अजितदादांनी शिरगणती करताना चांगली डोकी स्वीकारणे महत्त्वाचे!

गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्वर्यू, नामदार अजितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात दौरा केला. ते आले, ते भेटले, ते बोलले आणि गेले. उण्यापुऱ्या अर्ध्या दिवसाच्या या दौऱ्यात अजितदादा पवार यांनी अनेकांच्या भेटी घेतल्या, प्रसिद्धी माध्यमांशी सुमारे पंधरा मिनिटांची चर्चा केली. या चर्चेत त्यांनी आपला आगामी राजकीय आडाखा आणि आराखडा स्पष्ट केला. राष्ट्रवादीत येणाऱ्यांच्या संख्येला गुलदस्तात ठेऊन पिंपरी चिंचवड शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्या, नेत्यांच्या पायात त्यांनी साप सोडले. राष्ट्रवादीच्या घड्याळात आपली वेळ बघण्याचा नाद त्यांनी अनेकांना लावला, मात्र कोणत्या हातात घड्याळ असणार आणि कोणाची वेळ बिघडणार, यावरचे भाष्य टाळून सत्तेच्या आकड्यांच्या खेळात डोकी वाढवण्याचा आपला इरादा स्पष्ट करून टाकला. इलेक्टिव्ह मेरिट म्हणजेच निवडणूक जिंकण्याची गुणवत्ता असलेले आणि राष्ट्रवादीचे पूर्वीचे लाभार्थी, तसेच सांप्रतचे इतरपक्षीय नगरसदस्य, राष्ट्रवादीत घेण्याची तयारी असल्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे.

सत्तेचे राजकारण हा आकड्यांचा खेळ आहे. ज्यांचा आकडा जास्त, त्याची सत्ता, हे समीकरण आहे, हे खरे असले तरी, डोकी मोजताना त्या डोक्यांमधल्या मेंदूंची प्रतवारी देखील तितकीच महत्त्वाची आहे. नामदार अजितदादांनी ही मेंदूची प्रतवारी करून, त्यातले सडके, आपमतलबी, भ्रष्ट, किडेकरी मेंदू टाळून निष्ठा, नीती आणि नियत असलेल्या मेंदूंचा स्वीकार करावा, अशी अपेक्षा शहरवासी व्यक्त करीत आहेत. राष्ट्रवादीच्या प्रवेशद्वारावर गर्दी होणारच आहे, आपली वेळ सुधारण्याची आस प्रत्येकाला आहेच, योग्य वेळ साधण्याचा प्रत्येकाचा जोरदार प्रयत्न आहे. मात्र, प्रवेशद्वार कोणासाठी सताड उघडायचे आणि कोणासाठी किलकिले करायचे, याची जाण असलेले दारवान त्या प्रवेशद्वारावर असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर मागच्या दाराने आत घुसण्याचा आणि बाहेरच्या रांगेत धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करून प्रवेशद्वार बाटवण्याच्या प्रकाराला देखील खीळ घातली पाहिजे.

हातात घड्याळ बांधण्याच्या अट्टहासी लोकांकडून, राष्ट्रवादीची वेळ बिघडवण्याचा प्रयत्न!

पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात अनेकांनी अनेकांची वेळ नासवली आहे. अनेकांच्या भ्रष्ट, अनाचारी, स्वाधिष्ठित वेळापत्रकामुळे शहरवासियांची देखील वेळ बिघडली आहे. मात्र, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी पक्षात आपली वेळ मारून नेण्यासाठी इतरांची वेळ बिघडवण्याचा प्रयत्नात काही महाभाग आहेत. यांना वेळीच आवर घालून राष्ट्रवादीच्या घड्याळात आपली वेळ साधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थांबविणे गरजेचे आहे. इतर पक्षातील घाणेरड्या प्रवृत्ती आणि राष्ट्रवादीला पुढे घातक ठरू शकणाऱ्या व्यक्ती टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. काही मंडळी शहर राष्ट्रवादीच्या प्रवेशद्वारावर अगर मागल्या दारावर असलेल्या द्वारपालकांना आमिषात गुंतवून आपल्या हातात घड्याळ बांधण्यात अट्टहासी पद्धतीने उत्सुक आहेत. त्यांचे मनसुभे ओळखून आणि घड्याळाचे खरे हक्कदार आणि निष्ठा, नीती, नियत साफ असलेले लोक तपासून आत घेणे आवश्यक आहे.

निवडणूक जिंकण्याची गुणवत्ता म्हणजेच इलेक्टिव्ह मेरिट असलेले लोक, शिरगणतीसाठी गरजेचे आहेतच. मात्र, त्याचबरोबर अशा लोकांमध्ये सडक्या, नासक्या डोक्यांची गणती होऊ नये. आकड्यांच्या खेळात आतापर्यंत अनेक डोकी नामदार अजितदादांनी आपल्या जवळ बाळगली. आता यापैकीच काही डोकी शिरजोर होऊन राष्ट्रवादीची वेळ बिघडवत आहेत. या शिरजोर झालेल्या डोक्यांना भाव देण्यात आणि त्यांच्या भावना बदलण्यात, यापूर्वी राष्ट्रवादीच्याच आतल्या गोटातील राजकारण कारणीभूत आहे. आता या बदललेल्या भावना राष्ट्रवादीची वेळ बिघडवण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. पुन्हा शिरगणतीच्या नादात, मागचे पाढे पंचावन्न आशा पद्धतीचे राजकारण शहर राष्ट्रवादीत घडू नये, यासाठी जागरूकता राखणे महत्त्वाचे आहे.

आपल्या अर्ध्या दिवसाच्या शहर दौऱ्यात राष्ट्रवादीच्या खऱ्या समर्थकांना हिम्मत देऊन आणि काही चांगल्या डोक्यांना महत्व देऊन नामदार अजितदादा पवार यांनी आपले पुढचे राजकारण स्पष्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीचे निष्ठावान समर्थक आणि राष्ट्रवादीच्या शिरगणतीला उपयोगी डोकी आपण कशी एकत्र करणार आहोत, याचा संदेशही अजितदादांनी शहरातील अन्य डोक्यांना दिला आहे. आता अजितदादांच्या राजकारणाची पुनःश्च सुरुवात म्हणून या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. तरीही सावधानता महत्त्वाची. नासके, सडके मेंदू टाळणे हाच पुढच्या सत्तासोपानाचा खरा राजमार्ग आहे, हे निश्चित!

———————————————————–

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×