शहरात एक नवा प्रशांत किशोर पैदा होतो आहे काय?

राजकीय सांख्यिकी विश्लेषक म्हणजे पॉलिटिकल स्टॅटिस्टिकल एनलायझर म्हणून देश पातळीवर एक ख्यातनाम नाव आहे, ते प्रशांत किशोर यांचे. हे प्रशांत किशोर, राजकीय डावपेच आणि खेळयांद्वारे कोणालाही, कोणत्याही निवडणुकीत विजय मिळवून देऊ शकतात. असेच एक प्रशांत किशोर पिंपरी चिंचवड शहरात नव्याने पैदा झाले आहेत, अशी सुचना नुकतीच प्राप्त झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुका एक सदस्यीय वार्ड पद्धतीने होणार असल्याची अधिसूचना निर्गमित झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात नवा प्रशांत किशोर उदयास येणे, ही एक महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण बाब आहे. या शहराला एखादा प्रशांत किशोर मिळणे आणि तो सत्ताकांक्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिमतीला असणे, ही शहर राष्ट्रवादीसाठी अत्यंत दिलासादायक बाब आहे. उपलब्ध माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहराचे नवे प्रशांत किशोर म्हणून नावारूपाला येऊ पाहणारे हे महाभाग सध्या आजच्या पिंपरी चिंचवडचे पगारदार विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत.

आपल्या तिसऱ्या डोळ्याने शहराची बित्तंबातमी विश्लेषित करणारे हे महाभाग नुकतेच पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता काशी आणायची, यावर काही मोजक्या पत्रकारांना मार्गदर्शन करते झाले असल्याची पक्की खबर प्राप्त झाली आहे. आता शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन होणे, साक्षात परमेश्वरालाही थांबवता येणार नाही, अशी या महाभागांची ख्याती आहे. २०१७ मध्ये झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत एक वृत्तपत्राचा आधार घेऊन या महाभागांनी सध्या सत्तेत असलेल्या भाजपची पाठराखण केली होती. त्यासाठी पंचलक्षीय कामगिरी करून या महाभागांनी भाजपचा सत्तासोपान घडवला अशी वदंता होती. अर्थात त्यावेळी या महाभागांना ही पंचलक्षीय कामगिरी शहरातील स्वतःला चाणक्य म्हणवणाऱ्या एका महोदयांच्या साक्षीने मिळाली होती.

पिंपरी चिंचवड शहराच्या नदीपालिकडल्या लक्ष्मणरेषेत राहून सीमाभाग सांभाळणारे, हे स्वतःला चाणक्य म्हणवून घेणारे महोदय, सांगेल काम ते कर याच मर्यादेचे आणि वकुबाचे असताना ही, केवळ लक्ष्मणरेषेच्या अखत्यारीत असल्याने त्यांना सारंगाची म्हणजेच नाखव्याची पदवी बहाल करण्यात आली होती. या तथाकथित नाखव्याने अनेक नौका अक्षरशः रसातळाला घालवल्याची चर्चा आहे. यात गजाननाचा क्रमांक पहिला आहे. त्यानंतर लक्ष्मणरेषेत आल्यावर या महोदयांनी आपल्या सीमा सुरक्षित करण्याचे इप्सित साध्य झाल्यावर, अलगदपणे लक्ष्मणरेषा डावलून नदिअलिकडच्या महा इशाची मनधरणी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आता हे नौका बुडवण्यात वाकबगार असलेले नाखवा योग इशाला बहलवण्याचे काम करीत आहे.

योग इशाला बहलवताना, पुन्हा या नाखव्याने आपल्या सीमा सुरक्षित राखण्याची खेळी केली आहे. आपल्या वाकचातुर्याने या नाखवा महोदयांनी योग इशास इतके बहकवले आहे की, आता या नाखव्याशिवाय आपली राजकीय नौका पार होऊच शकत नाही, अशी धारणा उत्पन्न होऊन, योग इश आता या नाखव्याच्या पूर्ण आहारी गेला आहे. आता हा अनेक नौका बुडवून इथपर्यंत आलेला नाखवा, त्यानेच नव्याने पैदा केलेल्या तथाकथित प्रशांत किशोरचे सानिध्य आणि कैकलक्षीय बुद्धीचातुर्य, योग इशाच्या माध्यमातून संजोगवश करता झाला आहे. आता हा नाखवा आणि त्याचा पैदायीश प्रशांत किशोर, असे दोघे मिळून पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक पार करणार आहेत. अनेक नौका बुडवून आता हा नाखवा आणि त्याचा प्रशांत किशोर, राष्ट्रवादीची नौका कोणत्या मजधार मध्ये बुडावतात, हे पाहणे मोठेच गमतीचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीची पिंपरी चिंचवड महापलिकेतील सत्ता हिसकावून, राष्ट्रवादीला २०१७ च्या महापालिका निवडणुकीत सत्ताच्युत करण्यात हेच नाखवा आणि तथाकथित प्रशांत किशोर अग्रेसर होते, हे विशेष. आता अगदी उलट कार्यक्रमाची आखणी करून म्हणे, हे नाखवा आणि तथाकथित प्रशांत किशोर, योग इशाला पुन्हा राजकीय पटलावर सक्रिय करण्याचा प्रयत्न करणार आहेत. ही सर्व करतूत खरे म्हणजे केवळ सुलक्षणी ऐवजी सीमा सुरक्षित करण्यासाठी असल्याची चर्चा शहरभर आहे. त्यासाठीच हा नाखवा आणि त्याचा तथाकथित प्रशांत किशोर एव्हढा आटापिटा करताहेत, हे शहरातील शेंबड्या पोरालाही ओळखता येऊ शकते. हा नाखवा आणि त्याचा तथाकथित प्रशांत किशोर यांची गजानन नौका बुडवून झाली, लक्ष्मणरेषा ओलांडून झाली, महा इशाचे स्तवन संपले, आता योग इशाची नौका यांच्या हाती सापडली आहे. येत्या महापालिका निवडणुकीत संजोगवश योग इशाची, ही मंडळी कशी वाट लावतात, की त्यांना वाटे लावतात, हे तूर्तास तरी अध्याहृत आहे.

————————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×