भाजपाई शहराध्यक्षांचं लबाडा घरचं आवतनं?

भाजपाई माजीआजी शहराध्यक्ष यांचा आतबट्ट्याचा कारभार आणि त्यांच्या पिलावळीचा त्रास यामुळे पिंपरी चिंचवड शहर भाजपाईंमध्ये पूर्णतः अराजकता आणि अनागोंदीचे वातावरण आहे. बारा, पंधरा कारभारी सोडले, तर समस्त भाजपाई सध्या वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका आणि संलग्न धंद्यात या बारा, पंधरा करभाऱ्यांच्या आणि त्यांच्या पिलावळीच्या तुंबड्याच भरल्या जात आहेत. त्यामुळे शहर भाजपाई नगरसदस्य आणि इच्छुक कार्यकर्ते, मोठ्या प्रमाणात भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. ही गळती थांबविण्यासाठी भाजपाई शहाराध्यक्षांनी चालविलेला केविलवाणा प्रयत्न आता भाजपाईंमध्ये चर्चेचा विषय ठरू लागले आहे. शहर भाजप मधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या नगरसदस्य, कार्यकर्त्यांसाठी एक नवीन गाजर तयार करण्यात आले आहे. हे गाजर सध्यातरी केवळ भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी आहे. मात्र, करभाऱ्यांच्या आतापर्यंतच्या आपमतलबी उद्योगांची जाण असलेले शहर भाजपाई, शहराध्यक्षांचे हे नवे गाजर, लबाडा घरचं आवतनं तर ठरणार नाही ना या विवंचनेत आहेत.

काय आहे हे भाजपाई शहराध्यक्षांचे आवतने, यावर भाजपच्या काही मंडळींशी चर्चा केल्यानंतर याबाबत माहिती उपलब्ध झाली. भाजपचे भोसरीचे आमदार आणि शहराध्यक्ष यांनी आकख्या भोसरी मतदारसंघाचा महापालिका निवडणुकीचा सगळा खर्च स्वतः करण्याची तयारी दाखवली आहे. भाजपच्या भोसरीतील कोणत्याही उमेदवाराने महापालिका निवडणुकीत एक रुपयाही खर्च करायचा नाही, अगदी अनामत रक्कम भरण्यापासूनचा सगळा खर्च शहराध्यक्ष आमदार करणार आहेत, कोणीही भाजप सोडू नये, असे हे आवतने आहे. मात्र, गेल्या उण्यापुऱ्या सात वर्षांचा भोसरीच्या आमदारांचा एकंदर कारभार पाहता हे आवतने, नको तिथे शिरणारे गाजर तर ठरणार नाही ना, या विवंचनेत सध्या भोसरीचे भाजपाई आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेची एकूण सदस्यसंख्या एकशे अठ्ठावीस असल्याचे निश्चित झाले आहे. त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीवरही बऱ्यापैकी शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे भोसरी विधानसभेत चाळीस पेक्षा जास्त नगरसदस्य असतील, हेही नक्की झाले आहे. प्रत्येकी किमान पन्नास पेटी खर्च धरला तरी, सुमारे वीस खोकी एव्हढा खर्च अपेक्षित आहे. हा सगळा खर्च स्वतः करण्याची तयारी आमदार शहराध्यक्षांनी दाखवली आहे. मात्र, गेल्या सात वर्षांत कोणाच्या कापल्या करंगळीवरही लघुशंका न करणारी ही मंडळी, खरोखरच एव्हढा खर्च करतील काय, याबाबत दीर्घशंका उपस्थित केली जात आहे. आता तूर्तास भाजपची किमान भोसरीतील गळती थांबविण्यासाठी आणि आपले कापले नाक वाचविण्यासाठी आमदार शहराध्यक्ष, हे खर्चाचे गाजर, भाजपाईंना दाखवीत आहेत, अशीच चर्चा सध्या आहे. शिवाय उमेदवारी निश्चितीपर्यंतच हे गोडसर आणि जाडजूड गाजर दाखवून, काही मंडळी पक्षात थांबली आणि हे केवळ गाजरच ठरले, तर ते कसे घुसले, यावरही भोसरीच्या भाजपाईंमध्ये जोरदार चर्चा आहे.

पिंपरी चिंचवड शहर भाजपाई आमदार शहराध्यक्ष आणि त्यांची स्वतःला चाणक्य म्हणवून घेणारी पिलावळ, कायम डंका पिटण्यात आणि पार्श्वभाग बडवण्यात विशेष वाकबगार आहेत. ‘तू चाल पुढं, तुला “ना गड्या” भीती कशाची?’ असे म्हणून आता गळती थोपविण्याचा प्रयत्न करणारी या मंडळींनी, ऐन निवडणुकीत, “ना गड्या, भीती कशाची?” म्हटले, तर काय? यावर सध्या भोसरीचे भाजपाई विचार करताहेत. त्यामुळे भाजपाई आमदार शहराध्यक्षांचे हे लबाडा घरचे आवतने स्वीकारून आहे तिथेच राहायचे, की पक्ष सोडून नवा डाव मांडायचा, या मुद्द्यावर भोसरीकर भाजपाई सध्या तरी थांबून आहेत. तसेही आत्ताच पक्ष बदलून नगरसदस्यत्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत पक्ष सोडणेच सोयीस्कर असल्याचे बोलले जात आहे. त्यातही काही नगरसदस्य सध्याच्या सदस्यत्वावर पाणी सोडण्यास तयार आहेत, ते भाजपला सोडचिठ्ठी देणारच आहेत. मात्र, बाकीचे तरी या आवतन्याला भुलून थांबतील, असा होरा आमदार शहराध्यक्षांच्या आतल्या गोटातील तथाकथित चाणक्यांकडून सध्या व्यक्त केला जात आहे.

——————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×