बैलांना नादावलेले भाजपाई शहराध्यक्ष शहरवासीयांना मूर्ख समजतात!
एकतर या शहरातील यच्चयावत जनता मूर्ख आहे अगर पिंपरी चिंचवड भाजपाई शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे आणि त्यांची प्रसिद्धी यंत्रणा तसे समजत असावी. किंबहुना, ही मंडळी तरी तशी असावीत,असा एक कयास आहे. भाजपाई शहराध्यक्षांची प्रसिद्धीलोलुपता पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा खोट्या माहितीचा अगर जुन्या प्रकरणांचा वापर करून त्याबाबतची प्रसिद्धीपत्रके त्यांच्या प्रसिद्धी यंत्रणेद्वारे पाठवली जातात. पुढचा गदळ प्रकार असा की, काही प्रसिद्धी माध्यमे कोणतीही शहानिशा न करता, ही प्रसिद्धी पत्रके जशासतशी प्रसिद्ध करून मोकळे होतात. अर्थात त्यासाठी भाजपाई शहराध्यक्षांच्या प्रसिद्धी यंत्रणेद्वारे या माध्यमांना मेहनताना दिला जातो, हा भाग आहेच. खाल्ल्या मिठाला जागण्याकरता मग शहराध्यक्षांची प्रसिद्धी यंत्रणा आणि काही माध्यम प्रतिनिधी भाजपाई शहराध्यक्षांची प्रसिद्धीलोलुपता जोपासतात आणि आपली खळगी भरतात. मात्र,भाजप शहराध्यक्षांची गदळ प्रसिद्धीलोलुपता जोपासण्यासाठी आणि स्वतःची खळगी भरण्यासाठी आपण पिंपरी चिंचवड शहरातील यच्चयावत जनतेला मूर्ख बनवित आहोत, त्यांच्या मनात धार्मिक, सामाजिक तेढ निर्माण करीत आहोत, याचे भान ही मंडळी राखीत नाहीत, हा खरा घाणेरडा प्रकार आहे.
याचे उदाहरण म्हणजे नुकतेच पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे याच्या अधिकृत प्रसिद्धी यंत्रणेने त्यांच्या सहीचे प्रसिद्धी पत्रक तयार बातमीसह प्रसिद्धी माध्यमांना पाठविले आहे. या प्रसिद्धी पत्रकानुसार भाजप शहराध्यक्षांना अचानक गोवंशातील बैलांची कड घ्यावीशी वाटली आणि कत्तलयोग्य जनावरांच्या यादीतून बैलांना वगळावे अशी मागणी करणारे पत्र, त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. कत्तलयोग्य जनावरांच्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या यादीत कोणत्याही गोवंशाचा अंतर्भाव नाही. राज्यात गोवंश हत्याबंदी आहे आणि बैल हा प्रकार गोवंशातील आहे, याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र, कायम डोक्यात बैलं भिनलेल्या भाजपाई शहराध्यक्षांना बैल विसारता येत नाही हा खरा मुद्दा आहे. धावणारी बैलं, उधळणारी बैलं, शिंगाळू बैलं, मारकी बैलं, खिल्लारी बैलं, धारवाडी बैलं, गुजराती बैलं, बुटकी बैलं, रोड बैलं, माजलेली बैलं, गाजलेली बैलं, डुरकणारी बैलं, माती उकरणारी बैलं, ओझ्याची बैलं, औताची बैलं या आणि आणखी काही प्रकारांसह बडवलेली बैलं, हा पिंपरी चिंचवड भाजपाई शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे बैलांच्या काळजीने, त्यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले असावे.
या पत्रात आपल्या मागणीचा संदर्भ म्हणून मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका जनहित याचिकेचा उल्लेख आहे. अल कुरेश ह्युमन वेलफेअर असोसिएशनच्या वतीने ॲड. ए. ए. सिद्दीकी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर, मुंबई उच्च न्यायालयाने, याचिका खारीज करताना दिलेल्या निर्देशांचा उल्लेख या प्रसिद्धी पत्रकात आणि मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात आहे. मात्र, या याचिकेत असलेली मागणी, त्यावर दिलेले निर्देश आणि पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांनी केलेला उल्लेख याचा एकमेकांशी बादरायण देखील संबंध नाही. “काहीही बोल, खोटे बोल पण, रेटून बोल!” या भाजपाई प्रघातानुसार, भाजपाई शहाराध्यक्षांनी हे पत्र आणि त्याची बातमी प्रसिद्धीसाठी दिली आहे. याबाबत संशोधन केले असता वेगळेच तथ्य पुढे आले आहे.
अल कुरेश ह्युमन वेलफेअर असोसिएशन आणि त्यांचे वकील ॲड. ए. ए. सिद्दीकी यांनी २०२० च्या उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हैस (Water Baffeloes) संवर्गातील मोठ्या जनावरांची बकरा ईद निमित्त दिली जाणारी कुर्बानी, मुंबई जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातील जिल्ह्याच्या अधिकृत कत्तलखान्यात व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. पीआयएल-सीजे-एलडी-व्हीसी ३६/२०२० अनुसार दाखल झालेली ही याचिका निकाली काढताना, उच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय मुंबई महापालिका, राज्य शासन यांनी घ्यावा आणि कोरोना महामारीचे नियम पाळून संबंधितांना सूचना द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश दि.३१ जुलै, २०२० रोजी दिले आहेत.
मग, पिंपरी चिंचवड भाजपाई शहराध्यक्ष, आमदार महेशदादा लांडगे आणि त्यांच्या प्रसिद्धी यंत्रणेचे प्रसादी, अधिकचे दिवे यांनी हे दिवे लावून आपल्या अकलेचे तारे का तोडले असावेत, हा प्रश्न निर्माण होतो. एकतर या मंडळींना समाजात धार्मिक तेढ निर्माण करायची असावी, अथवा केवळ अतिरिक्त प्रसिद्धीलोलुपता जोपासण्यासाठी हा प्रकार केला असावा. मात्र, या प्रसिद्धीच्या सोसापायी उच्च न्यालालयाच्या निर्देशांचा चुकीचा अर्थ लावून आणि त्यासंबंधीची दिशाभूल करणारी बातमी प्रसिद्धीस देऊन न्यायालयाचा अवमान केला आहे, याचे भान आणि जाणही या मंडळींना नसावी हा खरा घातक, विदारक आणि समाजमन बिघडविणार प्रकार आहे. याबाबत शहरातील प्रसिद्धी माध्यमे, शहरातील सामान्यजन, मूर्ख असल्याचा अगर आपण त्यांना सहज मूर्ख बनवू शकतो, याचा घाणेरडा आणि मिथ्याभिमानी दर्प येतो आहे.
———————————————————