आजपासून फोडतोड सुरू, कोणाचा कसा फुटणार, उभा की आडवा, गुगलच जाणे!
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बहुतेक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. आजपासून म्हणजे २७ ऑगस्ट पासून शहरात वार्ड रचनेची फाडतोड सुरू करण्याचे निर्देश आहेत. आता कोणाचा वार्ड उभा फुटणार आणि कोणाचा आडवा फुटणार यावर शहरभर चर्चा चालू झाल्या आहेत. अनेकांच्या राजकीय आशा आकांक्षा आता गुगलवर अवलंबून असणार आहेत. महापालिकेची एक सदस्यीय वार्डरचना गुगल अर्थच्या साहाय्याने करण्यात येणार आहे. हा वार्डरचनेचा कच्चा आराखडा तयार होत असताना, ज्या यंत्रणेकडून वार्डरचना करण्यात येणार आहे, ती यंत्रणा गुप्त, सुरक्षित आणि राजकीय हस्तक्षेपाशिवाय ठेवण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनाला पेलावे लागणार आहे.
राजकीय हस्तक्षेपानेच अनेकांचे वाटोळे झाले!
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत प्रभागरचनेत मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाला. भाजपचे पिंपरी चिंचवड शहरातील दोनही आमदार आणि त्यांचे तथाकथित चाणक्य यांनी आपल्या पक्षाच्या मंडळींना सोयीस्कर असे प्रभाग निर्माण करण्यास प्रशासकीय यंत्रणेला भाग पाडले. त्यावेळी राज्यात भाजपची सत्ता असल्याने हा हस्तक्षेप महापालिका प्रशासनाने करू दिला. अत्यंत चमत्कारिक पद्धतीने केलेल्या प्रभाग रचनेमुळे अनेक इच्छुकांना निवडणूक लढविता आली नाही. ज्यांनी त्याही परिस्थितीत निवडणुकीत भाग घेतला, त्या अनेक उमेदवारांची उमेद खच्ची करण्यात आली. प्रभाग रचनेचे अनेक चमत्कारिक नमुने तयार झाले. केवळ भाजपला सोयीचे जावे म्हणून तयार करण्यात आलेली प्रभागरचना हे देखील राष्ट्रवादीची सत्ता जाण्यामागचे एक कारण ठरले आहे. उदाहरणार्थ चिखलीच्या साने चौकापासून पिंपरीच्या आंबेडकर चौकापर्यंत अशी चमत्कारिक प्रभाग रचना केली गेली. ब क्षेत्रीय कार्यालय अ क्षेत्रात असणे, पिंपरीची महापालिका प्रशासकीय इमारत निगडीच्या क्षेत्रीय कार्यालयाला जोडणे, दोन विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीने दुभंगलेले प्रभाग तयार करणे असे गंभीर प्रकार मागच्या प्रभागरचनेत करण्यात आले आहेत. आमदारांच्या वर्चस्वाच्या लढाईत अनेक प्रभागातील आणि क्षेत्रीय कार्यालयातील राजकीय व्यक्तींना गेल्या निवडणुकीत घरी बसावे लागले आहे.
आता असा राजकीय हस्तक्षेप होऊ न देता नैसर्गिक सीमा आखून वार्डरचना व्हावी अशी वाजवी अपेक्षा व्यक्त होत आहे. कोणताही वार्ड विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत विभागला जाऊ नये, एव्हढे तारतम्य तरी पाळण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वार्डरचना करताना कोणते निकष लावले जावेत, नैसर्गिक हद्द कशी पाळली जावी याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेत उल्लेखलेले आहेतच. केवळ त्याचे तंतोतंत पालन होणे आवश्यक आहे. वार्डरचना करणारी यंत्रणा आणि त्यातील व्यक्ती कोणाच्या रात्रीच्या बैठकीत बसतात, कोणाच्या पाकिटांवर रेघोट्या मारतात, कोणाचे हितसंबंधी आहेत, यावर प्रशासकीय लक्ष असणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सुमारे वीस नगरसदस्यांना शहर मुकणार?
नव्याने होणारी वार्डरचना २०११ च्या जनगणनेनुसार होणार असेल तर, नगरसदस्यांची संख्या आता आहे एव्हढीच, म्हणजे एकशे अठ्ठावीस असणार आहे. २०२१ ची जनगणना कोरोना महामारीमुळे पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे महापालिका अधिनियम ५(२) नुसार नजिकची म्हणजे २०११चीच जनगणना नव्या वार्डरचनेसाठी गृहीत धरावी लागेल. त्यामुळे सदस्यसंख्याही पूर्वीप्रमाणेच राहील. आताच्या अंदाजित लोकसंख्येचा विचार केला तर, एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एक्कावन्न इतकी सदस्यसंख्या पिंपरी चिंचवड महापालिकेला करता आली असती.
अर्थात, राज्य शासनाने निवडणूक आयोगाला तशी विनंती केल्यास आणि निवडणूक आयोगाने ती मान्य केल्यास, यात काही बदल होणे शक्य आहे. कोरोना महामारी ही नैसर्गिक आपत्ती असल्याने यावर विचार केला जाऊ शकतो. गेल्या तीन जनगणनेच्या अहवालानुसार वाढ गृहीत धरून सदस्यसंख्या वाढू शकते. मात्र, यावर राज्य स्तरावर काही निर्णय होणे आणि तो निवडणूक आयोगाने मान्य करणे अपेक्षित आहे. राज्य शासन आणि निवडणूक आयोग यांनी असे बदल केले तर, नैसर्गिक न्यायतत्वानुसार नागरिकांना काही प्रमाणात का होईना सदस्यसंख्या वाढवून मिळेल. अन्यथा पिंपरी चिंचवड शहरवासी सुमारे वीस नगरसदस्यांना मुकणार, हे निश्चित.
आजपासून म्हणजेच २७ऑगस्ट पासून वार्डरचना सुरू करण्यात येणार आहे. गुगल अर्थच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या वार्ड रचनेच्या कच्च्या आराखड्यात काय काय लफडी होतील, हे अध्याहृत आहे. कोणताही राजकीय अथवा जादाचा प्रशासकीय हस्तक्षेप यात होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ही सर्व यंत्रणा इतर लोकांसाठी अस्पर्शी ठेवणे महत्त्वाचे आणि आगत्याचे आहे. या यंत्रणेत काम करणाऱ्या व्यक्ती अगर संस्था तपासून घ्याव्या लागतील. राजकीय कुरघोड्यांच्या साठमारीत वार्ड रचनेचे पुन्हा वाटोळे होऊ नये, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त आणि इतर जबाबदार व्यक्ती दक्षता घेतील, अशी अपेक्षा ठेवण्यास जागा आहे काय, हे आता कालदर्शी आहे.
——————————————————–