईंनी केला. लाचलुचपत प्रकरणी अटक झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेंना उद्या शनिवार २१ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजपचे शहराध्यक्ष महेशदादा लांडगे, दूध का दूध, पानी का पानी होईल अशी प्रतिक्रिया प्रसिद्धी माध्यमांसमोर कंठारवाने देते झाले. मात्र अशी निरक्षीर विवेकाची भाषा करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहर भाजपाईंनी विवेकाला जागा ठेवली आहे काय, याचे खरे आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन केले पाहिजे. आपल्या भ्रष्टाचारी, अनागोंदी आणि अराजक कार्यपद्धतीमुळे ही परिस्थिती आपल्यावर ओढवली असल्याची स्पष्ट जाणीव होऊनही, “गिरे तो भी, टांग उपर” असल्याचे दर्शविण्याचा चमत्कारिक प्रयत्न शहर भाजपाई करताहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका इमारतीत, तेही स्थायीसमिती अध्यक्षांच्या स्वीय सहायकाच्या दालनात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या करवाईवर अनेक स्तरावरून प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. स्थायी समिती बरखास्त करा, इथपासून अगदी महापालिकाच बरखास्त करा, इथपर्यंत अनेकांनी आपली बुद्धी पाजळली. मात्र, या सर्व धबडग्यात प्रशासकीय यंत्रणेत उडालेला गहजब वेगळाच होता. आता पिंगळ्यांचा ज्ञानेश्वर, कोणकोणत्या रेड्यांना बोलायला लावतो आणि कोणाकोणाचे भविष्य बिघडवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशी भ्रष्टाचाराची बोंब होणे, हे कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेसाठी घातक असते. कारण भ्रष्टाचाराची सुरुवातच मुळी प्रशासकीय पातळीवरून होते. प्रशासनाने कोणाचे, का आणि किती ऐकावे, हा भ्रष्टाचाराचा मूळ पाया आहे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत कोण, कोणाचे, किती ऐकतो, याची ठाम समिकरणे आहेत. या निमित्ताने ही समिकरणे कदाचित बदलतीलही. मात्र, समिकरणे मांडणे आणि त्याबरहुकूम गणिते सोडवणे, चालूच राहते. स्थायी समितीचे टक्केवारीचा समिकरण बिघडले म्हणून गणित चुकले आणि गणित चुकले, म्हणून गहजब झाला. आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेची समिकरणे आणि गणिते बिघडली काय, बिघडली तर कितपत, यावर आता संशोधन करणे गरजेचे झाले आहे.

पुन्हा मूळ मुद्दा असा की, दूध आणि पाणी नक्कीच वेगवेगळे होईल, अशी वल्गना भाजप शहराध्यक्षांनी केली आहे. मात्र, दुधात पाणी, तेही खारट, मिसळून दूध नासवण्याचे काम करणारेच अशी निरक्षीर विवेकाची भाषा करताहेत, हे खरे दांभिकपणाचे. त्यापेक्षा मोठा दांभिकपणा म्हणजे, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी या लाच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांची नियुक्ती केली आहे. आता आमदार महोदया नक्की कसली चौकशी करणार आणि शहानिशा करणार म्हणजे नक्की काय करणार, हे अनाकलनीय आहे. घटना तर घडली, त्यावर आतापर्यंतची कारवाईही झाली, पुढेही भारतीय दंड संहितेनुसार ती होत राहील. मग शहानिशा आणि चौकशी कसली होणार, याकडे शहराचे डोळे लागले आहेत.

एक मात्र खरे की, गेले उणेपूरे अर्धे शतक राजकारणात सक्रिय असलेले आणि अनेक संस्था लीलया आणि लांछन न लागू देता सांभाळणारे, भोसरीच्या राजकारणातील पितामह, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या चांगुलपणाचा वापर करण्यासाठी आता हे भ्रष्टाचारी भाजपाई नक्कीच प्रयत्न करणार आहेत. या भाजपाईंच्या अतिरेकी भ्रष्टाचाराचेच ही कारवाई, एक प्रकारचे फलीत आहे, हे झाकण्याचा प्रयत्न आता भाजपाई करतील. पिता म्हणून आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न, अगदी आपली आतापर्यंतची राजकीय कारकीर्द पणाला लावून, ज्ञानेश्वर लांडगे करतील आणि याच फायदा घेऊन आपली पापे धुण्याचा या भाजपईंचा पुढचा टप्पा असणार आहे. अर्थात आपला चिरंजीव या भ्रष्टाचारी मंडळींच्या नादी लागूनच गोत्यात आला असल्याचे सत्य, ज्ञानेश्वर लांडगेंच्या लक्षात येणार नाही, असा हा पोकळ आशावाद आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेला अक्षरशः ढकलून भ्रष्टाचाराच्या खाईत लोटणारे, हे भाजपाई आता “दूध का दूध, पानी का पानी” अशी निरक्षीर विवेकाची भाषा करताहेत. मात्र, आपल्या अविवेकी, भ्रष्टाचारी आणि अनागोंदी राजकारणामुळे ही परिस्थिती ओढवली आहे, हे कबूल करण्याची, निदान स्वतःला समजून सांगण्याची हिम्मत ही भाजपाई मंडळी दाखवणार आहेत काय, हा खरा प्रश्न आहे. तेव्हढा विवेक या मंडळींमध्ये आहे काय अगर तशी जागा या मंडळींनी ठेवली आहे काय, यावर मूलतः आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन, या मंडळींनी स्वतःहून करणे गरजेचे आहे.

———————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×