एकोणीस लाखांत कोविड लसीकरणाचे शहरातील लाभधारक किती?

कोविड लसीकरणाचा एकोणीस लाखांचा टप्पा पार केल्याचे सांगून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यंत्रणेने आपली पाठ थोपटून घेतली. महापालिकेच्या एकोणसत्तर आणि खाजगी वैद्यकीय अस्थापनांच्या एकशे बत्तीस लसीकरण केंद्रांवर हे लक्ष गाठणारे कोविड लसीकरण झाले. मात्र, या एकोणीस लाख आकड्याचे मूळ गमक काही महापालिकेच्या लसीकरण यंत्रणेने स्पष्ट केले नाही. महापालिकेची सध्याची लोकसंख्या सुमारे सत्ताविस लाख इतकी आहे. महापालिकेने गाठलेले उद्दीष्ट विचारात घेता शहरातील सुमारे सत्तर टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे, असे दृश्य निर्माण करण्यात येत असले तरी, ही आकडेवारी फसवी असून, निव्वळ पिंपरी चिंचवड शहराच्या लोकसंख्येचा विचार करता जास्तीत जास्त पंचवीस टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असल्याचे चित्र आहे. त्यातही दोनदा लास घेतलेल्यांचे प्रमाण अकरा ते बारा टक्के आणि एकदा लास घेतलेल्यांचे प्रमाण तेरा ते चौदा टक्के एव्हढेच असल्याचे स्पष्ट होते आहे. मग एकोणीस लाखांचा आकडा आणि वस्तुस्थिती यातील तफावत इतकी कशी यावर संशोधन केले असता, केंद्र आणि राज्य शासनाचे धोरण याला कारणीभूत असल्याची बाब समोर आली आहे.

१६जानेवारी, २०२१ पासून काल म्हणजे ३०सप्टेंबर, २०२१ रोजी दुपारी चार वाजेपर्यंत १९,३४,२४९ इतके कोविड लसींचे डोस पिंपरी चिंचवड शहरात वापरले गेले. मात्र, यातून शहरातील नागरिकांचे कितपत लसीकरण झाले, ही संख्या सांगणे शक्य नसल्याची माहिती यंत्रणेतील मंडळींनीच खाजगीत सांगितली आहे. त्यामुळे यंत्रणेकडून शहरातील खाजगी आणि महापालिकेच्या कोविड लसीकरण केंद्रांवर किती लस वापरली गेली, याचीच आकडेवारी या यंत्रणेतून देण्यात येते, असे स्पष्टीकरणही, खाजगीरीत्या दिले जात आहे. या प्रकाराला राज्य आणि केंद्र शासनाचे धोरण कारणीभूत असून, पुणे जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीला कोठेही लास घेता येईल, या शासकीय आदेशामुळे निव्वळ शहरातील नागरिकांचे किती लसीकरण झाले, याची स्पष्ट संख्या मिळणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. शहराच्या हद्दीबाहेरील नागरिकांनी मोठ्या संख्येने शहरातील लसीकरणाचा लाभ घेतला असल्याची खात्रीशीर माहिती आहे. ही संख्या एकूण लसीकरणाच्या पंचेचाळीस ते पन्नास टक्के असल्याचीही चर्चा होत आहे.

यातही सुमारे सहा लाख तेरा हजार इतक्या लोकांचे पूर्ण लसीकरण, म्हणजेच दोन डोस झाले आहेत, तर सात लाख एकवीस हजार इतक्या संख्येपर्यंत लोकांचा एक डोस झाला आहे. यात शहराबाहेरील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतल्याचा अंदाजित आकडा गृहीत धरला तर, कोविड लसीकरणाचे शहरातील लाभधारक निम्म्या संख्येवर येतात. थोडक्यात पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील लसीकरण केंद्रांतून एकोणीस लाखांपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले असले तरी, शहराच्या मूळ रहिवाशांपैकी केवळ साडेअकरा ते बारा टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण म्हणजेच दोन डोस पूर्ण झाले असून, तेरा ते साडेतेरा टक्के लोकांचे अर्धे म्हणजेच एक डोस लसीकरण झाले आहे.

कोविड लसीकरणाचे एकोणीस लाख पेक्षा जास्त डोस वापरण्याची यंत्रणा उभी करणे आणि समर्पकरित्या, समाधानकारक काम त्या यंत्रणेकडून करून घेणे, हे पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी भूषणावहच आहे, याबाबत प्रत्यवाय नाही. कोविड लसीकरणासाठी काम करणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारक, तंत्रज्ञ, मदतनीस यांसह महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची आणि लसीकरणाची धुरा सांभाळणाऱ्या प्रमुखांची एकत्रित मेहनत, हे स्पृहणीय काम होण्यामागचे वास्तव आहे. मात्र, शहरवासीयांना यातून कितपत दिलासा मिळेल, हेही शंकास्पद आहे. एव्हढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले, म्हणून नीसुर होण्यात शहाणपण नाही, हेही वास्तव आहे. याचे भान आणि जाण ठेऊन शहर पातळीवर नक्की किती लसीकरण झाले, याचा खरा आढावा घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कारण कोविड१९ च्या तिसऱ्या लाटेची वदंता अजूनही आहे. शहर समूह प्रतिपिंडीत ( हर्ड इम्युनिटी ) झाले, असे म्हणण्यात अर्थ नाही. यंत्रणा राबवल्याची पाठ थोपटून जरूर घ्यावी, मात्र, भय इथले संपले नाही, हेही लक्षात ठेवणे अति आवश्यक आहे!

————————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×