भाजपचा टाईम खराब, हातात घड्याळ बांधण्यात बाबा बारणेंचा पुढाकार!

“काहून बप्पा, ते बाबा बारणे पन हातात घड्याळ बांधून राह्यलं न, आपले शेहेरातले भाजपचं टाईम खराब झालं का?”  

सकाळीच अस्मादिकांना ही प्रतिक्रिया थेरगावमधील एक वैदर्भीय महाभागाने भ्रमणध्वनीवर संपर्क साधून दिली. पिंपरी चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर असे बदल होणारच, असे सांगण्याचा प्रयत्न अस्मादिकांना केला. मात्र, शहर भाजपची वेळच खराब झाली, हा त्या महाभागांचा घोषा कायम होता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे “ते तर, कालपरेंत भाऊ, भाऊ म्हणते, मंग आज दादा कसं?” भाजपच्या लोकांना अशी चांगली माणसं सांभाळता का आली नाहीत, हे त्या महाभागांचे सततचे पालुपद होते. त्यांचे हे पालुपद ऐकून अस्मादिकांनाही हा प्रश्न अक्षरशः पडला. थेरगावमधून अपक्ष निवडून आलेले आणि भाजपचे सहयोगीत्व स्विकारलेले, अपक्षांचे गटनेते, कैलास तथा बाबा बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, “पुढाकार घेतला आहे, नामदार अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत काम करण्याचे ठरविले आहे, काही अपक्ष आणि भाजपचेही नगरसेवक संपर्कात आहेत. या सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणार आहे. भाजप त्यागण्याची कारणे वेळ आल्यावर नक्कीच सांगेन.”

राष्ट्रवादी पक्षात येण्यास उत्सुक असलेल्या नगरसदस्यांची केवळ चर्चाच आतापर्यंत शहरात होती. वेगवेगळ्या संख्या आणि आकडे प्रसिद्धी माध्यमांतून आणि लोकचर्चेतून सांगितले जात होते. पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मात्र, आपले काम करीत होते आणि बाबा बारणे हे पहिले पिंपरी चिंचवड महापालिका नगरसदस्य राष्ट्रवादीच्या उपरण्यात आले. बाबा बारणे यांच्या बद्दल, त्यांच्या प्रभागात आणि परिसरातही चांगली लोकभावना आहे. त्याचा पडताळा वेळोवेळी परिसरातील जनसामान्यांमधून आला आहे. जनमतातून चांगुलपणा कमावणारे बाबा बारणे राष्ट्रवादी पक्षात आल्यामुळे राष्ट्रवादीचे शहरातील नेते आणि बाबा बारणे यांचे अभिननंदन केले जात आहे.

सुरुवातीलाच उल्लेखलेल्या त्या वैदर्भीय महाभागांचा मूळ प्रश्न “भाजपचा टाईम खराब झाला का?” हा शिल्लक राहतोच. यावर पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिलेली प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. ते म्हणतात, “भाजपच्या भ्रष्टाचारी आणि अनागोंदी कारभाराला कंटाळलेले चांगले लोक पक्षात यायला उत्सुक आहेत. कैलास तथा बाबा बारणे यांच्या निमित्ताने त्याची सुरुवात झाली आहे. आमच्यासाठी आकडा किंवा संख्या महत्वाची नसून, चांगले जनमत असलेले आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता राष्ट्रवादी पक्षात येणारे जास्त महत्त्वाचे आहेत.”

पिंपरी चिंचवड शहर भाजपचे कर्ताधर्ता असलेले भाऊ, दादा म्हणवणारे महाभाग खऱ्या अर्थाने शहर भाजपाईंसाठी भाऊ अगर दादा होऊ शकले नाहीत, हा या पक्षबदलामागचा खरा मतितार्थ आहे. आपल्या बगलबच्च्यांना पोसण्यात मश्गुल असलेले हे भाऊ, दादा केवळ आणि केवळ आपल्या हितसंबंधितांची आणि सगेसोयऱ्यांची तुंबडी भरण्यातच धन्यता मानणारे झाले आहेत. त्यामुळे चांगले लोक आपसूकच भाजपपासून दुरावले गेले आणि आता खऱ्या अर्थाने भाजपला गळती लागली. आतापर्यंत संतोष बारणे आणि राजू लोखंडे हे विद्यमान भाजपाई नगरसेविकेंचे पती राष्ट्रवादीत प्रवेश करणारे शहरातील प्रमुख कार्यकर्ते होते. कैलास तथा बाबा बारणे यांच्या निमित्ताने पाहिले भाजप संलग्न नगरसदस्य राष्ट्रवादीत प्रवेशले आहेत. या प्रवेश प्रक्रियेच्या निमित्ताने शहर भाजपचा गाळ राष्ट्रवादीत येऊ नये अशा अपेक्षा शहरजनांकडून व्यक्त होत आहेत.

——————————————————–

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×