या म्हशी राष्ट्रवादीचाच गोठा उधळवण्याची शक्यता अधिक!

म्हैस पाण्यात असली, की तिची शिंगे आणि सतत वाचाळणारे तोंड तेव्हढे बाहेर दिसते. वास्तवात ती कशी आहे, रोड की जाडजूड, दुधारू की खाटी, मारकी की शांत यापैकी काहीच कळणे तसे दुरापास्तच. ती बाहेर आली तरच तिचे गुण, अवगुण कळणार असतात. जाणकार शेतकरी अगर गवळी मात्र, त्या पाण्यातल्या म्हशीचे देखील नखरे जाणण्यात वाकबगार असतो, अनाड्याचे ते काम नाही. आता ही पाण्यात बसलेली म्हैस, किती उपयोगी आहे, याचा डंका, मोल सांगणारा दलाल मात्र, सतत पिटत असतो. काही वेळा तर, म्हैसच आपली खोटी महत्ता निर्माण करते. मात्र, केवळ बाह्य वर्णनावरून त्या म्हशीचे मोल ठरवणाऱ्याची फसगत होणार हे नक्कीच. पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काहीसे तसेच झाले आहे काय, यावर सध्या शहरभर चर्चा रंगलेली दिसते आहे.

येती महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आणि दुसरा काही पर्याय शिल्लक राहिला नाही म्हणून, काही अशा पाण्यातल्या म्हशी, काही दलालांमार्फत शहर राष्ट्रवादीकडे पाठवण्याची व्यवस्था सध्या करण्यात येत आहे. मात्र, या ढालगज म्हशी शहर राष्ट्रवादीचा अक्खा गोठा उधळवतील, याची जाणीव गोठा राखणाऱ्या अनाड्यांना आहे काय, हा खरा प्रश्न आहे. इतरत्रचे सगळे गोठे आपल्या शेणकुराने बरबटवून झाल्यावर, आता या म्हशी राष्ट्रवादीच्या गोठ्याची आस धरून आहेत. पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीला या म्हशींचे केवळ गुण सांगितले जात आहेत. इतरत्रच्या गोठयांत त्यांनी पसरवलेला शेणकुर मात्र, त्यांचे अवगुण स्पष्ट करणारा आहे. आता अगोदरचे गोठे गदळ करून राष्ट्रवादीचा गोठा बदनाम करण्याच्या यांच्या प्रयत्नांना वेळीच नकेल ठोकली पाहिजे.

पूर्वीच्या गोठा मालकांचे अनुभव पाहा!

शहर राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या मोठी आहे. अनेक मातब्बरांची नावे त्यात आहेत. या नावांमध्ये काही ढालगज म्हशीही आहेतच. या म्हशी मारक्या, खाट्या, जाडजूड आणि नुसत्याच चरणाऱ्या आहेत काय, याची शहानिशा होणे गरजेचे आहे. जाणकार शेतकरी यावर काहीच बोलण्यास तयार नाही. दलाल मात्र, उड्या मारून आणि टिऱ्या बडवून म्हशींचे गुणगान गाताहेत. आता पाण्यात फतकल मारून बसलेल्या या म्हशी किती उपयोगी आहेत, यावर विमर्ष व्हायला हवा. लई दूध देणाऱ्या, कमी खाणाऱ्या आणि म्हणूनच उपयोगी असलेल्या असे या म्हशींचे वर्णन करण्यात येत आहे. मात्र, या म्हशी पूर्वी ज्या ज्या गोठ्यात होत्या, त्या गोठा मालकांचे अनुभव काही वेगळेच सांगतो. रानभर चरून या म्हशींनी तिथले पीकपाणी नासवले असल्याची माहिती दिली जात आहे. शिवाय आहोत त्या गोठ्यातच घाण करण्याची त्यांची सवय असल्याचेही बोलले जात आहे. याही उपर तिथल्या जनावरांना दुगाण्या झाडून आणि ढुसण्या मारून त्यांनी गोठा नासवल्याचीही चर्चा आहे.

राष्ट्रवादीच्या गोठ्याची आस असलेल्या या म्हशींबाबत अनेकांच्या, अनेक अंगी चर्चा होत असल्या तरी, राष्ट्रवादीचा मूळ गोठामालक, हुशार आणि म्हशी पारखण्यात विशेष कौशल्य असलेला आहे. त्याची तशी जनमानसात ख्याती आहे. शहरातील म्हशींचे दलाल आणि राष्ट्रवादीच्या गोठ्याचे राखणदार काहीही म्हणत असले तरी, कोणत्या म्हशी आपल्या गोठ्यात घ्यायच्या, यावर अंतिम निर्णय गोठामालकांचाच आहे. मूळ गोठामालकांकडे या ढालगज म्हशींची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न अनेक पातळ्यांवर होतो आहे. मात्र, गोठामालक काहीच प्रतिसाद देत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. आपल्याला या म्हशी हव्यात की नकोत, हे एकदा मूळ गोठामालकाने स्पष्ट करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीच्या गोठ्याचे राखणदार आणि म्हशींचे दलाल, सध्या ढगात गोळ्या मारण्यात धन्यता मानताहेत आणि गोठ्याचे मूळ मालक चुप्पी साधून आहेत.

————————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×