मतलबींची चाकरी, जी का जंजाल!

चाकरी कोणाची करावी, यावर कोणत्याही गरजूंनी गंभीर विचार करण्याची गरज असते. मालक चांगला असेल तर, चाकरी करणारालाही एक वेगळे समाधान मिळते. मात्र, मालक मतलबी, धूर्त, घातक, आढ्यताखोर, आतल्या गाठीचा, भ्रष्टाचारी, अनाचारी, नकारात्मक असेल, तर कोणालाही त्याची चाकरी, जीवाला घोर लावणारी अगर जी का जंजाल ठरू शकते. असाच काहीसा प्रकार सांप्रतला पिंपरी चिंचवड शहरातल्या एका राजकारण्याकडे चाकरी करणाऱ्या एका चाकराच्या, तेही स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्या चाकराच्या बाबतीत घडतो आहे काय, यावर सध्या शहरभर चर्चा आहे. आपल्या मालकांच्या नको त्या भानगडींना सहाय्यीभूत होण्याच्या नादात, आता हा चाकर असाच, नको त्या चक्रात अडकला असल्याची वदंता आहे. आपल्या मतलबी मालकाची री ओढण्याचा नादात संकटात सापडलेल्या या चाकराला सध्या कारवाईची वकिली नोटीस मिळाली आहे. माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशा आशयाच्या या वकिली सुचनेमुळे आपले काय होईल या चिंतेत हा चाकर, सध्या पक्का गोत्यात आला आहे.

नक्की काय आणि कसे घडले, यावर संशोधन केले असता,जी माहिती उपलब्ध झाली, ती अशी की, आपल्या मालकाची मर्जी राखण्यासाठी, आपल्याजवळच्या माहितीचा विपर्यासी उपयोग करून, या चाकराने एक बातमी, आपल्या समाज माध्यमी बतमीपत्रात प्रसवली. या बातमीद्वारे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एक महिला अधिकारी अडचणीत याव्यात म्हणून या चाकर पत्रकाराने हा उपद्रवी प्रकार केला. मात्र, या महिला अधिकारी, ज्या या चाकर पत्रकाराच्या मालकालाही बधल्या नाहीत, विशेष खमक्या निघाल्या. या उपद्रवी पत्रकार चाकराने खोट्या माहितीच्या आधारे अगर माहितीतील वस्तुस्थितीचा विपर्यास करून संबंधित महिला अधिकारी यांच्या पत, प्रतिष्ठा आणि सन्मानाला धक्का पोहोचवला आहे. याबाबतचा माफीनामा आपल्या प्रसिद्धी माध्यमांमधून सलग एक आठवडा प्रसिद्ध करावा, अन्यथा न्यायालयीन बडग्याला सामोरे जावे, अशी वकिली सूचना आता या चाकरास देण्यात आली आहे.

चाकराने, समार्थाघरचे श्वान होऊ नये!

चाकराने आपली चाकरी इमानेइतबारे करावी,असा दंडक आहे. त्याचबरोबर आपला मालक आपल्याकडून काय, कसले आणि कशासाठीचे काम करून घेतो आहे, याचे भान आणि जाण ठेवणेही प्रत्येक चाकरासाठी गरजेचे आहे. आपल्या मालकाघरचे श्वान होऊन आल्यागेल्यावर भुंकू नये. आपला इमान जरूर राखावा, मात्र, त्याची चाटुगिरीत ताब्दीली होऊ देऊ नये. दुर्दैवाने ज्या मालकासाठी आपण अनेकांवर कंठात प्राण आणून भुंकलो, त्यांनी पार्श्वभागी लत्ताप्रहार करून हाकलून दिल्यास अगर मालकीचा पट्टा काढून घेतल्यास, अगदी गल्लोगल्ली दगडी खावी लागतील, या बाबीचा विचार चाकराने जरूर करावा. दुर्दैवाने राजकारण्यांचा पट्टा गळ्यात घालून आल्यागेल्यावर भुंकणारे असे चाकर रुपी श्वान पिंपरी चिंचवड शहरात कायम पाहायला मिळतात. त्याहीपुढचा दुर्दैवी भाग म्हणजे, या मालकासाठी भुंकणाऱ्या चाकर श्वानांमध्ये स्वतःला दिग्गज वगैरे म्हणवून घेणारे पत्रकारही आहेत.

यात काही मालकांच्या सांगण्यावरून अनेकांवर भुंकलेले आणि प्रसंगी चावा घ्यायला धावलेले पत्रकार चाकर आहेतच. मात्र, मालकाने पार्श्वभागी लत्ताप्रहार करून गच्छंती केल्यावर या चाकरांवर नव्या मालकाचा पट्टा गळ्यात घालून घ्यावा लागला आहे. आता या नव्या मालकासाठी, जुन्या मालकावर कंठारवाने भुंकून, त्या जुन्या मालकांच्या पार्श्वभागाचा वेध घेण्याची पाळी या चाकरांवर आली आहे. बदललेल्या मालकाची पुन्हा समार्थाघरचे श्वान म्हणूनच चाकरी करण्यात धन्यता मानणारे हे पत्रकार चाकर पुन्हा गोत्यात येणार नाहीत, याची शाश्वती नाहीच, हे विशेष. काही चाकर श्वानांवर तर, इतकी गदळ वेळ आली आहे, की एकेकाळी ज्यांच्या भुंकण्यात वेगळाच आदब, वेगळीच शान, वेगळाच मान होता, त्यांना आता मालक बदलल्यावर कोणावरही भुंकावे लागत आहे. थोडक्यात या लेखांप्रपंचाचा मतितार्थ एव्हढाच की, कोणीहि कोणाचीही चाकरी करावी, अगदी पत्रकार म्हणवून घेणाऱ्यांनी सुद्धा. मात्र, ती चाकरी करताना स्वतःला मालकाघरचे श्वान करून घेऊ नये. दुर्दैवाने मालक बदलण्याची पाळी आलीच तर, आपलीच गोची होणार नाही, याचे भान आणि जाण ठेवावी, हे महत्त्वाचे!

————————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×