महापालिका वार्डरचनेत घोळ, गुप्तता पाळण्यात प्रशासन अपयशी?

नेते आणि पुढाऱ्यांशी संबंधित नसलेला अधिकारी, कर्मचारी पिंपरी चिंचवड महापालिकेत मिळणे, तसे दुरापास्तच आहे. अनेकांचे राजकीय लागेबांधे असल्यामुळे वार्डरचना करण्यासाठी नेमलेल्या यंत्रणेतील कर्मचारी, अधिकारी कितपत गुप्तता पाळतात, याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. तशातच संगणकीय यंत्रणा वापरणारे आणि त्यावर काम करणारे बहुतांश कर्मचारी खाजगी सेवा संस्थेचे आहेत. नुकतेच स्वतःला जादा हुशार समजणाऱ्या, पण वास्तवात आपमतलबी राजकारणाचा बनेल गड्डा असलेल्या एका राजकारण्यांच्या उपस्थितीत काही व्यक्तींची गुप्त बैठक झाली. गुगल अर्थच्या नकाशावर कशा रेघोट्या मारायच्या, याचे प्रात्याक्षिक या राजकीय महाभागाने, काही अधिकारी आणि संगणक तज्ज्ञांच्या समक्ष दाखवले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आता ह्या रेघोट्या मारण्याच्या प्रात्याक्षिकानुसार वार्डरचना होणार किंवा कसे, ही बाब गुलदस्तात असली तरी, वार्डरचनेच्या बाबतीत कितपत गुप्तता पाळली जाईल, याबाबत शंका निर्माण होते आहे.

२०१७च्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभागरचनेचे पूर्णतः वाटोळे झाले होते. अनेक घोळ आणि गोंधळ करून काही लोकांच्या भल्यासाठी चमत्कारिक प्रभागरचना करण्यात आली होती. त्यावेळी राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने स्थानिक स्वपक्षीय नेत्या, पुढाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे प्रभागरचना करण्यास संबंधित यंत्रणेला भाग पाडले. त्याचे परिणाम, नंतरच्या महापालिका निवडणुकीत स्पष्टपणे दिसले आहेत. मागच्या निवडणुकीत प्रभागरचनेत सहभागी झालेल्या मंडळींचाच समावेश आताच्याही वार्डरचनेत असल्याने पुन्हा राजकीय हस्तक्षेप निर्माण होतो आहे. राजकीय लागेबांधे आणि काही पुढाऱ्यांचे हितसंबंध जपण्यासाठी वार्डरचनेसाठी काम करणारे अधिकारी, कर्मचारी, कार्यरत आहेतच. अशाच लोकांच्या हातात वार्डरचना आहे. त्यामुळे यावेळी सुद्धा वार्डरचनेत घोळ आणि गोंधळ होणार नाही, असे म्हणता येणार नाही.

डॉ. यशवंत माने यांच्या नावाने अकारण गदारोळ?

सध्या रोहा येथे उपप्रादेशिक अधिकारी अर्थात प्रांत म्हणून काम करणारे डॉ. यशवंत माने यांच्या अखत्यारीत आणि देखरेखीखाली पिंपरी चिंचवड महापालिकेची वार्डरचना करण्यात येत असल्याची चर्चा शहरात आहे. मात्र, निवडणूक आयोग, राज्य शासन, अगर महापालिकेने स्वतः या कामी कोणतीही बाहेरची व्यक्ती नेमली नसल्याची खात्रीशीर माहिती आहे. केवळ आपल्या उद्योगांकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून डॉ. यशवंत माने यांच्या नावाचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड शहर भाजपचे प्रवक्ते अमोल थोरातांनी मुद्दाम माने यांच्या नावाला विरोध करणारे प्रसिद्धी पत्रक काढले. जेणेकरून शहरवासीयांना आणि शहरातील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना गोंधळात टाकत येईल. येत्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीच्या वार्डरचनेचा कच्चा आराखडा, महापालिका आयुक्तांच्याच मार्गदर्शनाखाली केला जाणार आहे. मात्र, आता हे काम करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली यंत्रणा गुप्त राहिलेली नाही, हे विशेष.

राज्य निवडणूक आयोगाच्या अध्यादेशानुसार एक सदस्यीय वार्ड तयार करण्यात येत आहेत. मात्र, महापालिकेने वार्डरचना करताना ऐनवेळी दोन वार्ड एकत्र करून, द्विसदस्यीय प्रभाग करता यावा, अशा सलग्नतेने कच्चा आराखडा तयार करण्याच्या तोंडी सूचनाही महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. नुकत्याच एका खाजगी कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड शहरात आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी, आपण द्विसदस्यीय प्रभागासाठी आग्रही असल्याची भूमिका मांडली आहे. दोन सदस्यीय प्रभाग करावेत अगर एक सदस्यीय वार्ड पडावेत, याचा निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार, राज्य शासनाचे आहेत, अशी पुस्तीही नामदार पवार यांनी जोडली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सर्वपक्षीय इच्छूक अजून गोंधळले आहेत.

तशातच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नागरिकांचा मागासवर्ग या संवर्गावर सर्वोच्च न्यायालयाचा बडगा आला आहे. भाजपाई याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारवर थोपू इच्छित आहे. इतर मागासवर्ग, भटक्या आणि विमुक्त जाती, जमाती यांच्या सहभागाने तयार झालेल्या नागरिकांचा मागासवर्ग या संवर्गाला आता निवडणुकीत आरक्षण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांचा मागासवर्ग या संवर्गातून निवडणुकीत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांचे मनसुभे धुळीस मिळणार आहेत. सुमारे सत्तर टक्के लोकसंख्या असलेल्या या समाज घटकाला आघाडी सरकारच्या विरुद्ध भडकवण्याचे उद्योग भाजपाई करताहेत. अशा परिस्थितीत महापालिका निवडणुका झाल्या, तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत येणे शक्य आहे. त्यामुळे आघाडीतील सर्व घटक पक्ष, आरक्षण पुन्हा कायम झाल्याशिवाय महापालिका निवडणूक होऊ नयेत, या मुद्द्यावर ठाम आहेत. या सर्व गोंधळांमुळे, पुणे, पिंपरी चिंचवड सह राज्यातील महापालिकेच्या निवडणुका बारा विघ्नांचे नकटीचे लग्न होऊ पाहात आहे.

——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×