शहर राष्ट्रवादी जागी तर झाली, पण झापड उडाली काय?
झोपेचे सोंग घेतलेल्या पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अखेर आपले सोंग सोडावे लागले आहे. मात्र या मंडळींचे सोंग खरोखरच संपले आहे काय अगर यांची झापड उडाली आहे काय, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. गेल्या साडेचार वर्षात विरोधी पक्षाची छाप पाडण्यात फारसी यशस्वी न ठरलेली राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी सत्ता काबीज करण्याएव्हढी जागी झाली आहेत काय, हा खरा प्रश्न आहे. आपल्या अंतर्गत लाथाळ्या आणि स्वाधिष्टीत राजकारण सोडून ही मंडळी एकत्रित येणार आहेत काय, हेही अजून स्पष्ट झालेले नाही. पक्ष म्हणून संघटितपणे काम करणे आणि सत्ताधारी भाजपला कडवा विरोध करून आम्ही जागे झालो आहोत, हे शहरवासीयांना दाखवून देणे असे दुहेरी आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आहे. तीन दिवसात दोन आंदोलने करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजून जागा आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न तर झाला. पण या प्रयत्नात पुढचे सहा महिने सातत्य राखले जाणार आहे काय, याबद्दल अजूनही शहरात शंकास्पद वातावरण आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाईंनी, आपल्या लाभार्थी आणि बगलबच्च्यांच्या रांगेत राष्ट्रवादीचे शहरातील दिग्गजही आहेत, असे चित्र यशस्वीपणे निर्माण केले आहे. सत्ताधारी भाजपच्या गेल्या साडेचार वर्षातील सावळ्यागोंधळात राष्ट्रवादीदेखील सामील असल्याचा संशय शहरवासीयांच्या मनात आहे. आता शहरवासीयांना आम्ही भाजपच्या काळ्या करतुतीत सामील नाही, हा भरोसा शहरवासीयांमध्ये निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादीला प्रयत्न करावे लागणार आहेत. केवळ खोट्या नोटा उधळून अगर गावजत्रा उभी करून केलेले आंदोलनाने, शहरवासीयांमध्ये राष्ट्रवादीबद्दल भरोसा निर्माण होणे, दुरापास्तच आहे. सत्ता काबीज करण्यासाठी आवश्यक असलेली विजय खेचून आणण्याची विजिगिशु वृत्ती आणि आंदोलनातील गंभीर्यही महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादीचे शहरातील स्थानिक नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी टाळ्या पिटून अगर वेडेवाकडे चाळे करून केलेल्या, मस्करी आंदोलनाने काम भागणार नाही, मनाने एकत्रित प्रयत्न करावे लागतील.
शहर राष्ट्रवादीतील लाथाळ्या थांबतील?
राष्ट्रवादीने एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण थांबविणे, आम्ही सत्ताधाऱ्यांचे वैयक्तिक लाभार्थी नाही, हे स्पष्ट करणे, संघटितपणे सत्ताधाऱ्यांना विरोध करणे अशा अपेक्षा आता शहरवासीयांकडून व्यक्त होत आहेत. मात्र, एकमेकांबद्दलचा राजकीय दुस्वास अजूनही राष्ट्रवादीमध्ये आहे. सवते सुभेदार अजूनही आपल्या सुभ्याचे मालक असल्याच्या अविर्भावात आहेत. आपली मालकी सिद्ध करण्याचा आणि आपल्या स्वाधिष्टीत राजकारणाचे मनसुभे राखण्याच्या सोसापायी पक्षाचे नुकसान होणार आहे, याचा विचार करणे, आता शहर राष्ट्रवादीतील दिग्गजांना गरजेचे झाले आहे. एकत्रितपणे प्रयत्न केला, तरच सत्ता पुन्हा मिळू शकते आणि त्या एकत्रित प्रयत्नांसाठी आपण आपल्यातील लाथाळ्या संपवल्या पाहिजेत, याची जाणीव या मंडळींमध्ये निर्माण झाली आहे काय, हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झांझडून जागे करणाऱ्या घटकाची नितांत आवश्यकता आहे.
नंदीबैल दाखवा, स्वतः तसे होऊ नका!
आपल्या आंदोलनात पोतराज, वासुदेव, नंदीबैल वापरून आणि त्या नंदीबैलांना किती टक्के घेणार असे विचारून, राष्ट्रवादीच्या आंदोलनकर्त्यांनी भाजपचे पदाधिकारी, भोसरी आणि चिंचवडच्या नंदिवाल्यांची बैलं आहेत, हे दर्शविण्याचा प्रयत्न केला. पण असे अनेक नंदिवाले शहरात आहेत, जे शहरातील राष्ट्रवादीला नंदीबैल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेकांच्या नौका बुडवणारे आता राष्ट्रवादीपुढे गुबुगुबू करीत आहेत. विशेष म्हणजे स्वतःला भाई समजणारे काही महाभाग, या गुबुगुबूला नंदीबैलासारखे मान हलवीत आहेत. आपल्यासारखा बैलं खेळवण्याचा हातखंडा दुसऱ्या कोणात नाही, याचा गर्व असलेल्या मंडळींच्या इशाऱ्यावर मान हलवणारे बैल होणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील नेत्यांनी टाळले पाहिजे. अन्यथा ओझ्याचे बैल होणे या मंडळींच्या नशिबी येईल आणि नंदीवाल्याची गुलामी पत्करावी लागेल, हे निश्चित.
शहर राष्ट्रवादीला संघटनकुशलतेची नितांत गरज.
येत्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत हातात घड्याळ बांधण्यात अनेक जण इच्छुक आहेत. त्यांना तपासून आणि वाजवून घड्याळ घालणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक धुरिणांनी कौशल्याने काम करणे अपेक्षित आहे. जबाबदार संघटनकुशलता दाखविणारी नीती, त्यासाठी राष्ट्रवादीला आखावी लागेल. पुरत्या बदनाम झालेल्या महापालिकेतील सत्ताधारी भाजपला सोडचिठ्ठी देण्यास अनेक जण उत्सुक आहेत. मात्र, अशा मंडळींची उत्सुकता आप्पलपोटी आहे काय, हे तपासणे गरजेचे आहे. नकारात्मक अगर सुडाचे राजकारण न करता, सर्वसमावेशक आणि सर्वंकष पद्धतीने, मात्र राष्ट्रवादीशी जवळीक साधण्यास उत्सुक असलेल्यांचा हेतू तपासून राजकारण करण्याची ही वेळ आहे. नाहीतर, तंबूत शिरणारेच, तंबू उध्वस्त करून राष्ट्रवादीला पुन्हा रस्त्यावर आणतील. केवळ आंदोलने करूनही सत्ता मिळेल अगर सांप्रतची सत्ताधारी भाजप नामोहरम होईल, अशी अपेक्षा न बाळगता, त्यासाठी योजनाबद्ध यंत्रणा उभी करणे, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीसाठी नितांत गरजेचे आहे.
–———————————————————–