अनेकांना हातात राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्याची इच्छा, पण…….?

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड शहर भाजपची पत धोक्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपच्या कमळाबाईंची मगरमिठी तोडून हातात राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्याची अनेकांनी तयारी चालवली आहे. पण दुर्दैव असे की, या घड्याळ धारण करू इच्छिणाऱ्या मंडळींना घड्याळाकडे नेणार कोण आणि घड्याळाच्या घाऊक मक्तेदारांकडे जाणार कोण याबाबत सध्यातरी गोंधळच निर्माण झाला आहे. हातात घड्याळ बांधण्याची उत्कट इच्छा व्यक्त कुणाकडे करायची, घड्याळ बांधणाऱ्याला कसे भेटायचे, स्वतःच जायचे, की कोणीतरी वाटाड्या शोधायचा, असे प्रश्न आता घड्याळाची इच्छा असणाऱ्यांपुढे निर्माण झाले आहेत. घड्याळाचे मक्तेदार नामदार अजितदादा पवार यांच्यापर्यंत या घड्याळ धारण करू इच्छिणाऱ्यांच्या इच्छा पोहोचविणाऱ्यांची वाट पाहिली जात आहे. जे या इच्छाधारींना घड्याळाकडे नेऊ शकतात, ते या इच्छाधारींकडे दुर्लक्ष करताहेत आणि जे या इच्छाधारींची मोट बांधण्याचा प्रयत्न करताहेत, त्यांना थोपवण्याची खेळी केली जात असल्याचे तक्रार आता शहरात निर्माण झाली आहे.

शहराचे वाटे घालून शहर वाटून घेणारे पिंपरी चिंचवड शहर भाजपचे माजीआजी शहराध्यक्ष आमदार, केवळ आपल्या बगलबच्च्यांनाच पोसताहेत. बाकीच्यांना वाटाण्याच्या अक्षता लावून वाटे लावले जात असल्याची भावना आता शहर भाजपाईंमध्ये बळावू लागली आहे. माजीआजी भाजपाई शहराध्यक्षांच्या हितसंबंधितांच्या कणग्या भरून वाहताहेत आणि बाकीचे केवळ आशाळभूत, अशी परिस्थिती, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्ताधारी भाजपाईंची आहे. त्यामुळे अनेकांनी आता भाजपच्या माजीआजी शहराध्यक्षांच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका करून घेण्याची तयारी सुरू केली आहे. तयारीत असलेल्या या मंडळींची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची अतोनात इच्छा आहे. पण राष्ट्रवादीमधून थंड प्रतिसाद असल्याने ही मंडळी आता बावचळली आहेत. राष्ट्रवादीचे शहरातील स्थानिक नेते, या मंडळींसाठी काही ठोस निर्णय घेताना दिसत नाहीत. मात्र, तसा प्रयत्न करणाऱ्यांची उमेद खच्ची करण्याचा प्रकार केला जात आहे.

राजेंद्र जगताप म्हणतात, राष्ट्रवादीचे कारभारी लक्ष देत नाहीत!

भाजपचे माजी शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आतल्या गोटातील एक समजले जाणारे, विद्यमान भाजप नगरसेविका चंदा लोखंडे याचे पती, माजी नगरसेवक राजू लोखंडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला गेला. हे प्रवेशनाट्य घडवणारे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप याबद्दल सांगतात की, काही अडचण घेऊन आम्ही राष्ट्रवादीचे अध्वर्यू आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडे गेलो होतो. चर्चेदरम्यान राजू लोखंडे यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची इच्छा प्रदर्शित केली, अजितदादांनी जराही वेळ न लावता ती मान्यही केली आणि राजू लोखंडे यांचा पक्षप्रवेश झाला. त्यानंतर शहरातील राष्ट्रवादीच्या काही करभाऱ्यांनी आम्हाला कल्पना का दिली नाही, असा बोल लावला. तसेही राष्ट्रवादीचे शहरातील कारभारी इतरांकडे लक्ष देत नाहीत. गेल्या महिन्यात अजितदादांच्या वाढदिवसाला चारशे पेक्षा जास्त लोकांचे रक्तदान आमच्या लोकांनी घडवून आणले. पण पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील शहरात आले असताना, माझी साधी ओळख करून देण्याचे औचित्य या करभाऱ्यांनी दाखवले नाही. शेवटी माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांनी मला प्रांताध्यक्षांच्या समोर उभे केले. आम्ही अजितदादांच्या मर्जीप्रमाणे वागणारे कार्यकर्ते आहोत. मात्र, स्थानिक कारभारी आमच्याकडे लक्ष देत नाहीत. आमच्या कामाची दखल घेणे तर दूरच, आमचीही दखल हे कारभारी घेत नाहीत.

माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केलेली खंत, किती खरी, किती खोटी, याचे उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहरातील कारभारी देतील अगर द्यायचे की नाही, हेही तेच ठरवतील. सांप्रतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू इच्छिणारे पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्ताधारी भाजपाई नगरसदस्य अनेक आहेत. मात्र, त्यांच्याशी चर्चा करणारे अगर त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आश्वस्थ करू शकणारे कोणी पुढे येण्यास तयार नाही. कोरोना महामारीमुळे निवडणुका होतील की नाही, झाल्या तर कधी होतील, प्रभाग रचना कधी आणि कशी होईल, या बाबी अजून अध्याहृत आहेत. आताच्या महापालिका सभागृहाची मुदत येत्या १३ मार्च, २०२२ रोजी संपते आहे. तत्दरम्यान दुसरे सभागृह अस्तित्वात येणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या येत्या निवडणुका वेळेत झाल्या तर, त्यासाठी लागणाऱ्या तयारीच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सगळा आनंदीआनंदच आहे. जे आता राष्ट्रवादीकडे आशेने पाहताहेत, त्यांच्या पल्लवित झालेल्या आशा टिकवून ठेवण्यासाठी आता राष्ट्रवादीकडे काही ठोस कार्यक्रम असण्याची नितांत गरज आहे. ही गरज पूर्ण करण्याची यंत्रणा अगर कार्यक्रम शहर राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांना देणे आगत्याचे आहे.

हे आगत्य कोण दाखवणार हा खरा प्रश्न आज पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपुढे आ वासून उभा आहे. यांशिवाय राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्याचे मनसुभे आखलेल्या इतर पक्षातील लोकांच्याही गरजा ओळखून त्या पूर्ण होतील, असे आश्वासन त्यांना देणारी यंत्रणा तयार होणे आगत्याचे आहे. त्यासाठी शहर राष्ट्रवादीने वेळ दवडून चालणार नाही. “अभी नहीं, तो कभी नहीं!” अशी विजूगिषी तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी आणि कशी करणार, हे आता त्यांनीच जाहीर करावे, हे सांप्रतला महत्त्वाचे!

——————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×