आमच्या बोकांडी बसणाऱ्या लोकप्रतिनिधींना आवरा, महापालिकेत अधिकाऱ्यांचे मूक रुदन!

लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांचे एकमेकांशी सौहार्दपूर्ण संबंध असावेत, यात वावगे काहीच नाही. मात्र, हे संबंध संगनमताचे अगर साट्यालोट्याचे नसावेत, असा एक दंडक आहे. या दोनही घटकांना एकमेकांविषयी आदर जरूर असावा, मात्र त्यात भीती असता कामा नये, असेही मानक आहे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकमेकांना पूरक असले पाहिजेच, मात्र त्यात पुरून उरण्याची भाषा नसावी. पिंपरी चिंचवड महापालिकेत मात्र, सध्या एक फारच गंभीर आणि तरीही गंमतीदार प्रकार सर्रास पहावयास मिळतो आहे. काही लोकप्रतिनिधी मुद्दामहून एखाद्या अधिकाऱ्यांच्या दालनात ठाण मांडून बसतात आणि “चाय लाव, पानी लाव” असे हुकूम सोडत असतात. पुन्हा आपण या अधिकाऱ्याला त्याच्याच दालनात कसा डांबून ठेवला, अगर कोणतेही काम करण्यापासून कसा रोखला, याची मिजासी चर्चा करीत फिरतात. आता आशा लोकप्रतिनिधींचा प्रशासकीय अधिकाऱ्यांना अडथळा होऊ लागला आहे. उगाचच एखाद्या अधिकाऱ्यांच्या दालनात ठाण मांडलेल्या या लोकप्रतिनिधींमुळे त्या अधिकाऱ्याला काम करणे अगर इतर सहकारी अधिकारी आणि जनसामान्यांची गाऱ्हाणी ऐकणे दुरापास्त होते. लोकप्रतिनिधींचा आब राखण्यासाठी त्यांना उठून जा, म्हणता येत नाही आणि इतरांशी संवादही साधता येत नाही. आशा वेळी मनातल्या मनात या लोकप्रतिनिधींना कसा आवर घालावा आणि आपली दैनंदिन कर्मे काशी पूर्ण करावीत, या विवंचनेत मूक रुदन करण्याव्यतिरिक्त काहीही या अधिकाऱ्यांच्या हातात राहात नाही.

काही वेळा हे ठाण मांडून बसलेले लोकप्रतिनिधी, दैनंदिन कामात व्यत्यय ठरतात. बसल्या, बसल्या त्या अधिकाऱ्याच्या कामात ढवळाढवळही करतात. काही धोरणात्मक बाबींच्या चर्चेत नाक खुपसतात, तर काही गोपनीय बाबी उचकटत बसतात. नुकताच एक चमत्कारिक आणि गंभीर प्रकार निदर्शनास आला. एका अधिकाऱ्यांच्या कार्यालयात एक लोकप्रतिनिधी ठाण मांडून बसले, बसल्या बसल्या त्यांनी त्या अधिकाऱ्यांच्या समक्ष एका कार्यालयीन मूळ नस्तीतील कागदपत्रांची आपल्या भ्रमाणध्वनीत पटापट छायाचित्रे काढली. तो अधिकारी, हतबल होऊन नुसते पाहत राहण्याव्यतिरिक्त काहीही करू शकला नाही. आशा प्रकारे दैनंदिन कामात ढवळाढवळ का करू देतात अगर एखाद्या निर्णयप्रक्रियेत एखादा लोकप्रतिनिधी आणि त्याची पिलावळ हस्तक्षेप कशी करू शकते, त्याही पुढे जाऊन असा हस्तक्षेप, प्रशासकीय यंत्रणा सहन का करते, असा प्रश्न यातून निर्माण होतो. यावर संशोधन करण्याचा प्रयत्न केला असता, अनेक विदारक सत्ये दृष्गोचर झाली.

या विदारक सत्याची पहिली बाजू प्रशासकीय यंत्रणा आणि त्या यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी वर्गाची हतबलता ही आहे. राजकीय वरदहस्ताने आपली खुर्ची टिकवून ठेवण्याच्या नादात काही अधिकारी, स्वतःसाठी एखादा राजकीय बाप स्वीकारतात. मग त्या राजकीय बापाचे आणि त्याच्या बगलबच्च्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला त्याचे गुमान ऐकावे लागते. या राजकीय बापांचे काही ठेकेदार, पुरवठादार यांना पूरक वातावरण तयार करून देण्याची जबाबदारी आपसूकच, त्या अधिकाऱ्यावर येते. पहिल्या बाजूची अजून एक पोटबाजू म्हणजे, प्रशासकीय प्रणालीत काम करताना राजकीय बापाचा आपल्या डोक्यावरचा हात बाजूला होऊ नये, म्हणून त्या बापाच्या श्वानासही सलाम करण्याची पाळी या अधिकाऱ्यांवर येते आणि त्यांना तसे करावेच लागते.

संशोधनातून आलेली दुसरी बाजू म्हणजे लोकप्रतिनिधी. अर्थात यातही दोन पोटबाजू आहेतच. आपली वरदहस्ती पिलावळ प्रशासकीय यंत्रणेत मोक्याच्या जागी ठेवण्यात काही राजकीय बाप अतिकुशलता दाखवतात. मग या मोक्याच्या जागांच्या बदल्यात या प्रशासकीय पिलावळीला आपल्या राजकीय बापाचे ऐकण्याशिवाय गत्यंतर नसते. दुसरी पोटबाजू म्हणजे, भोकाडी करून बोकांडी बसणारे लोकप्रतिनिधी. ही भोकाडी करणारी मंडळी, कोणत्याही अधिकाऱ्याला दमात घेतात, प्रसंगी धाकदपटशा करतात, वेळ पडलीच तर अंगावरही येतात. काही वेळा तर एखाद्या अधिकाऱ्याला जिवीतभय निर्माण करून आपल्याला हवे तसे करून घेण्यासही ही मंडळी मागेपुढे पाहात नाहीत. नुकताच झालेला, आयुक्तांच्या दालनाबाहेरचा काळिखमय प्रकार, याचेच प्रत्यंतर देणारा आहे.

मात्र, आता या भोकाडी पसरवून बोकांडी बसणाऱ्या मंडळींना आणि राजकीय बापाच्या पिलावळीला, प्रशासकीय यंत्रणेतील अनेक मंडळी पुरती त्रासली आहेत. होऊ घातलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांमुळे तर राजकीय मंडळी आणि त्यांची पिलावळ फारच तगतगीची ठरू लागले आहे. सततच्या बदलणाऱ्या राजकीय वाऱ्यामुळे कोणाचे ऐकावे आणि कोणाला टाळावे, हे ठरवणे अडचणीचे होऊ लागले आहे. मात्र, तूर्तास तरी हस्तक्षेपी लोकप्रतिनिधी ही एक मोठी डोकेदुखी प्रशासकीय यंत्रणेपुढे आहे. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशा अवस्थेत असलेली पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा, आता कोणीतरी या लोकप्रतिनिधींना आवरा असा टाहो करीत आहेत. मात्र, बुक्क्या घालताना तोंड दाबल्यावर जशी आतल्याआत घुसमट होते, दम छाटतो, जीव कासावीस होतो आणि मूक रुदन करण्यापलीकडे काही करता येत नाही, अशी ही अवस्था आहे. सांप्रतच्या वेळी या अवस्थेतून सुटका होण्याची वाट आसुसून पाहिली जात आहे, हेच खरे!

———————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×