मराठे मायत्यांचे नात्यागोत्याचे राजकारण आणि त्यामधून वाहणारा विकास!
विकास कोणासाठी, या सध्या प्रश्नाचे साधे उत्तर सध्या पिंपरी चिंचवड शहरात आणि महापालिकेत दिले जाते, की विकास केवळ आमच्यासाठी. आमचे सक्खे, चुलत, आत्ते, मामे, मावस भाऊ, पुतणे, भाचे, जावई, पाव्हणे, मेव्हणे, मेव्हण्यांचे पाव्हणे, पाव्हण्यांचे मेव्हणे, सगेसोयरे यांना वाटून हा विकास उरलाच तर, बगलबच्चे, हितसंबंधी, आमचे हिमायती, आम्ही ज्यांचे हिमायती आहोत ते आणि मग त्या विकासाचा काही राळ गाळ शिल्लक राहिलाच, तर तो आमचा समाज, आमची जात, राहिलेला समाज वगैरे, वगैरे यांच्यात हा विकास वाटला जातो. पिंपरी चिंचवड महापालिका आणि त्यातून वाहणारा हा विकास, सध्या पिंपरी चिंचवड शहरातील मराठे मायते, आशा प्रकारे आपसात वाटून घेत आहेत. या वाटणीत जसे सत्ताधारी मराठे मायते आहेत, तसेच विरोधी देखील समाविष्ट आहेत. कारण विकास कोणासाठी या प्रश्नाच्या उत्तरात उल्लेखलेल्या प्रकारात हेच सगळे समाविष्ट आहेत. यातही गदळ प्रकार असा की, या नात्यागोत्यांच्या बाहेरचे मराठे देखील या विकासात समाविष्ट नाहीत.
पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार पिंपरी चिंचवड शहरातील यच्चयावत मराठे, एकमेकांच्या नात्यागोत्यात आहेत. या नात्यागोत्यात शहराचे सगळे राजकारण गुरफटलेले आहेत. पक्ष कोणताही असो, निवडणुकीत जिंकणारा आपला हवाच, त्याही पुढे जाऊन हरणाराही आपलाच हवा, हा इथल्या राजकारणाचा मूळ पाया आहे. आपल्या नात्यागोत्यांच्या बाहेरचे कोणीही विकासाचे लाभधारक असू नयेत, हे या शहरातील गाववाल्यांचे खरे राजकारण आहे. चऱ्होली पासून सांगवी पर्यंत आणि दापोडी पासून निगडी पर्यंत संपूर्ण शहरात गाववाल्या मराठ्यांची जास्तीत जास्त चाळीस आडनावे आणि लाखाच्या आसपास लोकसंख्या, या शहराचे आणि शहरात राहणाऱ्या सुमारे तीस लाख लोकसंख्येचे मक्तेदार मालक आहेत. कोणत्याही परिस्थितीत राजकारण आणि समाजकारणाची मक्तेदारी या चाळीस आडनावांच्या बाहेर जाऊच द्यायची नाही, हेच या शहराचे राजकारण आहे. या शहराची मालमत्ता, सुबत्ता, विकास यावर आपल्या व्यतिरिक्त कोणीही हक्क सांगू शकत नाही, हा या मंडळींचा खाक्या.
या गाववाल्या मराठ्यांचे जे शिकलेले आणि हुशार वारसदार आहेत, ते राजकारणापासून चार हात दूर आहेत. मात्र, ज्यांना आपल्या अक्कलहुषारीवर जगणे शक्य नाही, त्यांच्यासाठी या राजकारण्यांकडे फक्त दोनच पर्याय आहेत, ते म्हणजे त्यापैकी एखाद्याला राजकारणात आणणे आणि एखाद्याला ठेकेदार बनवणे. पंधरा वीस वर्षांपूर्वी पर्यंत या गाववाल्या मराठ्यांकडे व्यावसायिक वाटचालीसाठी उपहारगृह, सायकल दुकान, पानाची टपरी, उसाचे गुऱ्हाळ यांसारखे पारंपरिक व्यवसाय होते. या व्यवसायात नसलेले राजकारणात होते. जमिनीच्या व्यवहारांतून आलेला पैसा वापरून आलेल्या गाड्या, त्या गाड्यांमध्ये कार्यकर्ते म्हणवणारे, संध्याकाळच्या सोयीसाठी चिटकून राहणारे चार सहा चमचे, हातात गळ्यात लगडी आणि चौकातला चहावाला, हे या जवळपास सर्वच राजकारण्यांच्या वरसदारांचे दिनक्रम. जमिनीला जादा भाव आला, आपल्या पालकाने राजकारणात बऱ्यापैकी कमाई केली, एखाद्या राजकीय वरदहस्ताने एखादा ठेका मिळवता आला की या मंडळींचे राजकारण सुरू होते. आता यांचे व्यावसायिक फंडे थोडेसे बदलले आहेत. पारंपरिक व्यवसाय सोडून ही मंडळी सध्या ठेकेदार, पुरवठादार, बांधकाम व्यावसायिक म्हणजेच कॉन्ट्रॅक्टर, सप्लायर, बिल्डर या व्यवसायात आहेत, हाच काय तो बदल.
व्यावसायिक बदल झाले असले तरी या गाववाल्या मंडळींच्या कार्यपद्धतीत कोणतेही बदल झाले नाहीत, हे विशेष. पिंपरी चिंचवड शहराच्या जवळपास तीस लाख लोकसंख्येचा विचार या मंडळींनी कधी केलाच नाही. जमिनीची संपत्ती, त्या संपत्तीतून आलेली सुबत्ता, ही सुबत्ता वापरून केलेले राजकारण, राजकारणातून पुन्हा संपत्ती आणि सुबत्ता, त्यातून पुन्हा राजकारण हे या मंडळींनी आखलेले चक्र आहे. एखादा या मंडळींच्या नात्यागोत्यांच्या बाहेरचा माणूस राजकारणात अगर समाजकारणात मोठा होऊ लागला, तर त्याला मातीत घालण्यासाठी ही सर्वपक्षीय नातीगोती एक होतात, हे त्यातील एक विशेष. वीस पंचवीस वर्षे परिस्थितीशी झगडून, मेहनतीने अगर अक्कलहुषारीने मोठा झालेल्या आणि या गाववाल्यांनी मातीत घातलेल्या, या बाहेरच्या माणसाला परत उभारी मिळायला पुढची काही वर्षे खर्ची पडतात. मात्र, तोपर्यंत ही गाववाली मंडळी अजून पुढे गेलेली असतात. थोडक्यात या मंडळींच्या स्पर्धेत बाहेरचा माणूस टिकाव धरत नाही. शहराच्या एकंदर लोकसंख्येचा जेमतेम दोन तीन टक्के असलेली ही गाववाल्या मराठे मायत्यांची लोकसंख्या बाकीच्या सत्याण्णव, अठ्ठ्याण्णव टक्के लोकांवर हुकमत गाजवते आहे.
नागरिकांचा मागासवर्ग हा राजकीय आरक्षणाचा संवर्ग तर या गाववाल्या मंडळींनी, मूळच्या इतर मागासवर्गीय, भटक्या, विमुक्त जाती जमाती यांच्याकडून अक्षरशः हिसकावून घेतला आहे. दाखल्यासाठी कुणबी असलेली ही मंडळी सोयरिकीसाठी मात्र, शहाण्णव, ब्यांणव कुळीचे होतात आणि आपली देशमुखी मोठ्या अभिमानाने मिरवतात. म्हणजेच “चित भी मेरी, पट भी मेरी” हा या मंडळींचा मूळ फंडा आहे. पिंपरी चिंचवड शहर हे एक बहूआयामी शहर आहे, जवळपास भारताच्या कानाकोपऱ्यातून आपले पोट हातावर घेऊन या शहरात विविध समाजस्तर स्थायिक झाले आहेत. आपल्या हातातोंडाच्या लढाईत पिचलेली ही लोकसंख्या इथल्या गाववाल्या मराठे मायत्यांची जहागिरी झाली आहे. या मंडळींचे तमाम राजकारण याच पिचलेल्या, “नाहिरे” गटाच्या जोरावर चालते. शहरात ताकद असलेले मराठा व्यतिरिक्तचे लोक या मराठ्यांनी ठरवून बाजूला केले आहेत. मात्र, ही गाववाल्यांव्यतिरिक्तची निर्णायक लोकसंख्या जागरूक झाली आणि एकत्र आली, तर यांचा “टांगा पलटी, घोडे फरार” होण्यास फारसा वेळ लागणार नाही.
———————————————————